सांगली हळद
सांगली हळद

सांगलीच्या हळदीला लाभले ‘जीआय’चे सोनेरी वलय

पुणे ः हळद म्हणजे सांगलीचीच असेच जणू समीकरण देशांतर्गत बाजारपेठेत अनेक वर्षांपासून तयार झाले आहे. भौगोलिक निर्देशांकाच्या (जीआय) माध्यमातून वेगळी ओळख तयार करण्यासाठी या हळदीला आजवर मोठी प्रतीक्षा करावी लागली. अखेर पाच ते सहा वर्षांच्या संघर्षानंतर आपल्या हळदीवर ‘जीआय’ची मोहोर उमटवण्यात सांगलीच्या शेतकऱ्यांना यश आले आहे. भारत सरकारच्या ‘भाैगाेलिक उपदर्शन रजिस्ट्री’ कार्यालयाने नुकतेच म्हणजे सात नोव्हेंबर रोजी सांगली हळद या नावाने ‘जीआय’ प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र जारी केले आहे. या निर्णयामुळे देशातील बाजारपेठ वाढण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही गुणवत्ता सिद्ध करण्याची नामी संधी सांगलीच्या हळदीला चालून आली आहे. सांगली जिल्हा हा द्राक्षे, ऊस व भाजीपाला या पिकांबरोबरच हळदीसाठीही प्रसिद्ध आहे. केवळ स्थानिक परिसरातच नव्हे तर राज्यासह देशांतर्गत बाजारपेठेतही सांगलीच्या हळदीचा डंका अनेक वर्षांपासून गाजतो आहे. भौगाेलिक निर्देशांकाच्या (जीआय) माध्यमातून या हळदीची वेगळी ओळख तयार व्हावी, देशांतर्गत बाजारपेठ वाढण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे दरवाजे खुले व्हावेत असे प्रयत्न सुरू होते.

हळद उत्पादकांचे कसाोशीचे प्रयत्न  जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील शिरढोण येथील शिवराज्य हळद उत्पादक शेतीकरी स्वयंसाहायता गटातील शेतकऱ्यांनी आपल्या हळदीला ‘जीआय’ मिळावे, यासाठी सन २०१३ पासूनच प्रयत्न सुरू केले होते. ‘जीआय’ विषयातील पुणे येथील तज्ज्ञ गणेश हिंगमिरे म्हणाले, की आम्ही सांगलीची हळद या नावाने जीआय मिळावा यासाठी भारत सरकारच्या ‘भौगाेलिक उपदर्शन रजिस्ट्री’ कार्यालयाकडे २०१४ मधील आॅगस्टमध्ये अर्ज दाखल केला होता. पण त्यासाठीचे प्रयत्न यापूर्वीपासूनच सुरू होते. सुरवातीला एका खासगी कंपनीने या हळदीच्या जीआयबाबतीत प्रस्ताव दाखल केला होता. मात्र शेतकरी म्हणून त्यांचा सहभाग त्यात कुठेच अंतर्भूत नव्हता. आम्ही ‘शिवराज्य’ शेतकरी गटाच्या नावे प्रस्ताव दाखल केला होता. त्याद्वारे सांगली हळदीचा इतिहास, गुणवैशिष्ट्ये तसेच अन्य महत्त्वाचे कागदोपत्री पुरावे उभे केले. सुमारे पाच ते सहा वर्षे आम्हाला संघर्ष करावा लागला. यात अनेक सुनावण्यांनाही सामोरे जावे लागले.

अखेर शिक्कामोर्तब    अखेर सर्व सत्यतादर्शक पुरावे व परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर ‘भौगाेलिक उपदर्शन रजिस्ट्री’ कार्यालयाने चार महिन्यांपूर्वी सांगली हळदीला शिवराज्य गटाच्या नावे ‘जीआय’ देत असल्याचे निश्‍चित केले. मात्र या निर्णयाला आक्षेप नोंदवण्याची चार महिन्यांची मुदत संपल्यानंतर नुकतेच म्हणजे सात नोव्हेंबर रोजी सांगली हळदीला प्रमाणपत्र देत जीआय मिळाल्याचे शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे हिंगमिरे यांनी सांगितले.  युरोपीय बाजारपेठेचा मार्ग मोकळा  ‘शिवराज्य’ शेतकरी गटाचे अध्यक्ष संपतराव नलवडे म्हणाले, की सन २०११ मध्ये आम्ही गटाची स्थापना केली. हळद लागवड, तंत्र प्रशिक्षण, सामूहिक विपणन, दर्जासुधार आदींच्या हेतूने आम्ही संघटित झालो होतो. आमच्या हळदीची ओळख देशात सर्वदूर आहेच. पण आता जीआय मिळाल्याने युरोपीय देशातील बाजारपेठ मिळवण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. तसे प्रयत्न करणार आहोत. अनेक काळ पाठपुरावा केल्यानंतर हे यश आम्हाला मिळाले आहे याचा आनंदच आहे. आता देशांतर्गत बाजारपेठही आमच्यासाठी अधिक व्यापक होईल. दर चांगले मिळतील. नवे ग्राहक तयार होतील. उठाव चांगला होईल. मुख्य म्हणजे गटाच्या माध्यमातून हळदीचे क्षेत्र वाढण्यासही मदत होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com