सांगली बाजार समितीत गर्दी टाळण्यासाठी सौदेच बंद 

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून, कोरोनापासून बचावासाठी गर्दी टाळावी यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत. बाजार समितीत होणारी गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणची रिटेल विक्री व सौदे बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी (ता. २२) घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
Sangli market committee closed deals to avoid congestion
Sangli market committee closed deals to avoid congestion

सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले असून, कोरोनापासून बचावासाठी गर्दी टाळावी यासाठी आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत. बाजार समितीत होणारी गर्दी टाळण्यासाठी या ठिकाणची रिटेल विक्री व सौदे बंद ठेवण्याचा निर्णय बुधवारी (ता. २२) घेण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली. 

सांगली येथील बाजार समितीत होणारी गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बुधवारी (ता. २२) झाली. 

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारावे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, पोलिस निरीक्षक श्री. तनपुरे यांच्यासह व्यापारी, पुरवठाधारक, बाजार समितीचे पदाधिकारी आदी उपस्थितीत होते. 

जिल्हाधिकारी डॉ. चौधरी म्हणाले की, मार्केट यार्डमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीला प्रतिबंध करण्यासाठी व सोशल डिस्टन्सिंग यशस्वी करण्यासाठी या ठिकाणची रिटेल विक्री पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे वैयक्तिक, घरगुती कारणासाठी कोणीही ग्राहक खरेदी करू शकणार नाही. तसेच मार्केट यार्ड परिसरातील बँक, सहकारी पतसंस्था यामधील गर्दी टाळण्यासाठी त्यांच्या वेळांमध्ये बदल करून दुपारी १२ ते सांयकाळी ५ या वेळेत त्या सुरू राहतील. सदरचा बदल हा मार्केट यार्ड परिसरातील कार्यरत असलेल्या बँका व पतसंस्थांसाठीच आहे. 

मार्केट यार्डात घेण्यात येणाऱ्या सौद्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी जमा होते ती टाळण्यासाठी आडते, पुरवठादार यांनी एकत्रित येऊन मालाच्या किंमती निश्चित कराव्यात, असेही त्यांनी निर्देशित केले. ई-नाम प्रणालीद्वारे ऑनलाइन सौदे करता येतील का याचीही चाचपणी करण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. 

पोलिस विभागामार्फत हमाल, व्यापारी, कामगार यांना देण्यात आलेले ओळखपत्र पाहुनच मार्केट यार्ड परिसरात प्रवेश देण्यात येईल. तसेच या परिसरात येणाऱ्या वाहनांचेही निर्जंतुकीकरण करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. मार्केट यार्ड परिसरात काम करणाऱ्या हमाल, व्यापारी, कामगार यांची आरोग्य शिबिरे लावून आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com