टंचाईग्रस्तांची तहान टॅंकरविना भागेना

टंचाईग्रस्तांची तहान टॅंकरविना भागेना
टंचाईग्रस्तांची तहान टॅंकरविना भागेना

औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४५ लाख १२ हजार ४६७ लोकांची तहान टॅंकरविना भागणे अशक्‍य झाले आहे. २०३९ गावे व ७२६ वाड्यांमधील या जनतेची तहान भागविण्यासाठी २८२४ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. शिवाय ४६७८ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. 

झपाट्याने आटत चाललेले जलस्रोत मराठवाड्यातील पाणीटंचाईला अधिक भीषण बनवित आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात पाणीटंचाईची स्थिती सर्वाधिक भीषण असून या जिल्ह्यातील १६ लाख ६८ हजार १५६ लोकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. ७०१ गावे व २६२ वाड्यांमधील या लोकांची तहान भागविण्यासाठी १०५४ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक १९६ टॅंकर औरंगाबाद तालुक्‍यात सुरू असून त्यापाठोपाठ १७९ टॅंकर सिल्लोड, गंगापूर १६८, वैजापूर १५६, पैठण १३०, फुलंब्री ९६, कन्नड ७३, तर खुल्ताबाद तालुक्‍यात ४३ टॅंकर सुरू आहेत. 

बीड जिल्ह्यात १२ लाख १ हजार ९२८ लोकांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ६०६ गावे व ३२० वाड्यांत ८५२ टॅंकरच्या खेपा सुरू आहेत. बीडमधील आष्टी तालुक्यात सर्वाधिक टंचाई आहे. येथे १५७ टॅंकर सुरू आहेत. त्यापाठोपाठ बीड १४२, गेवराई १२४, शिरूर ११०, पाटोदा ७०, केज ५३, अंबाजोगाई ३३, माजलगाव येथे ५१ टॅंकर सुरू आहेत. जालना जिल्ह्यातील ४४१ गावे व ९३ वाड्यांतील ९ लाख ५१ हजार ५६७ लोकांसाठी ५३२ टॅंकर सुरू आहेत. भोकरदन तालुक्‍यात सर्वाधिक १०३, अंबडमध्ये ८८, बदनापूरमध्ये ७४, जालना ६७, जाफ्राबाद ६१, घनसावंगी ५६, मंठा ४२, तर परतूर तालुक्‍यात २१ टॅंकर सुरू आहेत. 

लातूर जिल्ह्यातील ४६ गाव व १२ वाड्यांमधील १ लाख ३० हजार ४०७ लोकांसाठी ५८ टॅंकर सुरू आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातील ११९ गावे व ७ वाड्यांमधील २ लाख ९३ हजार २०१ लोक टंचाईग्रस्त आहेत. जिल्ह्यातील भूम तालुक्‍यात सर्वाधिक ३४, तर लोहारा तालुक्‍यात सर्वात कमी केवळ १ टॅंकर सुरू आहे.  परभणी जिल्ह्यात ४९ गावे ५ वाड्यांमधील ८६ हजार ६७९ लोकांसाठी ५८ टॅंकर सुरू आहेत. हिंगोली जिल्ह्यात २६ गावे ८ वाड्यांमधील ५५ हजार ६१६ लोक टॅंकरवर अवलंबून आहेत. त्यासाठी ४४ टॅंकर सुरू आहेत. नांदेड जिल्ह्यातील ५१ गाव व १९ वाड्यांमधील १ लाख २४ हजार ९१३ लोकांना टॅंकरच्या पाण्याशिवाय पर्याय नाही. 

४६७८ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ४६७८ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ५००, जालना ६३०, परभणी २९०, हिंगोली ३२२, नांदेड ६६१, बीड ९२७, लातूर ६०६, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ७४२ विहिरींचा समावेश आहे. यापैकी ३३१९ विहिरी टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी, तर १३५९ विहिरींचे अधिग्रहण टॅंकर्सना पाणीपुरवठा करण्यासाठी आहे, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com