ग्रेडिंग, कोटिंगकडे संत्रा उत्पादकांचा कल; प्रकल्पांची संख्या पोहोचली १२ वर

निर्यातदार देशांसह ग्राहकांकडून ग्रेडिंग, कोटिंग असलेल्या फळांचीच मागणी होत असल्याने पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेकडे संत्रा उत्पादकशेतकऱ्यांचा कल वाढला आहे.पाच वर्षांत अशा प्रकल्पांची एक डझनावर पोहोचली आहे.
ग्रेडिंग, कोटिंगकडे संत्रा उत्पादकांचा कल; प्रकल्पांची संख्या पोहोचली १२ वर
ग्रेडिंग, कोटिंगकडे संत्रा उत्पादकांचा कल; प्रकल्पांची संख्या पोहोचली १२ वर

नागपूर ः विदर्भाचा कॅलिफोर्निया अशी ओळख असलेल्या अमरावती जिल्ह्यातच पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेचा अभाव होता. संत्रा उत्पादकदेखील याबाबत जागरूक नव्हते. आता मात्र निर्यातदार देशांसह ग्राहकांकडून ग्रेडिंग, कोटिंग असलेल्या फळांचीच मागणी होत असल्याने पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. परिणामी ग्रेडिंग, कोटिंग करून देणाऱ्या व्यवसायांची संख्या अवघ्या पाच वर्षांत एक डझनावर पोहोचली आहे. त्याआधारे वर्षभरात सुमारे एक लाख टन संत्र्यावर प्रक्रिया होते.

अमरावती जिल्ह्यातील वरुड, मोर्शी या दोन तालुक्यांत संत्रा लागवड सर्वाधिक आहे. त्यामुळे हा भाग विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जातो. संत्रा विक्री हुंडी, टन, क्रेट अशा पारंपरिक पद्धतीनेच होत होती. शेतकऱ्यांकडून घेतलेला संत्रा नंतर पश्‍चिम बंगालमार्गे बांगलादेशला निर्यात होत होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ‘अपेडा’, कृषी विभाग यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांमध्ये याविषयी जागृती वाढीस लागली. आता शेतकरी समूहदेखील निर्यातीसाठी सरसावले आहेत.

दरम्यान, निर्यातदारांकडून ग्रेडिंग, वॅक्‍स कोटिंग केलेल्या संत्र्याची मागणी होऊ लागली आहे. नागपुरी संत्रा फळांचा सर्वांत मोठा आयातदार असलेल्या बांगलादेशने तर तशी सक्‍तीच केली आहे. परिणामी, शेतकऱ्यांकडून पहिल्या टप्प्यातील ग्रेडिंग, वॅक्‍स कोटिंगवर भर दिला जात आहे. २०१५ पूर्वी वरुड येथील ताजू खान व सोनू खान या दोनच व्यवसायिकांचे खासगी स्तरावरील ग्रेडिंग, कोटिंग प्रकल्प होते. गायवाडी येथे महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचा प्रकल्प होता. परंतु अनेकांनी तो चालविण्यासाठी घेत अपेक्षित उत्पन्नाच्या अभावी सोडून दिला. त्यामुळे तो सुरू कमी आणि बंद अधिक काळ होता. गेल्या काही वर्षांपासून महाऑरेंजच्या माध्यमातून या प्रकल्पाचे व्यवस्थापन होत आहे. विदर्भातील पहिल्या हायटेक प्रकल्पाची उभारणी तालुक्‍यातील सालबर्डी येथे नागपूरी मॅडरीन फार्मर प्रोड्यूसर कंपनी अंतर्गत नव्या ऑरेंज प्रोसेसिंग प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. अडीच कोटी रुपयांच्या या प्रकल्पात ७० लाख रुपयांची यंत्रणा बसविण्यात आली आहे. राज्यातील हा एकमेव हायटेक प्रकल्प असल्याचा दावा केला जात आहे. यामध्ये ग्रेडिंग, कोटिंगसाठी खास सेंसर असलेली यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामधील सेंसर एका सेकंदात ४० फोटो काढतो. यंत्रात निश्‍चित (सेट) केल्याप्रमाणे रंग, आकार आणि वजन यांनुसार फळांचे वर्गीकरण करता येते. एका तासाला ९ टन संत्रा फळांवर प्रक्रिया करण्याची क्षमता या संयंत्राची आहे. त्यानुसार, वर्षभरात दहा हजार टन संत्र्यावर प्रक्रिया होते. नीलेश रोडे अध्यक्ष असलेल्या या शेतकरी उत्पादक कंपनीने शेतकऱ्यांचा संत्रा थेट खरेदी केला. प्रक्रियेवर होतो अडीच रुपयांचा खर्च संत्र्याचे ग्रेडिंग आणि कोटिंग केले जात असल्याने त्याची टिकवणक्षमता वाढीस लागते. वॅक्‍सचा कोट संत्र्याच्या सालीवर चढत असल्याने त्याची चकाकी वाढण्यास मदत होते. परिणामी, ग्राहक आकर्षित होतात. या प्रक्रियेवर अवघा अडीच रुपये किलोप्रमाणे खर्च होतो, अशी माहिती नव्या ऑरेंज प्रोसेसिंगचे संचालक नीलेश रोडे यांनी दिली. संत्रा लागवड क्षेत्र (हेक्‍टरमध्ये) राज्य ः ९५ हजार अमरावती ः ७० हजार नागपूर ः २० हजार उर्वरित राज्य ः ५ हजार वर्षभरात १ लाख टन संत्र्यावर प्रक्रिया संत्र्याखालील लागवड क्षेत्र सर्वाधिक असलेल्या अमरावती जिल्ह्यात २०१५ नंतर १२ ग्रेडिंग, कोटिंगची उभारणी झाली आहे. एका प्रकल्पाची सरासरी ७ ते १० हजार टन अशी क्षमता आहे. त्यानुसार १२ प्रकल्पांच्या माध्यमातून १ लाख टनावर प्रक्रिया होते. प्रतिक्रिया... २०१५ पर्यंत जेमतेम तीन प्रक्रिया प्रकल्प होते. शेतकऱ्यांमध्ये निर्यातविषयक जागरूकता वाढल्याने ते आता पहिल्या टप्प्यातील ग्रेडिंग, कोटिंगवर भर देत आहेत. त्यामुळे अमरावती जिल्ह्यात अशा प्रकल्पांची संख्या बारावर पोचली आहे. - श्रीधर ठाकरे, कार्यकारी संचालक, महाऑरेंज 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com