हरितक्रांती घडविताना सुपीकता हरवली: संजय धोत्रे

Sanjay Dhotre
Sanjay Dhotre

अकोला : अन्नधान्य निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी देशात हरितक्रांती घडविण्यात आली. ती घडविताना नवतंत्रज्ञान, आधुनिकीकरण व मोठ्या प्रमाणात रासायनिक घटकांचा उपयोग करण्यात आला. त्यामुळे हरितक्रांती घडली; परंतु रसायनांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता हरवली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज येथील जमिनीमध्ये पाणी थांबत नाही आणि सिंचनाची मोठी समस्या निर्माण झाली. ही समस्या सोडवायची असेल, तर जमिनीची सुपीकता वाढविणे अगत्याचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि सिंचन सहयोग अकोला यांच्या संयुक्तपणे आयोजित दोनदिवसीय ‘सिंचन व पाण्याचा कार्यक्षम वापर’ या विषयावर २० व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे शनिवारी (ता. १८) कृषी विद्यापीठाच्या डॉ. के. आर. ठाकरे सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांचे हस्ते उद्‍घाटन झाले, या वेळी हे बोलत होते.   व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले, आमदार हरीश पिंपळे,  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आंतरराष्ट्रीय जल सिंचन व जल निस्सारण आयोगाचे माजी सरकार्यवाह डॉ. माधवराव चितळे, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डॉ. दी. मा. मोरे,  विदर्भ पाटबंधारे विकासचे सचिव तथा कार्यकारी संचालक अविनाश सुर्वे, तापी खोरे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक संजय कुलकर्णी, सिंचन सहयोग अकोल्याचे सचिव तथा अकोला जिल्हा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता चिन्मय वाकोडे, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे उपाध्यक्ष डॉ. बापू अडकिने, अमरावती येथील जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता राजेंद्र जलतारे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कृषी अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले,  संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. दिलीप मानकर, कृषी अभियांत्रिकी अधिष्ठाता डॉ. महेंद्र नागदेवे यांची प्रमुख उपस्थिती होती.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत काळे यांनी केले. डॉ. दी. मा. मोरे यांनी प्रास्ताविक सादर केले, तर संजयकुमार अवस्थी यांनी उपस्थितांचे आभार मानले. उद्‍घाटन सत्रानंतर अविनाश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली ‘सिंचनासाठी नलिका वितरण प्रणाली’ या विषयावर मार्गदर्शन सत्र झाले. त्यामध्ये डॉ. संजय दहासहस्र, हरिदास ताठे, डॉ. बापू अडकिने, डॉ. प्रदीप फलगे यांनी मार्गदर्शन केले. दोनदिवसीय या सिंचन परिषदेमध्‍ये एकूण १२ सत्रांत मार्गदर्शन केले जाणार असून, रविवारी (ता. १९) परिषदेचा समारोप होणार आहे.   पुरस्कार देऊन गौरव उद्‍घाटन सत्रावेळी सिंचन आणि शेती क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्रयोगशील शेतकरी पुरस्कार संग्राम देशमुख, प्रयोगशील महिला शेतकरी पुरस्कार आदर्श महिला शेतकरी गट घोटवडे (वंदना दाभाडे), उत्कृष्ट सिंचन कार्यकर्ता पुरस्कार पुरुषोत्तम देशमुख मालेगाव, कै. ल. सी. कोकीळ विशेष सिंचन पुरस्कार संभाजी कोडक (अवंढी), सिंचनमित्र पुरस्कार राजगोंडा पाटील सांगली, कै. विमलबाई बेलसरे पुरस्कार रवींद्र इंगोले (चकवा) यांना तर, विद्याताई पवार, द.मा. रेड्डी, विजय भागानगरे, ज्ञानेश्वर बोडखे (पुणे) यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. जनजागृतीची जाणीव हे शुभ लक्षण ‘सिंचन व पाण्याचा कार्यक्षम वापर’ या महत्त्वपूर्ण विषयावर सिंचन परिषदेचे आयोजन करण्यात आले आणि सिंचनावर चिंतन होत आहे. सुरक्षित भविष्याच्या नियोजनातील हे एक महत्त्वाचे पाऊल आहेच, सोबतच पाण्याविषयी जनजागृतीची जाणीव हे शुभ लक्षण असल्याचे मत, डॉ. माधवराव चितळे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. जिल्ह्यात कृषी, सिंचन विकास साधू सिंचनाशिवाय विकासाला पर्याय नाही. विद्यापीठात आयोजित या सिंचन परिषदेतून चांगले चिंतन होत आहे. या परिषदेत चांगले मार्गदर्शक, अभ्यासक, शास्त्रज्ञ उपस्थित आहेत. त्यांच्याकडून सिंचन विषयावर यथायोग्य दिशा मिळवून जिल्ह्यात कृषी व सिंचन विकास साधू, असा विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी व्यक्त केला. उपलब्ध पाण्याचे योग्य व्यवस्थापन व्हावे सर्वांत कमी सिंचन क्षेत्र विदर्भात आहे. त्यामुळे या सिंचन परिषदेचा विदर्भातील शेतकऱ्यांना, जनतेला निश्चितच मोठा लाभ होईल. मात्र वैदर्भीयांनी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करायला शिकावे आणि उपलब्ध पाण्याचा नियोजनात्मक व पुरेपूर वापर करण्यावर भर द्यावा, असे मत व्यक्त करीत, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने कोणताही अतिरिक्त खर्च न करता विद्यापीठ प्रक्षेत्रात जिल्हा प्रशासनाच्या सहयोगातून आठ मोठे तलाव निर्माण केले आणि त्यातून ५५० एकर ओलित केल्याचे, कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com