चंदनाच्या झाडाला हवे वनखात्याचे संरक्षण

​शासनाच्या मान्यतेनुसार चंदन लागवड केली. मात्र, काही चंदनाच्या झाडाचे हरणांकडून नुकसान झाले. वन विभागाला कळवले, पंचनामा केला, मात्र लागवड केलेल्या चंदनाच्या झाडाला नुकसानभरपाई देता येत नाही. त्यामुळे चंदनाला संरक्षण नसल्याची बाबत स्पष्ट झाली. सरकारी पातळीवर चंदनाला संरक्षण मिळाले तर नुकसान झाल्यावर भरपाई मिळेल यासाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत. - राजेंद्र गाडेकर, शेतकरी, पिंपळनेर, ता. पारनेर
चंदन
चंदन

नगर ः वनप्राण्यांमुळे शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या पिकांचे, झाडांचे नुकसान झाले तर नुकसानभरपाई मिळते. मात्र, चंदनाच्या झाडाचे नुकसान झाल्यास नुकसानभरपाई मिळत नसल्याची बाब उघड झाली. त्यामुळे आता चंदनाची लागवड करणऱ्या शेतकऱ्यांनी चंदनाच्या झाडाला वन विभागाचे संरक्षण मिळावे, अशी मागणी केली आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करून पाठपुरावाही सुरू केला आहे. चंदनाच्या झाडाला संरक्षण मिळण्याबाबत वनविभागही सकारात्मक असल्याचे दिसत आहे. राज्यात चंदन लागवडीला अधिकृत परवानगी नव्हती. मात्र, केंद्र शासनाने दोन वर्षांपूर्वी काढलेल्या अध्यादेशानुसार चंदनाची लागवड करता येत आहे. त्यानुसार राज्यात साधारण तीनशेच्या जवळपास शेतकऱ्यांनी पाचशे ते सहाशे हेक्टर क्षेत्रावर चंदनाची लागवड केलेली आहे. नगर मराठवाडा, कोकणात क्षेत्र वाढत आहे. लागवडीची सातबारावर अधिकृत नोंद केलेली आहे. आता या शेतकऱ्यांचा सुगंधी लागवडीनुसार चंदन लागवडीला सरकारी अनुदान मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून चंदन लागवड उत्पादक मागणी करत आहेत. कृषिमंत्री अनिल बोंडे यांनीही त्याची दखल घेतली आहे.   वनप्राण्यांमुळे शेतपिकांचे, लागवड केलेल्या फळझाडांचे नुकसान केले तर त्याला वनविभागाकडून नुकसानभरपाई मिळते. मात्र, लागवड केलेल्या चंदनाचे नुकसान केले तर नुकसानभरपाई मिळत नाही. पिंपळनेर (ता. पारनेर) येथील चंदनाची लागवड करणारे राजेंद्र गाडेकर यांच्या चंदनाच्या झाडाचे हरणांनी नुकसान केले. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून अहवाल दिला. चंदनाला संरक्षण नसल्याने नुकसानभरपाई देण्याची तरतूद नसल्याचे बाब उघड झाली. त्यामुळे आता चंदन उत्पादक शेतकऱ्यांनी तालुका, जिल्हास्तरावरील वनविभागाच्या माध्यमातून विभाग व राज्य पातळीवर शासनाकडे पाठपुरावा करून लागवड केलेल्या चंदनाच्या झाडा संरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले जात आहे. गाडेकर यांच्या नुकसान झालेल्यांच्या अहवालानुसार जिल्हा वन विभागाकडून नाशिक वनविभागाला पत्र लिहून नुकसानभरपाई मिळण्याबाबत सकारात्मकता दर्शवली आहे.  अनेक पिके, फळझाडे यांना नुकसानभरपाई मिळण्यासाठी संरक्षण आहे. मात्र, हजारो रुपये किमतीच्या चंदनाला संरक्षण नाही. त्यामुळे चंदन लागवड वाढीसाठी संरक्षण देण्याची मागणी अधिक तीव्र होत आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com