सातारा जिल्ह्यात ‘एक गाव एक पाणंद रस्ता’ मोहीम

साताऱ्यातील शेतबांधावरील रस्त्यांचा वाद कायमचा मिटणार 
साताऱ्यातील शेतबांधावरील रस्त्यांचा वाद कायमचा मिटणार 

सातारा ः शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी असलेल्या अनेक पाणंद रस्त्यांवर अतिक्रमणाचे जाळे पसरलेले असते. त्यातून पुन्हा वाद होऊन तो रस्ताच बंद केला जातो. असे पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्‍त करण्याबरोबरच ते सुस्थितीत बनविण्यासाठी पालकमंत्री शेत, पाणंद रस्ते योजनेअंतर्गत जिल्हा प्रशासनाने ‘एक गाव एक पाणंद रस्ता’ मोहीम राबविली आहे. सध्या केवळ २४५ प्रस्ताव प्राप्त झाले असून, आठवड्यात सर्व गावांतून हे प्रस्ताव मागविले आहेत. 

शेतीमालाची वाहतूक करण्याबाबत शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘पालकमंत्री शेत-पाणंद रस्ते योजना’ जाहीर केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वाहतूक करणे सुलभ होणार आहे. मात्र, या योजनेला जिल्ह्यात अद्याप आवश्यक असा प्रतिसाद मिळालेला नाही. शेतीतील कामासाठी विविध यंत्रांचा वापर केला जातो. परंतु, शेतरस्ते व पाणंद रस्त्यांच्या माध्यमातून शेतीतील कामांसाठी आवश्‍यक असणाऱ्या यंत्रसामग्रीची  वाहतूक करणे, शेतीमालाची वाहतूक करणे, तसेच पावसाळ्यात शेतात येणे-जाणे करणे या बाबी शेतकऱ्यांसाठी अडचणीच्या ठरतात. 

या योजनेच्या माध्यमातून अतिक्रमणमुक्त झालेले शेत-पाणंद रस्ते, शेतावर जाणारी पायवाट तसेच गाडीरस्ता, एका गावातून दुसऱ्या गावाला जाणारे रस्ते पक्के करणे याबरोबरच गावातील शेत व पाणंद रस्ते अतिक्रमणमुक्त करून पक्‍या रस्त्याला जोडणे या बाबी केल्या जाणार आहेत. रस्त्याचे काम दर्जेदार करण्यासाठी शासनाकडून प्रतिकिलोमीटरला ५० हजार रुपये दिले जाणार आहेत. उर्वरित निधी लोकसहभागातून द्यावा लागणार आहे. 

या रस्त्याचे तातडीने मोजणी करण्याचे आदेश असून, त्याचा खर्च शासनाचा असणार आहे. शिवाय, अतिक्रमणाबाबतचा वाद गाव अथवा तालुका पातळीवर मिटविला जाणार आहे. सध्या २४५ प्राप्त प्रस्ताव असून, त्यासाठी दोन कोटी ३३ लाख निधीची आवश्यकता आहे. एक कोटी पाच लाखांचा निधी शासनाकडून, एक कोटी निधीची तरतूद डीपीसीतून केली जाणार आहे.

तालुकानिहाय प्रस्तावांची संख्या  कोरेगाव १२३, वाई १८, खंडाळा चार, महाबळेश्‍वर २६, माण १२, खटाव १८, कऱ्हाड २१, जावळी २३. सातारा, फलटण, पाटण येथून प्रस्ताव आलेले नाहीत. प्रत्येक गावातील एक पाणंद रस्त्याचे काम या योजनेतून करण्यासाठी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी महसूल तसेच संबंधित यंत्रणेला नुकत्याच सूचना दिल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com