मालविक्रीसाठी ३५ शेतकरी कंपन्या एकाच छताखाली 

शेतकऱ्यांना ‘शेतीमाल पिकवता येतो, मात्र विकता येत नाही’ असा समज खोटा ठरविणारी शेतकऱ्यांची जिद्दी पिढी उदयास येऊ पाहत आहे.
satara
satara

शेतकऱ्यांना ‘शेतीमाल पिकवता येतो, मात्र विकता येत नाही’ असा समज खोटा ठरविणारी शेतकऱ्यांची जिद्दी पिढी उदयास येऊ पाहत आहे. शेतीमालाची विक्री कशी आणि कुठे करायची याबाबतची मर्यादा शेतकऱ्यांना भेडसावत असते. मात्र मर्यादेवर नव्याने स्थापन झालेल्या शेतकरी कंपन्यांनी मात करण्याचे ठरविले आहे. रिच अॅग्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीने म्हसवे (ता. सातारा) येथे ‘सातारा फार्मर मार्ट’च्या माध्यमातून जिल्ह्यातील ३५ फार्मर कंपन्यांनी उत्पादित शेतीमालाची विक्री सुरू केल्याने शेतकऱ्यांना चांगला दर तसेच ग्राहकांना कमी दरात शेतीमाल मिळू लागला आहे. 

सातारा शहरापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गानजीक लिंब (ता. सातारा) येथील अशोक करंजे, संदीप शिंदे, रवींद्र कांबळे, प्रभाकर गायकवाड, भास्कर सांवत, बाळकृष्ण शिंदे, मदन सोनमळे, अमोल जाधव, राजेंद्र सावंत, शिल्पा करंजे यांनी एकत्र रिची अॅग्रो प्रोड्यूसर शेतकरी कंपनीची स्थापना केली. शेती जरी प्रमुख व्यवसाय असला, तरी शेतीमाल कसा आणि कुठे विकायचा म्हणजे चांगला दर मिळेल ही समस्या सतत भेडसावत होती. यामुळे नुसती कंपनी स्थापन करून उपयोग नाही, तर विक्री व्यवस्था उभी केली पाहिजे असा मनात विचार येत असल्याने यावर काही उपाय करता येईल असा शोध सुरू केला. कंपनीच्या नावे लिंब परिसरात दहा गुंठे शेतजमीन खरेदी होती. मार्गदर्शन व नवीन माहिती होण्यासाठी बारामती केव्हीके येथेही भेट देऊन काही प्रशिक्षणे घेतली. सुरुवातीच्या काळात सोयाबीन बीजोत्पादन केले. कंपनीचे ठोस व्यवसाय असावा यातून तेलघाणा सुरू करण्याचा विचार पुढे आला. 

दरम्यान, पुणे शहरात शेतकऱ्यांनी मार्ट सुरू केले असल्याचे समजल्यावर त्यांनी भेट दिली. हा व्यवसाय योग्य वाटल्याने कंपनीच्या दहा गुंठे क्षेत्रात शेतकरी कंपनीच्या माध्यमातून हा व्यवसाय करण्याचा विचार सुरू केला. या दरम्यान जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी ‘विकेल ते पिकेल’ या कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत शेतकरी मार्ट हा चांगला व्यवसाय असून, या व्यवसायामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी कंपन्या, महिला बचत गटाकडून उत्पादित केलेल्या वस्तूस दालन उपलब्ध होईल. शेतकरी ते थेट ग्राहक अशी विक्री व्यवस्था निर्माण होईल. मात्र हा व्यवसाय राष्ट्रीय महामार्गावर करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यातून सातारा शहरापासून सुमारे दहा किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गालगतची एक इमारत भाडेतत्त्वावर घेण्यात आली. त्यामध्ये सातारा फार्मर मार्ट या नावाने हा व्यवसाय सुरू करण्यात आला. 

राज्याचे कृषी आयुक्त धीरजकुमार यांच्या हस्ते तर सहसंचालक दशरथ तांबाळे, विजयकुमार राऊत यांच्या या व्यवसायाचे उद्‌घाटन झाले. या मार्टमध्ये स्वत:च्या कंपनीकडून तयार होणारा शेतीमाल तसेच जिल्ह्यातील इतर शेतकरी कंपन्यांचा उत्पादित होणारा शेतीमाल विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग व बारामती केव्हीके यांच्या खते, औषधाच्या डीलरशिप घेण्यात आल्या आहेत. या मार्टला उभारणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, तालुका कृषी अधिकारी अजित पिसाळ, अमर निंबाळकर यांची मदत झाली आहे. या मार्टला आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.  सातारा शेतकरी मार्टमधील प्रमुखबाबी  - जिल्ह्यातील ३५ शेतकरी कंपन्यांच्या शेतीमाल विक्रीसाठी  - महिला बचत गटाच्या उत्पादनांना बारमाही दालन उपलब्ध  - प्रत्येक शेतकरी कंपनीच्या माल ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था 

- शेतकरीनिर्मित विविध प्रकारची रोपांची नर्सरी  - सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठा, खते विक्रीसाठी उपलब्ध  - शेतकरी ते थेट ग्राहक दोघांचे हित साधले  - मार्टवर लक्ष राहण्यासाठी प्रत्येक संचालकास एक दिवस उपस्थित राहण्याचे बंधन  - शेतकरी कुटुंबातील चार जणांना रोजगार उपलब्ध  - दर्जेदार व आकर्षक पॅकिंग तसेच बाजारपेठेपेक्षा कमी दराने विक्री  - मार्टच्या खर्चासाठी पाचशे रुपये भाडे व पाच टक्के रक्कम वस्तू ठेवणाऱ्या कंपनीकडून घेतली जाते  प्रतिक्रिया शेतकरी कंपन्यांकडून निर्मित होणारा शेतीमाल विक्रीची अडचण होत होती. यासाठी ही शेतकरी मार्टची संकल्पना पुढे आणली आहे. जिल्ह्यात पहिले म्हसवे हे मार्ट सुरू केले असून, दुसरे वाई येथे सुरू करण्यात आले आहे. पुढील काळात जिल्ह्यात या शेतकरी मार्टचे जाळे उभे करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.  -गुरुदत्त काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा.  संपर्क ः वींद्र कांबळे ः  ८००७१७०००१ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com