मराठवाड्यात फळे, भाजीपाल्याची ८१ हजार किलोवर विक्री

औरंगाबाद : ८१ हजार ४३४ किलो फळे-भाजीपाला विक्रीतून जवळपास २० लाख २८ हजार २२५ रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली. ​
 Sales of fruits, vegetables in Marathwada for over 81 thousand kg
Sales of fruits, vegetables in Marathwada for over 81 thousand kg

औरंगाबाद : एकीकडे दररोज सकाळीच भरणाऱ्या किरकोळ भाजीपाला-फळे विक्री बाजारात गर्दी घटण्याचे नाव घेत नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांच्या थेट फळे भाजीपाला विक्रीच्या उपक्रमाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. हा उपक्रम ग्राहकांच्या पसंतीस पडला असल्याची स्थिती आहे. ८१ हजार ४३४ किलो फळे-भाजीपाला विक्रीतून जवळपास २० लाख २८ हजार २२५ रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली. ​

संचारबंदीच्या काळात नागरिकांना उत्तम दर्जाचा भाजीपाला व फळे घरपोच वाजवी दरात मिळावी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागातर्फे २९ मार्चपासून शेतकरी ते ग्राहक फळे व भाजीपाला विक्रीचा उपक्रम सुरू करण्यात आला. या उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी कृषी विभागाच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद दिला. सुरुवातीला जवळपास तेवीस शेतकरी व शेतकरी गटांनी सुरू केलेला उपक्रम आता ४७ शेतकरी व शेतकरी गटांपर्यंत पोहोचला आहे. 

रविवारी (ता. ५) या उपक्रमांतर्गत सर्वाधिक २३ शेतकरी गटांनी एकाच दिवशी आपल्याकडील उत्पादित फळे व भाजीपाल्याची थेट ग्राहकांना घरपोच विक्री केली.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन ग्राहकांना वाजवी दरात फळे, भाजीपाला विक्री करण्यात येत आहेत. त्यामुळे एकीकडे बाजारात होणारी गर्दी पाहता असे उपक्रम केवळ शेतकरी हितामुळेच नव्हे, तर गर्दी टाळण्यासाठी व्यापक स्तरावर राबविण्याची गरज आहे. रविवारी एकाच दिवशी जवळपास ४ लाख ७५ हजार ८१० रुपयांच्या फळे - भाजीपाला विक्रीची उलाढाल झाली. एकाच दिवसात जवळपास ८८९३ भाजीपाला, तर १० हजार चार किलो फळे शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत पोचविली. 

२० लाख २८ हजार २२५ रुपयांची उलाढाल

कृषी विभागाच्या माहितीनुसार, २९ मार्चपासून सुरू झालेल्या या उपक्रमांतर्गत ५ एप्रिलपर्यंत ३५ हजार ३०८ किलो भाजीपाला, तर ४६ हजार १२६ किलो फळे शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांना विक्री केली. ८१ हजार ४३४ किलो फळे-भाजीपाला विक्रीतून जवळपास २० लाख २८ हजार २२५ रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे यांनी दिली.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com