साताऱ्यात कमी दूध दरामुळे उत्पन्न, भांडवली खर्चाचा मेळ बसेना

दूध संकलन संस्थांकडून दूध दरात कपात केली जात असल्यामुळे मिळणारे उत्पन्न व भांडवली खर्च यांचा मेळ बसत नसल्याने दुग्ध व्यवसाय तोट्यात सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
In Satara, due to low milk prices, income and capital expenditure did not match
In Satara, due to low milk prices, income and capital expenditure did not match

सातारा ः दुष्काळग्रस्त तसेच बागायती भागातील शेतकऱ्यांना आधार देणारा दुग्ध व्यवसाय दराअभावी अडचणीत आला आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर मागणी नसल्याचे कारण देत दूध संकलन संस्थांकडून दूध दरात कपात केली जात असल्यामुळे मिळणारे उत्पन्न व भांडवली खर्च यांचा मेळ बसत नसल्याने दुग्ध व्यवसाय तोट्यात सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात गाय आणि म्हशीचे मिळून प्रतिदिन सरासरी १६ लाख लीटर दूध संकलन होते. यामध्ये परजिल्ह्यातील सहा ते साडेसहा लाख तर जिल्ह्यतील नऊ ते साडेनऊ लाख लीटर दुधाचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वाधिक दूध व्यवसाय दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये केला जातो. मार्चपासून लॅाकडाउन सुरू झाल्याने दूध संकलनावर मर्यादा आल्या होत्या. त्यानंतर मात्र दूध संकलन सुरळीत झाले होते. जून महिन्याच्या सुरुवातीपासून गायीच्या दूध उत्पादनात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. ही वाढ सुमारे ७० हजार लीटरपर्यंत आहे. मात्र ‘कोरोना’मुळे अजूनही जनजीवन विस्कळीत आहे. लग्न समारंभ, चहा विक्रेते, उपपदार्थ आणि पावडर निर्मिती आदींवर मर्यादा आल्याने दुधाची मागणी कमी झाल्याचे सांगितले जात आहे.

परिणामी दूध दरात कपात होऊ लागल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. गायीच्या दुधाला २५ ते ३० रुपये लीटर मिळणारा दर सध्या १५ ते २० रुपयांवर आला असल्याचे शेतकरी सांगतात. यामुळे मिळणारे दर व होणारा खर्च याचे गणित जुळत नसल्याने दूध धंदा तोट्यात गेला आहे. दुधाला दर कमी दिले जात असताना पशुखाद्याचे दरात मात्र वाढले आहेत. पशुखाद्य दरात सरासरी ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. यामुळे दूध व्यवसाय आता कसा चालवायचा हा शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे. जनावरे बाजार सुरळीत सुरू नसल्याने खरेदी-विक्री ठप्प आहे. जनावरे बदल करणे किंवा विक्री करणे शक्य होत नाही.

सध्या ३.५/८.५ फॅट असलेल्या गायीच्या दुधाला सहकारी संस्थांकडून २५ तर खासगी संस्थांकडून २२ ते २३ रुपये दिला जात आहे. ‘कोरोना’च्या अगोदर शेतकऱ्यांना गायीच्या दुधासाठी प्रतिलीटर ३२ रुपयांपर्यंत दर मिळत होता. त्यानंतर मात्र दूध दराची अवस्था बिकट होत गेली. उन्हाळ्यात दुधाची मागणी वाढत असते, मात्र हाच हंगाम वाया गेल्याने संकलन संस्थांचे अर्थकारण बिघडले आहे. दुधाची गणिते जुळण्यासाठी गायीच्या दुधाला किमान ३० ते ३२ रुपये लीटर दर मिळावा अशी मागणी दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.

दुधाचे दर कमी दिल्यास संस्थांकडे विचारणा करता येते. मात्र पशुखाद्यांचे दर नियंत्रित नसल्यास कंपन्यांना जबाबदार धरले जात नाही. यामुळे कंपन्यांकडून पशुखाद्याचे दर वारंवार वाढविले जातात. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते. दूध दराप्रमाणे पशुखाद्याचा दर्जा व दर यावर नियंत्रण असणे आवश्यक आहे.

सध्या गायीच्या दुधाला मिळणारा दर व संगोपन, चाऱ्यासाठी होणारा खर्च हा मेळ बसत नसल्यामुळे हा व्यवसाय करणे परवडत नाही. हा शेतीपूरक सुरू राहण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे शिल्लक राहण्यासाठी दुधाला किमान ३० ते ३२ रुपये दर दिला जावा. - सुनील धुमाळ, आदर्की, जि. सातारा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com