वांगी भागातील शेतकरी कालवा फोडण्याच्या पवित्र्यात

वांगी भागातील शेतकरी कालवा फोडण्याच्या पवित्र्यात
वांगी भागातील शेतकरी कालवा फोडण्याच्या पवित्र्यात

वांगी, जि. सांगली ः वांगी (ता. कडेगाव) परिसरात सोडलेल्या ताकारीचे पाणी बंद होऊन महिना उलटल्याने या भागातील पिकांची पाण्याअभावी होरपळ सुरू झाली आहे. मुख्य कालवा दुथडी भरून वाहत असताना आम्ही बघत बसायचे का? कालवाच फोडतो, असा पवित्रा वांगी गावातील शेतकऱ्यांनी सोमवारी (ता. १५) घेतला. दरम्यान, पाणी सोडण्याबाबत शाखा अभियंता संजय पाटील यांना निवेदन दिले.

ताकारीच्या तिसऱ्या आवर्तनाचे पाणी २ ते १५ मार्चअखेर वांगीपर्यंत २० कि.मी. देण्यात आले होते. त्यानंतर उन्हाळ्याची वाढलेली तीव्रता, जमिनीत पाणी मुरण्याचे वाढलेले प्रमाण आणि पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे महिनाभरातच पाण्याचा खडखडाट झाला आहे. वाढलेले ऊसक्षेत्र आणि उन्हामुळे वाढलेला पाण्याचा वापर यामुळे विहिरी आटल्या तर बोअर बंद पडल्या आहेत. परिणामी पिके कशी वाचवायची या चिंतेने शेतकरी भेदरला आहे. लाभक्षेत्रातील काही गावांच्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत आटले आहेत. सध्या ताकारीचे पाणी कालव्याच्या अंतिम टोकाला कि.मी.१४४ वर सुरू आहे.

वांगी भागाला पुढील पाण्यासंदर्भात वांगी पाटबंधारे कार्यालय आणि संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मिळत नाही. म्हणून वांगीचे सरपंच डाॅ. विजय होनमाने यांच्या नेतृत्वाखाली शंभरांवर शेतकऱ्यांनी ताकारीच्या वांगी कार्यालयावर सोमवारी (ता. १५) सकाळी अचानक मोर्चा नेला.त्यास शाखा अभियंता संजय पाटील सामोरे गेले असता ‘‘सगळ्यात जास्त पाणीपट्टी आमचा परिसर देत असताना आम्हास वेळेत पाणी का दिले जात नाही? महिनाभर थांबल्यावरही पाणी मिळण्यासाठी मोर्चाच काढायचा का? ऐन उन्हाळ्यात गरजू पिकांना पाणी द्यायचे सोडून कालव्याचे टेस्टिंग कशासाठी घेत बसलाय? खासदारांना फक्त तासगाव तालुक्यातील मतदान हवंय का?’’ अशा प्रश्नांची सरबत्ती शेतकऱ्यांनी केली असता पाटील निरुत्तर झाले. 

कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी अजून चार दिवस पाणी देणे शक्य नसल्याचे कळविलेय तेव्हा शेतकरी संतापले व मुख्य कालवा फोडायला निघू लागले असता संजय पाटील यांनी शेतकऱ्यांना अडवून मनधरणी केली आणि आजचा दिवस मुदत मागून घेतली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com