वाशीम जिल्ह्यात चारा, पाणीटंचाईमुळे जनावरांची विक्री

वाशीम जिल्ह्यात चारा, पाणीटंचाईमुळे जनावरांची विक्री
वाशीम जिल्ह्यात चारा, पाणीटंचाईमुळे जनावरांची विक्री

वाशीम : जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत जनावरांचे पालन करण्यात अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. चारा व पाण्याची प्रचंड टंचाई भेडसावत आहे. परिणामी जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याने चित्र आहे. या वर्षीही जिल्ह्यात दुष्काळसदृश स्थितीमुळे उन्हाळ्याच्या सुरवातीलाच आठवडी बाजारात विक्रीसाठी गुरांची संख्या प्रचंड वाढली आहे. कमी किमतीमध्ये विक्री करणारे पशुपालक जास्त आणि खरेदी करणारे कमी अशी स्थिती वाशीम येथील बाजारात दिसून आली. 

सध्या बैलांची संख्या कमी झाली असून दरसुद्धा वाढले. दरवर्षी निर्माण होणाऱ्या पाणी व चाराटंचाईने पशुपालक त्रस्त होत आहेत. त्यातच जनावरांसाठी राखीव असणाऱ्या शासकीय जमिनीवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. दरवर्षी पर्जन्यमान कमी होत असल्याने चाऱ्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला. विकत घेऊन चारा पुरविणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शेतकरी जनावरे विक्रीस काढत आहेत. उन्हाळ्याच्या सुरवातीलाच आठवडी बाजारात विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाशीम येथील बाजारात रविवारी (ता. ३) एक हजारावर बैल विक्रीसाठी आले होते. बहुतांश पशुपालकांनी चारा व पाणीटंचाईमुळे बैलांची विक्री करीत असल्याचे सांगितले. 

सोयाबीन कुटाराच्या विक्रीत वाढ 

ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे नाहीत, असे शेतकरी चारा म्हणून गावातील इतर पशुपालकांना सोयाबीन, हरभरा व तुरीचे कुटार देत होते. मात्र गत काही वर्षांपासून या कुटाराची विक्री होत असल्याने, ते जिल्ह्याबाहेर जात असल्याने चाराटंचाई वाढत आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेर सोया प्लँटमध्ये बॉयरलमध्ये जाळण्यासाठी कुटाराचा वापर वाढला आहे. परिणामी गुरांसाठी चारा मिळणे कठीण झाले आहे. 

कुटार खरेदीसाठी गावोगावी एजंट

गावातील सोयाबीन, हरभरा व तुरीचे कुटार खरेदी करण्यासाठी सोया प्लँटधारकांनी गावागावामध्ये एजंट नेमून खरेदी सुरू केली. एक ट्रॅक्टर पाच हजार रुपयांमध्ये घेऊन पाचशे रुपये एजंटला देण्याचा प्रकार जिल्ह्यात सुरू आहे. हे कुटार सोया प्लँटवर बॉयलरमध्ये जाळण्यासाठी १५०० रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com