सांगलीत बेदाणा सौदे बंद 

बाजार समित्या सुरू ठेवण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. मात्र सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने कोरोनाच्या नावाखाली बेदाण्याचे बुधवार (ता. १४)पासून अनिश्‍चित काळासाठी सौदेच बंद करण्याचा अजब निर्णय घेतला आहे.
सांगलीत बेदाणा सौदे बंद 
सांगलीत बेदाणा सौदे बंद 

सांगली ः लॉकडाउनमध्ये शेतीमालाची खरेदी-विक्री करण्यासाठी बाजार समित्या सुरू ठेवण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. मात्र सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशनने कोरोनाच्या नावाखाली बेदाण्याचे बुधवार (ता. १४)पासून अनिश्‍चित काळासाठी सौदेच बंद करण्याचा अजब निर्णय घेतला आहे. याचा मोठा फटका बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची चिन्हे आहेत. 

ऐन हंगामात असोसिएशनच्या या निर्णयाने बेदाण्याच्या खरेदी-विक्रीचा प्रश्‍न उभा ठाकला आहे. गेल्या वर्षी देशभरात कोरोना विषाणू संसर्गामुळे केंद्राने अनेक निर्बंध घातले होते. बाजारपेठा, बाजार समित्या बंद होत्या. परंतु शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे होणारे नुकसान पाहता, पुन्हा बाजार समित्या सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतीमालाची खरेदी-विक्री पूर्ववत झाली. शेतकऱ्यांचा आर्थिक गाडा हळूहळू रुळावर आला. दरम्यान, पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य शासनाने बुधवारी (ता. १४) रात्री आठ वाजल्यापासून ‘ब्रेक द चेन’ या मोहिमेअंतर्गत लॉकडाउन जाहीर केला आहे. त्यामध्ये शेती उद्योग आणि बाजार समितीमधील सौदे वगळले आहेत. 

दरम्यान, सांगली-तासगाव समितीतील व्यापारी आणि कर्चमारी कोरोना बाधित झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुळात बेदाणा सौद्या दरम्यान, सुरक्षित अंतर राखून, मास्क, सॅनिटायझर वापरून सुरक्षितता बाळगता येते. मात्र हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत व्यापारी आणि कर्मचारी बाधित झाले असताना संपूर्ण सौदे बंद करण्याच्या निर्णयाचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. ऐन हंगामात असोसिएशनने घेतला हा निर्णय शेतकऱ्यांवर अन्याय करणारा असून, सध्या खरड छाटणीची कामे आर्थिक कारणाअभावी रखडण्याची शक्यता आहे. 

असोसिएशनचा अजब फतवा  अनेक व्यापारी कोरोना बाधित झाल्याने व्यापारामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी सौद्याकडे पाठ फिरवली आहे. जमाबंदी, संचारबंदी या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन करत सौदे बंद ठेवण्याचा असा फतवा असोसिएशनने काढला आहे. त्यामुळे बेदाणा विक्री कुठे करायची, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडला आहे. 

सांगली-तासगाव बाजार समितीत व्यापारी आणि कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत. परिणामी भीती निर्माण झाली असल्याने धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सौदे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.  - राजेंद्र कुंभार,  अध्यक्ष, सांगली-तासगाव बेदाणा असोसिएशन 

बेदाणा सौदे बंद करण्याचा निर्णय असोसिएशनने त्यांच्या पातळीवर घेतला आहे. आम्ही फळे, धान्य यासह अन्य सौदे सुरू ठेवणार आहोत. बेदाणा सौदे सुरू ठेवायचे की नाही, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक होत आहे. त्यात निर्णय होईल.  - दिनकर पाटील,  सभापती, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती 

बेदाणा असोसिएशनने सौदे बंद करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. बेदाण्याची विक्री होण्यास अडथळे निर्माण होतील. त्याचा परिणाम दरावर होईल. शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून सौदे काढणे शक्य आहे.  - संजय बरगाले, उत्पादक शेतकरी, मालगाव, ता. मिरज 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com