थेट जनतेतून सरपंच निवड रद्द करण्याला विरोध

Sarpanch selection should be made directly from the public
Sarpanch selection should be made directly from the public

नगर/पुणे ः थेट सरपंच जनतेतून निवडला जात आहे. मात्र, हा नियम रद्द होऊन पुन्हा सदस्यांतूनच सरपंच निवडला जाणार असल्याबाबत गेल्या दोन दिवसांपासून सरपंचांत चर्चा सुरू झाली आहे. मात्र ‘थेट जनतेतून सरपंच निवड’ योग्य असल्याची बहुतांश सरपंचांची भूमिका आहे. 

राज्य सरपंच परिषदेनेही सरपंचाची निवड थेट जनतेतून असावी यासाठी भूमिका घेतली असून निवड रद्द झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. तर अखिल भारतीय सरपंच परिषदेने मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवून विरोध दर्शविला आहे.

राज्य सरपंच परिषदने निवड रद्द झाली तर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. अखिल भारतीय सरपंच परिषदेचे अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. ‘‘थेट सरपंच निवड रद्द केल्याने आता ग्रामपंचायतीमध्ये पुन्हा धनदांडगे बळावणार नाहीत याची काळजी सरकारला घ्यावी लागेल. नगरपालिकेला पक्षांतर बंदी कायदा लागू करताना ग्रामपंचायतींना मात्र वगळण्याचा प्रकार होतो आहे. ग्रामपंचायतीमध्ये देखील दोन तृतीयांश बहुमत असल्याशिवाय पक्षांतर होणार नाही, असे धोरण सरकारने ठरविल्यास ग्रामपंचायतींना स्थिरता मिळेल,’’ असे परिषदेचे म्हणणे आहे.

सरपंच जनतेतून निवडला जात आहे ही चांगली बाब आहे. हा निर्णय बदलला जाणार हे अधिकृत सांगितले जात नसले तरी तशा हालचाली दिसत आहेत. परंतु, निर्णय रद्द झाला तर परिषद लढा उभारेल.  दत्ता काकडे, अध्यक्ष, राज्य सरपंच परिषद 

थेट निवडीतून सामान्य कुटुंबातील, ग्रामविकासासाठी काम करणाऱ्या माणसाला संधी मिळत आहे. गावविकासाचे काम करण्यासाठी आणि राजकारण बाजूला ठेवण्यासाठी हा जनतेतून सरपंच होणे महत्त्वाचे आहे.  किशोर गणवीर, सरपंच कोदेगाव, ता. सावनेर, जि. नागपूर 

जनतेतून निवड झालेल्या सरपंचांना विकासकामांबाबत निर्णय घेणे सोपे जाते. तर सदस्यांमधून नियुक्तीमुळे सदस्य सारखे त्रास देत असतात. विविध कारणांनी ब्लॅकमेल करतात. यामुळे कामे होत नाहीत. त्यामुळे नियुक्ती ही जनतेतूनच असावी. - बबन बारवे, ठाकरवाडी चास, ता. आंबेगाव, जि. पुणे थेट सरपंच निवडीमुळे जास्त अधिकार मिळाले आहेत. सदस्यांमधून निवड झाल्यास हे अधिकार कमी होतील. विकासकामांना खिळ बसेल. - सविता भांगरे, निगडे, ता. मावळ, जि. पुणे

माझी नियुक्ती सदस्यांमधून झाली होती. नुकताच मी राजीनामा दिला आहे. मात्र, सरपंचांची निवड ही सदस्यांमधूनच व्हावी. थेट निवड झालेले सरपंच सदस्यांना विचारत नाहीत. त्यामुळे सदस्यांच्या वॉर्डमध्ये निधी मिळत नाही. त्यामुळे सदस्यांमधूनच निवड व्हावी. या मताची मी आहे. - गायत्री चिखले, पिंपरी दुमला, ता. शिरुर, जि. पुणे

लोकनियुक्त सरपंच हा पूर्ण गावाचा असतो. यामुळे तो त्यांच्याशी बांधिल असतो. निर्णय रद्द करायचा असेल, तर आमदार खासदारांची निवडसुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी मतदान करुन करावी. - भाग्यश्री पाचपुते, बोरीबेल, ता. दौंड, जि. पुणे  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com