कृषी विद्यापीठांच्या बळकटीकरणाला प्राधान्य : संजय धोत्रे

महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार खासदार संजय धोत्रे यांनी स्वीकारल्यानंतर डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्षपदाचा पदभार खासदार संजय धोत्रे यांनी स्वीकारल्यानंतर डॉ. के.पी. विश्वनाथा यांनी शुभेच्छा दिल्या.

पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांची अधीस्वीकृती टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठांना बळकट केले जाईल, असे संकेत महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेला नवनियुक्त उपाध्यक्ष खासदार संजय धोत्रे यांनी दिले. परिषदेचे तत्कालीन उपाध्यक्ष डॉ. राम खर्चे यांना राज्य शासनाने मुदतवाढ दिली नाही. त्यामुळे काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदावर खा.धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली. पदभाव स्वीकारताना अनौपचारिक चर्चेत त्यांनी विद्यापीठांना बळकट करण्याकडे आपला कल राहील, असे स्पष्ट केले. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, अकोल्याचे महापौर विजय अग्रवाल, महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथा, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, माजी कृषी संचालक जयंत महल्ले, कृषी परिषदेचे शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, विस्तार संचालक डॉ. विठ्ठलराव शिर्के तसेच इतर अधिकारी या वेळी उपस्थित होते. ‘‘राज्यातील कृषी विद्यापीठांची गुणवत्तावाढ आणि संशोधनाला चालना देण्याचा आपला प्रय़त्न राहील. विद्यापीठांची अधिस्वीकृती कायम राहण्यासाठी अत्यावश्यक असलेली भरती केली जाईल. विद्यापीठे आणि कृषी परिषदेच्या समन्वयात वाढ केली जाईल,’’ असेही खा. धोत्रे म्हणाले. माजी कुलगुरू डॉ. मायंदे या वेळी म्हणाले, की राज्यातील प्रत्येक विद्यापीठाची स्वतःची वेगळी क्षमता आणि वैशिष्ट्ये आहेत. त्यानुसार अडीअडचणी समजून घेत विद्यापीठांमधील मूलभूत संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. विद्यापीठांचे बळकटीकरण हे राज्याच्या कृषी प्रगतीला उपयुक्त ठरणारे राहील. राज्यातील शेती आणि शेतकरी बिकट वाटचालीतून जात असताना कृषी परिषद आणि कृषी विद्यापीठांची भूमिका अतिशय मोलाची आहे, असे मत श्री.तिवारी यांनी व्यक्त केले. ‘परिषदेचे ऩवे उपाध्यक्ष शेतकरी आणि शेती क्षेत्राची अतिशय बारकाईने माहिती असलेले आहेत. त्यातून परिषदेच्या कामकाजाला वेग येईल,’ असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com