#SakalSurvey : हवाई हल्ल्यांचा युतीला ‘ॲडव्हान्टेज’

शेतीचे प्रश्‍न, महागाई,भ्रष्टाचार, गैरव्यवहार आणि बेरोजगारी हेच मतदारांच्या मनातील महत्त्वाचे मुद्दे आहेत.निवडणुकीचे रणशिंग लवकरच फुंकले जाईल. जागावाटप, रोड शो, प्रचार, बैठकांना आता वेग येऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर 'सकाळ' घेत आहे महाराष्ट्राच्या मनाचा कानोसा...
हवाई हल्ल्यांचा युतीला ‘ॲडव्हान्टेज’
हवाई हल्ल्यांचा युतीला ‘ॲडव्हान्टेज’

पुलवामा येथे केन्द्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारतीय हवाईदलाने केलेले हल्ले आणि महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने घेतलेला लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांना एकत्र सामोरे जाण्याचा निर्णय या दोन घडामोडींमुळे आजच्या घटकेला महाराष्ट्रातल्या मतदारांची पसंती भाजप-शिवसेना युतीकडे झुकलेली दिसते आहे. ‘सकाळ’ने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून समोर आलेल्या चित्रानुसार राज्यातील शहरी मतदारसंघात युतीला मतदारांची अधिक पसंती दिसून येते; तर ग्रामीण भागात अजूनही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला मतदारांची थोडी अधिक पसंती असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राच्या मनाचा कल सर्वसाधारणपणे युतीला अनुकूलता असला तरी विशेषतः ग्रामीण भागातल्या मतदारांनासाठी युतीला प्रयत्न करावे लागणार आहेत.पाकिस्तानात आणि पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये भारतीय हवाईदलाने केलेल्या हल्ल्यांमुळे नरेंद्र मोदींना आणि पर्यायाने महाराष्ट्रात युतीला फायदा होईल असे मतदारांना वाटत आहे. महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होणार की नाही, याबाबत अनिश्‍चिततेचे वातावरण होते. आता प्रत्यक्षात युतीची घोषणा झालेली असल्याने त्याचेही परिणाम युतीची परिस्थिती सुधारण्यात झाले आहेत.  पुलवामा हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर काश्‍मीर प्रश्‍नाकडे मोदी सरकारने पुरेशा गांभीर्याने पाहिले का? या प्रश्‍नावरही असा प्रश्‍न विचारण्यात आला असता मोदी सरकारने हा प्रश्‍न गांभीर्याने हाताळला असे मानणारा वर्ग मोठा आहे.  येत्या लोकसभा निवडणुकीत तुमची पसंती कोणाला असेल, असा थेट प्रश्‍न ‘सकाळ’च्या या व्यापक सर्वेक्षणात मतदारांना विचारण्यात आला होता.  याशिवाय भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या तळांवर केलेले हवाई हल्ले, प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची धुरा सोपविण्याचा काँग्रेसला लाभ होईल का? अशा प्रश्‍नांचाही समावेश होता. याशिवाय मोदी सरकारची कामगिरी, विरोधी पक्षाची एकजूट, मतदान करताना कोणते विषय प्राधान्याने विचारात घेणार आदी मुद्यांविषयीही जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न या सर्वेक्षणादरम्यान करण्यात आला.  लोकसभेसाठी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत राज्यातल्या ४८ टक्के मतदारांनी भाजप-शिवसेना युतीला पसंती दर्शवली आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पसंती देणाऱ्या मतदारांची टक्केवारी ४५ टक्के आहे. सात टक्के मतदारांनी आपली पसंती इतर पक्षांना असेल असे नमूद केले आहे. युती आणि आघाडीला मिळणाऱ्या पसंतीच्या टक्केवारीतला या क्षणाचा फरक तीन टक्‍क्‍यांचा आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांच्या काळात युती आणि आघाडी मतदारांसमोर कोणते मुद्दे घेऊन जातात तसेच अन्य पक्ष आणि आघाड्यांना पसंती देणारे सात टक्के मतदार त्यांच्या मतावर ठाम रहातात की युती किंवा आघाडीकडे वळतात हे निर्णायक ठरू शकेल.  