‘आरा’ वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे सर्वाधिकार ‘सह्याद्री’ला

द्राक्षाच्या ‘आरा’ वाणाचे भारतातील सर्वाधिकार सह्याद्रीला दिल्याने आमचे व्यावसायिक नातेसंबंध आणखी वृद्धिंगत होणार आहेत. ‘आरा’सारख्या दर्जेदार वाणामुळे भारतीय उपखंडातील द्राक्ष मागणीची गणिते बदलून जाणार आहेत. भारतातील द्राक्षांना जगभरात मागणी वाढणार आहे. - मार्क ट्विडल, ‘ज्युपिटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह व्यवस्थापकीय संचालक
आरा द्राक्ष वाण
आरा द्राक्ष वाण

नाशिक : निर्यातक्षम द्राक्षाच्या ‘आरा’ या कॅलिफोर्निया वाणाचे ‘उत्पादन आणि विक्री’बाबतचे भारतातील सर्वाधिकार नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीला मिळाले आहेत. ब्रिटनमधील ज्युपिटर कंपनीकडून हे अधिकार प्राप्त झाल्याची माहिती ‘सह्याद्री’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे पत्रकार परिषदेत माहिती दिली. ‘ज्युपिटर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि समूह व्यवस्थापकीय संचालक मार्क ट्विडल यांच्या उपस्थितीत मोहाडी (ता. दिंडोरी) येथे सह्याद्री फार्म्सच्या मुख्यालयात नुकत्याच या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. यानंतर नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत विलास शिंदे यांनी संबोधित केले. या वेळी सह्याद्रीचे संचालक श्रीराम ढोकरे, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष रवींद्र बोराडे आणि अझहर तंबूवाला उपस्थित होते.  याबाबत अधिक माहिती देताना शिंदे यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांत द्राक्ष उत्पादक बदलते हवामान, अधिक उत्पादन खर्च, टिकवण क्षमता, उत्पादकता, रोगप्रतिकारक क्षमता याबाबत अडचणीत आहेत. बाजारपेठेच्या मागणीनुसार निर्यातक्षम द्राक्ष वाणांचा अभाव ही प्रमुख अडचण होती. यावर मात करण्यासाठी सह्याद्रीने पुढाकार घेऊन अधिक उत्पादकता, कमी उत्पादन खर्च, निर्यातक्षम अशी वैशिष्ट्ये असलेला ‘आरा’ वाण भारतात आणला आहे. या वाणाची लागवड ते विक्रीपर्यंत सर्व अधिकार मिळाले असून, या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. उत्पादन खर्च २० टक्क्यांनी कमी होऊन अधिकचे १० ते १५ टक्के उत्पादन वाढणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतर, देवाण-घेवाण, भागीदारीचे करार साधारणतः दोन देशांमध्ये किंवा सरकारी संस्था अथवा मोठ्या कंपन्यांमध्ये होतात. त्यासाठी सरकारी आणि अन्य स्तरांवरून सतत प्रयत्न सुरू असतात. देशातील सर्वांत मोठी शेतकरी उत्पादक कंपनी असलेल्या सह्याद्री फार्म्सने युरोपातील कंपनीशी थेट करार केला आहे. यासाठी आम्ही पाच कोटी रुपयांची गुंतवणूक केली. निर्यातक्षम द्राक्ष वाणाच्या विस्तारासाठी पुढाकार घेतल्याचे शिंदे यांनी सांगितले. ‘आरा’ वाणामुळे आगामी काळात राज्यात द्राक्ष उत्पादन क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध  होणार आहे. विशिष्ट फळपिकाच्या जागतिक वाणाचे देशातील सर्वाधिकार मिळविणारी सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी देशातील पहिली शेतकरी उत्पादक कंपनी ठरली आहे. त्यामुळे देशाच्या फलोत्पादन क्षेत्रात ही अत्यंत महत्त्वाची आणि अभिमानास्पद घटना आहे. सह्याद्रीशी संलग्न सभासद शेतकऱ्यांसाठी पेटंटेड ‘आरा’ वाण उपलब्ध झाले असून, अन्य इच्छुक शेतकऱ्यांसाठी ‘आरा’ची नोंदणी सह्याद्रीने सुरू केल्याचे  शिंदे यांनी सांगितले. ‘ग्रापा व्हरायटीज लि.’ या कंपनीने उत्पादन आणि मार्केटिंगचे हक्क काही देशांमध्ये ज्युपिटर ग्रुपला प्रदान केले असून, ज्युपिटरने भारतातील भागीदार म्हणून सह्याद्रीची निवड केली आहे. ग्रापा व्हरायटीज लि. ही द्राक्ष वाण विकसित करणारी कंपनी आहे. कंपनीने वाइन व खाण्याच्या द्राक्षाचे अनेक वाण विकसित केले आहेत. ‘ग्रापा’च्या सर्व वाणांचे स्वामित्व हक्क (पेटंट) सुरक्षित आहेत. या कंपनीचे ‘आरा’ आणि ‘अर्ली स्वीट्स’ हे दोन जगप्रसिद्ध निर्यातक्षम वाण जगभर लोकप्रिय आहेत. सहा खंडांमधील २४ देशांत ‘आरा’ वाणाची लागवड आहे. पेटंटेड ‘आरा’चे व्हाइट, रेड आणि ब्लॅक या तीन प्रकारांत निर्यातक्षम वाण उपलब्ध आहेत. रंग आणि वाण  व्हाइट - आरा १५, ३०, ८ A-१९+४ इत्यादी . रेड - आरा १३, १९, २८,२९ इत्यादी . ब्लॅक - आरा २७, ३२, A १४ इत्यादी .

वाणाची वैशिष्ट्ये  साखर-अ‍ॅसिडचे उत्तम संतुलन (१९ ते २० ब्रिक्स)  संजीवकांची कमी आवश्यकता, त्यामुळे उत्पादन खर्च कमी  मण्याचा आकार २२ ते ४२ मि.मी.  मोठा व टिकाऊ घड  पाऊस आणि प्रतिकूल हवामानास प्रतिकारक्षम  उष्णकटिबंधीय तसेच वाळवंटी प्रदेशातही योग्य  हेक्टरी २७ ते ३५ टनांपर्यंत उत्पादकता  रंगीत वाण, अत्यंत देखणा व टिकाऊ रंग  खाण्यास कुरकुरीत व भरपूर गर, उत्तम चव  निर्यातीसाठी सर्वोत्तम.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com