आळंदीत आज संजीवन समाधी दिन सोहळा

saint dnyaneshwar maharaj
saint dnyaneshwar maharaj

आळंदी, जि. पुणे  ः इंद्रायणी तीर्थस्नान...माउलींचे समाधी दर्शनाने तृप्त झालेल्या वारकऱ्यांची पावले पुन्हा परतीच्या दिशेने वळू लागली आहेत. मात्र परंपरेने आलेले वारकरी माउलींच्या आजच्या (ता. २५) संजीवन समाधी दिन सोहळ्यासाठी मुक्कामी असून भजन, कीर्तनात दंग  आहेत.  राज्यभरातून वारकरी गेली पाच ते सहा दिवसांपासून परंपरेने घराण्यात चालत आलेली वारी रुजू करण्यासाठी माउलीचरणी लीन झाले होते. वारकऱ्यांनी कीर्तन, प्रवचन आणि भजनाचा ठेका धरला होता. एकादशीमुळे शनिवारी राहुट्या आणि फडांमधून माउलीनामाचा अखंड जागर सुरू होता. आज द्वादशी असल्याने पहाटेपासूनच इंद्रायणी तीरावर स्नानासाठी वारकऱ्यांनी गर्दी केली होती. घाटावर महिला वारकऱ्यांना कपडे बदलण्यासाठी फायबरची चेंजिंग रूमची व्यवस्था होती. यात्रेकरूंचे कपडे चोरी जाऊ नयेत, यासाठी साध्या वेशात पोलिसांचा बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमेरेही तैनात होते. पोलिसांकडून कपडे आणि पैशाचे पाकीट सुरक्षित ठेवा, अशा सूचना वारकऱ्यांना वारंवार देण्यात येत होत्या.  दरम्यान, रविवारी पहाटे ठीक दोन वाजता माउलींच्या समाधीवर देवस्थानच्या वतीने पवमान अभिषेक करण्यात आला. त्यानंतर अडीचच्या सुमारास परंपरेप्रमाणे प्रांताधिकारी संजय तेली यांच्या हस्ते शासकीय पंचोपचार पूजा करण्यात आली. या वेळी पिंपरी पोलिस आयुक्तालयाच्या परिमंडल एकच्या उपायुक्त स्मिता पाटील, खेडचे तहसीलदार सुचित्रा आमले, मुख्याधिकारी समीर भूमकर यांची उपस्थिती होती. त्यानंतर भाविकांचे दर्शन सुरू करण्यात आले. दरम्यानच्या काळात पहाटे तीन ते सहा या वेळेत मुक्ताई मंडपात काकडा भजन तर माउलींच्या चांदीच्या पादुकांवर भाविकांच्या पूजा सुरू होत्या.  भाज्यांचे भाव चढे  द्वादशीनिमित्त आळंदीतील भाजी मंडईत वारकऱ्यांची भाजी  खरेदीसाठी गर्दी होती. चढ्या भावाने भाज्यांची विक्री झाली. पावसामुळे शेतीमालाचे नुकसान झाल्यामुळे बाजारात भाज्यांची टंचाई जाणवत होती, त्यामुळे भाव जादा होते. किरकोळ विक्रेत्यांकडेही भाज्या महाग होत्या. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com