शहरी भागात मात्र युती आणि आघाडीच्या पसंतीतला फरक थोडा अधिक रुंदावलेला आहे. भाजप-शिवसेना युतीला शहरी महराष्ट्रातील ४९ टक्के मतदारांची पसंती आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला शहरी भागात ४३ टक्के मतदारांची पसंती आहे. तर शहरी भागातील आठ टक्के मतदारांनी इतर पक्षांना पसंती दिली आहे.  काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर ग्रामीण भागातील मतदारांचा अधिक भरवसा असल्याचे दिसते. ग्रामीण भागात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला ४८ टक्के मतदारांची पसंती आहे, तर भाजप - शिवसेना युतीला ४६ टक्के मतदारांची पसंती आहे. इथे मात्र पसंतीक्रमात आघाडी फक्त दोन टक्‍क्‍यांनी युतीच्या पुढे आहे. ग्रामीण भागातील सहा टक्के मतदारांची पसंती इतर पक्षांना आहे.  स्त्री व पुरुष मतदारांचा स्वतंत्र विचार केला तर तर ४९ टक्के पुरुष भाजप-शिवसेनेच्या पाठीशी आणि ४४ टक्के पुरुष काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी आहेत. महिला मतदारांपैकी ४७ टक्के जणींनी भाजप -शिवसेना युतीला आणि ४५ टक्के जणींनी काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला पसंती दिली आहे. भाजप-सेना युतीवर पसंतीची मोहोर उमटवणाऱ्यांमध्ये १८ ते ४५ वयोगटातील ४८ टक्के मतदारांचा समावेश आहे. ४६ ते ६० या वयोगटातही तेवढेच मतदार युतीच्या पाठीशी असल्याचे चित्र आहे.  भारतीय हवाई दलाने केलेल्या लक्ष्यवेधी हल्ल्यांचा मोदी सरकारला आगामी निवडणुकांत फायदा होईल, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६१ टक्के मतदारांना वाटते तर मोदी सरकारला या हल्ल्यांचा निवडणुकीच्या दृष्टीने काहीच फायदा होणार नाही, असे १७ टक्के मतदारांना वाटते. लाभ होईल किंवा नाही हे सांगता येणार नाही असे म्हणणारे २२ टक्के मतदार आहेत.  पुलवामा हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर विचार करताना, मोदी सरकारने काश्‍मीर प्रश्‍न गांभीर्याने हाताळला असे मत ४३ टक्के मतदारांनी व्यक्त केले आहे. काश्‍मीरप्रश्‍नाकडे मोदी सरकारने पुरेशा गांभीर्याने पाहिले नाही असे वाटणाऱ्यांची संख्या ३५ टक्के आहे. प्रियांका गांधी यांच्याकडे उत्तर प्रदेशची धुरा सोपण्याच्या काँग्रेस पक्षाच्या निर्णयाचा त्या पक्षाला निवडणुकीत थेट फायदा होईल, असे महाराष्ट्रातील ४३ टक्के मतदारांना वाटते. तर काँग्रेसला लाभ होणार नाही, असे २४ टक्के मतदारांना वाटते. प्रियांका गांधींमुळे काँग्रेसच्या परिस्थितीत काहीच फरक पडणार नाही, असे १८ टक्के मतदारांना वाटते. प्रियांका गांधी यांच्यामुळे काँग्रेसला लाभ होईल असे ४२ टक्के शहरी आणि ४४ टक्के ग्रामीण मतदारांना वाटते. प्रियांका गांधींच्या नेतृत्त्वाबद्दल महाराष्ट्रातील मतदारांमध्येही उत्सुकता आहे. त्यामुळे निवडणूक प्रचारादरम्यान प्रियांका गांधी महाराष्ट्रात सभा घेतील का, आणि किती सभा आणि कुठे घेतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.  