`समृद्धी` २०२२ मध्ये खुला होणार

मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पात १९ कृषी समृद्धी केंद्रांचा (नवनगरे) विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) १९ पैकी ८ कृषी समृद्धी केंद्रांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
sumruddhi
sumruddhi

मुंबई: मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पात १९ कृषी समृद्धी केंद्रांचा (नवनगरे) विकास करण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) १९ पैकी ८ कृषी समृद्धी केंद्रांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील वर्षी जूनपासून ८ पैकी ६ केंद्रांची जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल आणि त्यानंतर त्यांच्या विकासाला सुरुवात होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी दिली.  तसेच सध्या समृद्धी महामार्गाचे बांधकाम वेगात सुरु असून १ मे २०२२ पर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला असेल, अशी माहितीही त्यांनी दिली. मुंबई ते नागपूर ७०१ कि.मी.चा समृद्धी महामार्ग बांधणीचे काम वेगात सुरु आहे. या प्रकल्पाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. यातील पहिला ५०० कि.मी.चा नागपूर ते शिर्डी हा टप्पा येत्या मे महिन्यात होणार आहे. तर संपूर्ण मार्ग मे २०२२ पर्यंत सुरु होणार आहे. हा प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने जात असताना आता ‘एमएसआरडीसी’ने या प्रकल्पातील कृषी समृद्धी केंद्रांच्या कामाला वेग दिला आहे. या प्रकल्पात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात येणार आहे. तर या मार्गालगतच्या परिसराचा विकास करण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठीच १९ कृषी समृद्धी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. सिडकोप्रमाणे ‘एमएसआरडीसी’ नियोजन प्राधिकरण म्हणून १९ केंद्रांचा विकास करणार आहे.  टाऊनशिपसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात येणार आहेत. या जमिनीवर शाळा, रस्ते, गार्डन, समाज मंदिर, वीज, पाणी, निवासी-व्यावसायिक जागा अशा बाबी विकसित केल्या जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील विरुल आणि केलझार, बुलडाण्यातील सावरगाव, मेहकर, औरंगाबादमधील हडस पिंपळगाव, घाईगव, बबतारा आणि ठाण्यातील फुलगाळे या ८ केंद्रांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.  या १९ कृषी समृद्धी केंद्रांमुळे समृद्धी महामार्गालगतच्या परिसराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. हा परिसर कृषी आणि उद्योग हब बनणार असल्याचा दावा यानिमित्ताने केला जात आहे. सहा केंद्रांसाठी भू-संपादन सुरु पहिल्या टप्प्यातील ८ केंद्रांपैकी ६ केंद्रांसाठी जमीन संपादनाचे काम सुरु आहे. याबाबत शेतकऱ्यांशी बोलणी-चर्चा सुरु आहे. त्यांना योग्य आणि चांगला मोबदला देण्यात येत आहे. तर शेतकरीही या प्रकल्पाला होकार देत आहेत. ६० ते ७० टक्के जमीन संपादन लवकरच होण्याची शक्यता आहे. १०० टक्के संपादन जून २०२१मध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांची संमती, त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

   समृद्धी महामार्ग दृष्टिक्षेपात

  • ७०१ किलो मीटर लांबीचा द्रुतगती महामार्ग 
  • दहा जिल्हे, २६ तालुके आणि ३९२ गावांना जोडणार
  • नागपूर आणि मुंबई अंतर ८ तासांत पूर्ण करता येणार
  • महामार्गावर १९ ठिकाणी कृषी समृद्धी केंद्रे उभारणार
  • ५५ हजार ३३२ कोटी रुपये खर्च अपेक्षित
  • पहिल्या टप्प्यातील कृषी समृद्धी केंद्रे विरुलः वर्धा केलझारः वर्धा सावरगावः बुलडाणा मेहकरः बुलडाणा हडस पिंपळगावः औरंगाबाद घाईगावः औरंगाबाद बबताराः औरंगाबाद फुलगाळेः ठाणे

    दुसऱ्या टप्प्यातील कृषी समृद्धी केंद्रे हिंगणाः नागपूर धामणगावः अमरावती  नांदगावः अमरावती कारंजाः वाशीम मंगळूरपीरः वाशीम मालेगावः वाशीम जामवाडीः जालना सावली विहारः नगर कासगावः ठाणे लेनाडः ठाणे मौजे चिंचवली: ठाणे

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com