मुंबई बाजार समितीत खरेदी-विक्री होणार संगणकीकृत

बदलत्या पणन कायद्यांमुळे बाजार समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असताना, आता बाजार समित्या आणि बाजार घटकांनी देखील पांरपरिक व्यवस्थेतून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
The sale and purchase will be computerized in the Mumbai Market Committee
The sale and purchase will be computerized in the Mumbai Market Committee

पुणे ः बदलत्या पणन कायद्यांमुळे बाजार समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला असताना, आता बाजार समित्या आणि बाजार घटकांनी देखील पांरपरिक व्यवस्थेतून बाहेर पडण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. वर्षानुवर्षे बाजार समित्या आणि अडत्यांवर ‘चोर’ असल्याचा ठपका पुसून काढण्यासाठी मुंबई बाजार समितीने शेतीमालाचे संपूर्ण व्यवहार संगणकीकृत करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. यासाठी बाजार समितीने प्रायोगिक तत्त्वावर केलेला प्रयोग यशस्वी झाला असून, लवकरच सविस्तर प्रस्ताव मान्यतेसाठी पणन संचालनालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

याबाबत बाजार समितीचे ज्येष्ठ संचालक व फळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय पानसरे यांनी माहिती दिली. पानसरे म्हणाले, की बदलत्या पणन कायद्यांमुळे बाजार समित्यांच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. खासगी बाजार समित्या, थेट पणन, संपूर्ण नियमनमुक्ती आदी विविध बदलांमुळे बाजार समितीमधील शेतीमालाची आवक कमी होऊन, बाजार समित्यांचे उत्पन्न कमी होण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीमध्ये बाजार समित्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी विविध प्रयत्न करण्याची गरज आहे. यासाठी आम्ही बाजार समितीमधील संपूर्ण शेतीमालाचे व्यवहार संगणकीकृत करण्याचा प्रयत्न करत आहोत.

संगणकीकरणामध्ये प्रत्येक वाहनांमधील शेतीमालाची प्रवेशद्वारावर संगणकीकृत नोंद होणार आहे. प्रत्येक शेतीमालाचे डाग कोणत्या अडत्याच्या गाळ्यावर आले आहेत, याची नोंद होऊन त्याचा संदेश मोबाईलवर पाठविण्यात येणार आहे. यासाठी व्हॉट्‍सॲप, टेलिग्रामसारख्या समाजमाध्यमांवरील ॲपचा वापर केला जाणार आहे. तसेच शेतीमालाची विक्री झाल्यावर जावक गेटवरच त्याची नोंद होऊन, बाजारशुल्क (सेस) ग्राहकांकडून प्रवेशशुल्कांची आकारणी केली जाणार आहे. यामुळे वर्षाच्‍या शेवटी होणारी बाजार शुल्काची रक्कम दररोज बाजार समितीला मिळणार आहे. तसेच प्रत्येक शेतीमालाचे दर तासाला किती दराने विक्री होत आहे. याचे दर बाजार समितीच्या वेबसाइटवर लाइव्ह असणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना शेअर बाजाराप्रमाणे प्रत्येक शेतीमालाच्या दरातील चढउतार कळणार आहे. अशी संकल्पना असून, याचा फायदा शेतकरी, अडते, खरेदीदार, व्यापारी आणि बाजार समितीला होणार आहे. तसेच प्रत्येक तासाचे चढउतार इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे राज्य आणि देशपातळीवर पाठविण्यात येणार आहे.

शेअर मार्केटसारखे दिसणार शेतीमालाचे बाजारभाव दर तासाला कोणत्या शेतीमालाला काय दर आहेत. किती चढ-उतार आहेत याची माहिती बाजार समितीच्या वेबसाइटसह इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे राज्य, देशपातळीवर पाठविण्यात येणार आहे, असेही पानसरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना अधिकाधिक पारदर्शी सेवेसाठी संगणकीकृत आणि पेपरलेस बाजार समिती करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यासाठीचे काही प्रयोग यशस्वी झाले असून, टप्प्याटप्प्याने सर्व घटकांच्या समन्वयाने आणि विश्‍वासात घेऊन, डिजिटल बाजार समिती करण्याचे स्वप्न आहे. - अशोक डक,  सभापती, मुंबई बाजार समिती

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com