कोरोनाच्या लढ्यात सरपंच आघाडीवर 

राज्यभर ४० हजार गावे आहेत. त्यामुळे रोग नियंत्रणासाठी सरकारी यंत्रणा किंवा मंत्री, आमदार, खासदारांना मर्यादा आहेत. गावे सुरक्षित ठेवण्याचं काम केवळ सरपंच करू शकतात. आम्ही कोरोगाव तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतींचे सरपंच एकत्रितपणे लढतो आहोत. आतापर्यत तरी सर्व गावे कोरोनामुक्त ठेवली आहेत. - जितेंद्र भोसले, सरपंच, नागझरी (कोरेगाव, जि. सातारा)
corona
corona

पुणे: कोरोना विषाणू साथीला रोखण्यासाठी सरकारने पुकारलेल्या युध्दात राज्यातील अनेक ग्रामपंचायती खाद्याला खादा देत लढत आहेत. उपाशी गावकऱ्यांना अन्नपाणी पोहचविण्यापासून ते अगदी वयोवृध्द ग्रामस्थांची दाढीकटींग करण्यापर्यंत काही सरपंचांनी स्वतःला झोकून दिले आहे.  अनेक सरपंचांनी ‘मी सुरक्षित, माझा गाव सुरक्षित, माझा देश सुरक्षित’ असे घोषवाक्य देत कामे सुरू ठेवली आहेत. हसुरपाडीचे (गडहिंग्लज,जि. कोल्हापूर) सरपंच संजय कांबळे यांनी ज्येष्ठांची उपासमार होवू नये म्हणून गावातील दुकानदारांची बैठक घेतली. या ज्येष्ठांची मुले शहरांकडे अडकून पडल्याने तेथून पैसे येणे बंद आहे. यामुळे दुकानदार आता उधारीवर जीवनावश्यक वस्तू देत आहेत.  श्री.कांबळे हे रोज गावाची स्वच्छता करतात. गावकऱ्यांना मोफत आरोग्य साधनांचे वाटप करतात. गावात कोरोना दक्षता समिती स्थापन केली आहे. समितीची बैठक मोबाईल कॉन्फ्रन्सवर घेतली जाते.  भूमिहिनांना अन्न, गावात धान्यबॅंक  नागझरी गावात जितेंद्र भोसले अन्नधान्यापासून वंचित राहिलेलया मजूर व भूमिहिनांना सातारा जिल्हा बॅंकेच्या माध्यमातून तेल, तांदूळ, साखर वाटण्यात आले. गावात एकच रस्ता खुला असून नोंदवही ठेवली गेली आहे. या गावातील २७५ मुले दुबईत असतात. त्यातील ७० मुले गावात आली आहेत. मात्र, गावाला रोगमुक्त ठेवण्यात आले आहे. 

दुधोंडी (पलुस,जि.सांगली) गावात स्वच्छतेसाठी सरपंच विजय आरबुने, उपसरपंच रवींद्र नलावडे, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष डॉ. नागराज रानमाळे यांनी स्वतः पाठीवर फवारणी पंप घेत परिसरात निर्जंतुकरणाची मोहिम राबविली. गावात धान्य बॅंक सुरू केली आहे. कोरोना नियंत्रणात सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना खजूर वाटप देखील करण्यात आले. 

शेतकऱ्याने पाठवली बेल्जियममधून मदत  नांद्राकोळी (जि. बुलढाणा) गावात स्वच्छतेसाठी सरपंच संजय काळवाघे यांनी पुढाकार घेतला. गावात तांदूळ वाटप केले गेले. दारूभट्टी उखडून टाकण्यात आली. विशेष म्हणजे गावचे शेतकरी व भूमिपूत्र सोपान हुडेकर सध्या बेल्जियमला असतात. तेथून त्यांनी पाठविलेल्या आर्थिक मदतीतून गावकऱ्यांना ७०० मास्क वाटण्यात आले. मास्क न वापरल्यास ५०० रुपये दंड देखील लावला जातो, अशी माहिती सतिश उबाळे यांनी दिली. 

गडहिंग्लजच्या हसुरवाडीचे सरपंच संजय कांबळे यांचा दाढीकटींग उपक्रम मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. ‘‘लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद आहेत. दाढीकटींग होत नसल्याने ज्येष्ठ ग्रामस्थ अडचणीत आले. त्यामुळे मी पुढाकार घेत लोकांची दाढीकटींग सुरू केली आहे,’’ असे श्री.कांबळे आनंदाने सांगतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com