शेतकऱ्यांचे दुःख लेखकांनी ओळखले नाही : परिसंवाद- साहित्य संमेलन

शेतकऱ्यांचे दुःख लेखकांनी ओळखले नाही : परिसंवाद- साहित्य संमेलन
शेतकऱ्यांचे दुःख लेखकांनी ओळखले नाही : परिसंवाद- साहित्य संमेलन

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी (यवतमाळ) : समाजातील ज्या घटकांवर अन्याय, शोषण होत आहे, त्यांना लेखकांनी आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी आणायला हवे. हे लेखकांचे कर्तव्यच आहे. पण, शेतकऱ्यांचे दुःख ओळखण्यात लेखक कमी पडला अशी खंत शेती प्रश्नाच्या अभ्यासकांनी व्यक्त केली. शेतकरी आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर ‘कृषक समाजाच्या चित्रणाबाबत नागरी लेखक उदासीन का?' या विषयावर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात शनिवारी (ता.१२) परिसंवाद घेण्यात आला. यात डॉ. देवेंद्र पुनसे (यवतमाळ), डॉ. फुला बागुल (धुळे), सारंग दर्शने (मुंबई), गजानन नारे (अकोला), प्रभाकर सलगरे (आळंद) यांनी सहभागी होऊन कृषक समाजाच्या व्यथा मांडल्या. बागुल म्हणाले, ‘‘नागरी लेखक कृषक समाजाचे चित्रण करत नाही. कारण त्यांच्या प्रतिमा वेगळ्या आहेत. त्या शेती-मातीशी संबंधित नाहीत. जागतिकीकरणाचे आणि शहरीकरणाचे दुष्पपरिणाम मांडण्यातच ते रमले आहेत. यातून त्यांच्यातील अनुभव विश्वाचे थिटेपण पाहायला मिळते. लोकानुरंजन हाच नागरी लेखकांचा ध्यास आहे.’’ ‘शासनाला जाग येईल, असे परखड लेखन व्हायला हवे,' अशी अपेक्षा सलगरे यांनी व्यक्त केली. दर्शने म्हणाले, ‘‘साहित्यच नव्हे संगीत, नाटक, चित्र अशा सगळ्याच कला शेतकऱ्यांच्या वेदनांपासून दूर आहेत. उदासीन आहेत. शहरातील तरुण लेखकही ग्रामीण वास्तवापासून दुरावलेला आहे. केवळ रोमॅंटिक लेखनात ते रमले आहेत.’’ नारे म्हणाले, की, बहुतांश ग्रामीण लेखक हे शहरात राहतात. पण ज्यांची नाळ ग्रामीण भागापासून तुटली नाही, त्याला ग्रामीण लेखक म्हणता येईल. जो दुरावला आहे, त्याला नागरी लेखक म्हणता येईल. शेतकऱ्यांचे दुःख, वेदना, यातना हे अनुभव घेतल्याशिवाय परिणामकारक लिहिता येत नाहीत. त्यामुळे नागरी लेखक इथे कमी पडला. खरंतर प्रश्न समजून घेऊन लेखन केले तर शेतकऱ्यांचे दुःख हलके होईल. लेखकांची पाठ, वाचकांची दाद ‘निमंत्रण वापसी’सह वेगवेगळया कारणांमुळे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे मान्यवर लेखकांनी पाठ फिरवली आहे. त्यांच्याबरोबर साहित्य संमेलनाचे एकही माजी अध्यक्ष संमेलनस्थळी फिरकले नाहीत. तरीसुद्धा वाचकांनी हे संमेलन तारले आहे. त्यामुळे संमेलनाच्या आवारात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाचकांची गर्दी दिसून येत आहे. साहित्य क्षेत्रातील महत्त्वाचा सोहळा म्हणून साहित्य संमेलनाकडे पहिले जाते. राज्याच्या कानाकोपऱ्यातून वाचकांबरोबरच लेखकही या साहित्य पंढरीच्या वारीत सहभागी होतात, हे दरवर्षीचे चित्र आहे. पण, यंदाच्या संमेलनातून नावाजलेल्या लेखकांनी पाय काढून घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. केवळ कवी अशोक नायगावकर, प्रवीण दवणे, भारत सासणे असे मोजकेच साहित्यिक संमेलनाच्या मांडवात दिसत आहेत. त्यांच्याभोवती गराडा घालून कोणी सेल्फी घेत आहे तर कोणी त्यांच्याशी चर्चा करत आहे, हे चित्रही येथे पाहायला मिळाले. संमेलनाध्यक्षांच्या पुस्तकांची उत्सुकता संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांच्या वेगवेगळ्या काव्य संग्रहाबरोबरच वैचारिक पुस्तकांबाबत वाचकांमध्ये उत्सुकता दिसून येत आहे. त्यामुळेच त्यांच्या पुस्तकांना गेल्या दोन दिवसांत मागणी वाढली आहे. त्यामुळे त्यांची पुस्तके अनेक प्रकाशकांनी आपल्या दालनात वाचकांसाठी उपलब्ध करून दिली आहेत. साहित्य संमेलनाच्या ग्रंथ प्रदर्शनात गेल्या दोन दिवसंपासून रसिकांचा चांगला प्रतिसाद आहे. त्यात ढेरे यांच्या पुस्तकांची मागणी जास्त आहे. काही प्रकाशक डॉ. ढेरे यांची सर्व पुस्तके सवलतीच्या दरातही देत आहेत. 'दुर्गा भागवत: व्यक्ती, विचार आणि कार्य', 'त्यांची झेप त्यांचे अवकाश', 'स्त्री लिखित मराठी कविता', 'वेगळी माती वेगळा वास', 'आठवणीतले आंगण', 'नव्या-जुन्याच्या काठवरती', 'विवेक आणि विद्रोह' या पुस्तकांकडे वाचकांचा कल आहे, असे प्रकाशक अरुण जाखडे यांनी  सांगितले. कृषक समाजाच्या चित्रणाबात केवळ नागरी लेखकच नव्हे प्रस्थापित झालेले सर्वच लेखक उदासीन आहेत. शेतकऱ्यांत क्रांती घडवून आणणारे एखादे तरी पुस्तक आहे का? पुस्तकात शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून ते सुटत नाहीत; पण जागृती, प्रबोधन नक्की होते. - डॉ. देवेंद्र पुनसे, लेखक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com