सांगली जिल्ह्यात पिके होरपळायला लागली

सांगली जिल्ह्यात पिके होरपळायला लागली
सांगली जिल्ह्यात पिके होरपळायला लागली

सांगली : आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि खानापूर तालुक्यातील रब्बी हंगामातील पिके पाण्याविना धोक्यात आली आहेत. अनेक ठिकाणी पिकांची उगवण झालीच नाही, तर काही ठिकाणी उगवलेली पिके पाण्याअभावी वाळून गेल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.   जिल्ह्यात रब्बी हंगामातील एकूण १ लाख ४३ हजार १४७ हेक्टरवर (५१ टक्के) पेरणी झाली आहे. यापैकी जत तालुक्यात ६२ टक्के, खानापूर तालुक्यात ६३ टक्के, तासगाव तालुक्यात ४३ टक्के आटपाडी तालुक्यात फक्त १९ टक्के आणि कवठेमहांकाळ ६९ टक्के पेरणी झाली आहे. यंदा खरीप हंगाम देखील साधला नाही. यामुळे शेतकरी रब्बी पिके चांगली येतील, या आशेने या हंगामातील पेरणीसाठी पुढे आले. मात्र, सुरवातीच्या काळात चांगला पाऊस झाला. त्यामुळे वाफशावर शेतकऱ्यांनी पेरणी केली. त्यानंतर पावसाने दडी मारली. परिमाणी पेरणीचे क्षेत्र कमी झाले. सुरवातीचा कमी पाऊस सोबतच परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी तालुक्‍यातील रब्बी हंगाम धोक्‍यात आला. पाण्याअभावी पिकांची अवस्था बिकट झाली आहे. भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत आहे. यामुळे पाण्यासह शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली. पाणीटंचाई असल्याने ज्वारी उतारा मिळत नसल्याने ज्वारीचे उत्पादन काहीच हाती लागणार नसल्याने शेतकरी मोठ्या विवंचनेत आहेत. पाणीटंचाई तीव्र  जत पूर्व भागातील संख, माडग्याळ, जोडरबोबलाद, उमदी, सुसलाद, कोनत्याबोबलाद यासह अनेक गावांत रब्बी हंगामाची पेरणीदेखील केली नाही. त्यातच पाण्याची टंचाई दिवसेंदिवस गंभीर होत आहे. अनेक गावांतील ग्रापंचायतीच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे. पाण्याअभावी रब्बी हंगामातील पिके वाया गेल्याने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.  योजना सुरू असूनदेखील पाणी नाही... यंदा ताकारी, म्हैसाळ आणि टेंभू उपसा सिंचन योजना सुरू करून पाणी शेतीसह पिण्याच्या पाण्यासाठी देण्याचे नियोजन झाले. पाणी मुख्य कालव्यातून वाहू लागले. मुख्य कालव्यालगत असलेल्या शेतीला पाणी मिळाले. त्यामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली. मात्र, लाभक्षेत्र असलेल्या शेतीच्या बांधावर पाणी आलेच नाही. त्यामुळे योजनांचे पाणी सुरू असूनदेखील पिकांना देता आले नाही. शेतकऱ्यांच्यातून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com