गेल्या चार वर्षांतील निवडणुकांच्या तुलनेत येत्या सार्वत्रिक निवडणुकीवरही नरेंद्र मोदी यांचा प्रभाव राहील, असे मत या सर्वेक्षणात व्यक्त झाले आहे. मोदी यांचा निवडणुकांवर पूर्णपणे प्रभाव राहील असे मानणारे ३४ टक्के मतदार आहेत, तर मोदींचा प्रभाव काही प्रमाणात असेल असे ४० टक्के मतदारांना वाटते. मोदींचा फारसा प्रभाव राहणार नाही असे १९ टक्के मतदारांना वाटते. सात टक्के मतदारांनी या प्रश्‍नाला ‘सांगता येत नाही’ असे उत्तर दिले आहे. आगामी निवडणुकांवर मोदींचा पूर्णपणे प्रभाव राहील असे वाटणारे शहरी मतदार तुलनेने थोडे जास्त (३५ टक्के) आहेत. मोदींची प्रभाव काही प्रमाणात राहील असे वाटणाऱ्या ग्रामीण भागातील संख्या ४१ टक्के आहे.  नरेंद्र मोदी यांच्या सरकारची कामगिरी ३४ टक्के मतदारांना उत्तम तर ४२ टक्के मतदारांना बरी वाटते. मोदी सरकारची कामगिरी असमाधानकारक वाटणाऱ्या मतदारांची संख्या २४ टक्के आहे.प्रबळ विरोधी पक्ष नसणे हे भाजपच्या पथ्यावर पडते आहे असे ४० टक्के मतदारांना वाटते, तर असा प्रबळ विरोधी पक्ष नसल्याचा भाजपला काही फायदा नाही, असे मानणारे २६ टक्के मतदार आहे. या बाबत सांगता येत नाही असे म्हणणारे ३४ टक्के मतदार आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीत विद्यमान पक्ष आणि खासदार दोन्ही बदलावेत, असे ३९ टक्के मतदारांना वाटते. विद्यमान खासदारच पुन्हा निवडून यावेत असे फक्त २६ टक्के मतदारांना वाटते. विद्यमान पक्षाचाच दुसरा उमेदवार निवडून यावा, असे २४ टक्के जणांना वाटते. विद्यमान पक्ष आणि खासदार दोन्ही बदलावेत असे वाटणारा ग्रामीण भागात ४२ टक्के मतदार आहे, हे विशेष. शहरी भागात हे प्रमाण ३८ टक्के आहे.  लोकसभेसाठी मतदान करताना उमेदवाराची जात, धर्म अशा वैयक्तिक पार्श्‍वभूमीपेक्षी मतदार उमेदवाराचा पक्ष, नेते आणि पक्षाची - आघाडीची राष्ट्रीय प्रश्‍नांवरील भूमिका याला अधिक महत्त्व देतात असे ३४ टक्के मतदारांचे म्हणणे आहे. त्या खालोखाल उमेदवाराची स्थानिक समस्येची जाण आणि समस्या सोडविण्याची क्षमता मतदारांना महत्त्वाची वाटते. या गोष्टीला २९ टक्के मतदार प्राधान्य देतात. उमेदवाराचे वय, शिक्षण, चारित्र्य आणि व्हीजनला १५ टक्के मतदार प्राधान्य देतात तर उमेदवाराची जात, धर्म, वर्ग आदी वैयक्तिक पार्श्‍वभूमीला प्राधान्य देणाऱ्या मतदारांची संख्या केवळ चार टक्के आहे. ‘सकाळ’ गेल्या काही वर्षांपासून वेगवेगळ्या निमित्ताने महाराष्ट्रातील मतदारांच्या मनाचा कानोसा घेत आहे. गेल्या काही सर्वेक्षणांप्रमाणे या सर्वेक्षणातही महागाई आणि भाववाढ हाच मतदारांच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. विविध मुद्‌द्‌यांना पसंतीक्रम देताना महागाईला २७ टक्के मतदारांनी पहिला पसंतीक्रम दिला आहे. त्या खालोखाल २२ टक्के मतदारांना शेतीचे प्रश्‍न आणि १५ टक्के मतदारांना बेरोजगारी हा सर्वाधिक महत्त्वाच मुद्दा वाटतो. पाकिस्तान आणि चीनशी असलेले संबंध फक्त ९ टक्के मतदारांना महत्त्वाचे वाटतात. हॅशटॅग #SakalSurvey आपल्या प्रतिक्रिया कळवा

  • facebook/SakalNews
  • twitter : @esakalupdate
  • website : www.esakal.com
  • website : www.agrowon.com
  • TV : www.saamtv.com
  • सातत्याने सर्वेक्षण राज्यातील सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांत हे सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणात विधानसभा मतदारसंघांतील स्त्री-पुरुष, शहरी-ग्रामीण, शिक्षण, व्यवसाय आणि वयोगट अशा प्रमुख निकषांप्रमाणे असणाऱ्या मतदार संख्येच्या रचनेचे प्रतिबिंब पडेल याची काळजी घेण्यात आली आहे.  (*सर्व आकडे टक्क्यांत, अपूर्णांकातील संख्या जवळच्या पूर्णांकामध्ये रूपांतरित करण्यात आली आहे.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com