सातारा जिल्ह्यातील ऊस उत्पादक मेटाकुटीला

सातारा ः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिल्लक असलेला ऊस साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे.
In Satara district Sugarcane grower surfing
In Satara district Sugarcane grower surfing

सातारा ः जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शिल्लक असलेला ऊस साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरत आहे. जिल्ह्यात वाढलेल्या उसाचे क्षेत्र तसेच अनेक कारखान्यांची विस्कळित झालेली तोडणी यंत्रणा, यामुळे ऊस वेळेत तुटत नाही. त्यामुळे शिल्लक उसाच्या क्षेत्रापैकी ७० टक्के उसाला तुरे आले आहेत. उत्पादनात घट होऊ लागली आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

जिल्ह्यातील १५ पैकी १३ कारखान्यांनाकडून ऊस गाळप सुरू आहे. या तेरा कारखान्यांकडून ८० लाख ४० हजार ६९७ मेट्रीक टन ऊस गाळपाद्वारे ८५ लाख ६९ हजार ७५५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. सरासरी १०.६६ टक्के सरासरी साखर उतारा मिळत आहे. यामध्ये सहा सहकारी साखर कारखान्यांकडून ३३ लाख ४६ हजार ४२० मेट्रीक टन गाळपाद्वारे ३८ लाख ७८ हजार ३१५ क्विंटल साखर निर्मिती करत सरासरी ११.५९ टक्के साखर उतारा मिळत आहे. 

सात खासगी कारखान्यांनी ४६ लाख ९४ हजार २७७ मेट्रिक टन गाळपाद्वारे ४६ लाख ९१ हजार ४४० क्विंटल साखर निर्मिती करत ९.९९ टक्क साखर उतारा मिळाला आहे. हंगामाच्या सुरवातीपासून ऊस तोडणी यंत्रणा पूर्ण क्षमतेने न आल्याने एकूणच हंगामावर परिणाम दिसून येऊ लागला आहे. किसनवीर व खंडाळा कारखान्याने गाळप सुरू न झाल्याने कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. 

मजुरांकडून मोठी लूट

ऊस वेळेत तुटावा, या साठी शेतकऱ्यांनाकडून वाटेल ते केले जात आहे. या समस्येचा ऊसतोड मजुरांकडून फायदा घेतला जात आहे. एकरी पाच ते सहा हजार रुपये तसेच ट्रॅक्टर ड्रॉयव्हरकडून १०० ते २०० रुपये टीप अशी मागणी केली जात आहे. पैसे न दिल्यास ‘उसात घाण आहे’, ‘साप दिसला’, ‘बिबट्या आहे’, ‘पाणी आहे’, ‘रस्ता चांगला नाही’ अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन तोडणी टाळली जात आहे. कारखाना व्यवस्थापनाकडे तक्रार करूनही फारशी कारवाई होत नसल्यामुळे शेतकऱ्यांनाही पैसे द्यावे लागत आहेत.

साखर कारखान्यांच्या नार्केतपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. उसाच्या क्षेत्राच्या तुलनेत आणि कमी प्रमाणात असलेली तोडणी यंत्रणा, कमी गाळप क्षमता, यामुळे सध्या मेळ बसत नसल्याने जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणात ऊस शिल्लक आहे. जिल्ह्यातील सर्व ऊस संपत नाही, तोपर्यंत गाळप बंद करू नये. ऊस शिल्लक असताना गाळप बंद केल्यास आंदोलनासह कायदेशीर लढा स्वाभिमानीकडून दिला जाईल. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com