पुढील हंगामासाठी सोयाबीन बियाणे राखून ठेवा

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे राखून ठेवण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी पावसापूर्वी काढणी व मळणी केली आहे, अशा शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे वाण पुढील हंगामासाठी राखून ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.
Save soybean seeds for next season
Save soybean seeds for next season

वाशीम : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात अवेळी पाऊस सुरू झाल्याने सोयाबीन पीक भिजले असून वेळेत पिकाची मळणी होऊ शकली नाही. काही पीक काढणीअभावी शेतात उभे होते. तर कापणी करण्यात आलेले सोयाबीन मळणी अभावी शेतात उंच जागेवर झाकून ठेवलेले आहे. या सर्व बाबींवरून पुढील खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना घरगुती बियाणे राखून ठेवण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी पावसापूर्वी काढणी व मळणी केली आहे, अशा शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचे वाण पुढील हंगामासाठी राखून ठेवावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली  होती. शेतकऱ्यांना सूचना दिल्याने लवकर येणाऱ्या वाणाची काढणी व मळणी पावसापूर्वी काहींनी केली आहे. या सोयाबीन बियाणाची प्रत चांगली आहे. काढणीच्यावेळी सोयाबीन मधील आर्द्रता १४ ते १७ टक्के पर्यंत असते, असे बियाणे हलक्या उन्हात सुकवून आर्द्रता ९ ते १२ टक्क्यांपर्यंत आणावी. स्पायरल चाळणीमधून बियाणाची चाळणी करून घ्यावी. बियाण्यास बुरशीनाशक लावून कोरड्या हवेशीर जागेत गोणी बॅगमध्ये ३० ते ४० किलोचे पॅकिंग करून लाकडी फळ्यावर जमिनीपासून १० ते १५ सेंटीमीटर उंचीवर एकावर एक अशी पाच पोत्यांपर्यंत थप्पी लाऊन ठेवावी.

बियाण्याकरिता वापर करावयाच्या सोयाबीनची कमीत कमी आदळ-आपट होईल, याची काळजी घ्यावी. सोयाबीनची साठवणूक करताना रासायनिक खताचा संपर्क येणार नाही याची काळजी घेऊन वेगळ्या ठिकाणी साठवणूक करावी. साठवणुकीपूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. ७० टक्क्यांपेक्षा अधिक उगवण क्षमता असल्यास, असे बियाणे साठवणूक करून ठेवावे. सद्यःस्थितीत सोयाबीनचे बाजारातील विक्रीचे दर दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शेतकऱ्यांचा सोयाबीन विक्री करण्याकडे कल आहे. परंतु, आता विक्रीची घाई केल्यास पुढील हंगामाकरिता हेच सोयाबीन ७५०० ते ८००० रुपये दराने बियाणे म्हणून खरेदी करावे लागेल.

बियाणे राखून ठेवल्यास बचत होणार सध्या याबाबत खबरदारी घेतल्यास शेतकऱ्याच्या निविष्ठांवरील प्रतिक्विंटल रुपये ३५०० ते ४००० ची बचत होऊ शकते. यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे पावसापूर्वी काढणी, मळणी करून ठेवलेले सोयाबीन असेल, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री न करता पुढील हंगामासाठी बियाणे राखून ठेवण्याची सूचना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com