शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर आणणार

शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर आणणार
शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे सौरऊर्जेवर आणणार

अकोला : अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन देत राज्याने निश्चित केलेल्या १४ हजार ४०० मेगावॉट वीजनिर्मितीपैकी १२ हजार मेगावॉट अपारंपरिक ऊर्जानिर्मितीत राज्य यशस्वी झाले आहे. अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी शासन विविध निर्णय घेत आहे. त्यानुसार सर्व शाळा, अंगणवाड्या, प्राथमिक आरोग्य केंद्रे यांना सौरऊर्जेवर आणण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

शेगाव येथील आनंदविहार येथे महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण व गजानन महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पारेषणसंलग्न सौरविद्युत प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी महावितरणच्या उंद्री व सोयगाव येथील ३३/११ केव्ही उपकेंद्राचेही लोकार्पण करण्यात आले.

या कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. संजय कुटे, खासदार प्रतापराव जाधव, संस्थानचे कार्यकारी विश्वस्त नीळकंठ पाटील, मेहकरचे आमदार डॉ. संजय रायमुलकर, आ. ॲड. आकाश फुंडकर, जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, नगराध्यक्षा शकुंतला बुच यांच्यासह इतर उपस्थित होते.

श्री. बावनकुळे म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी वीज, रस्ते, पिकाला चांगला भाव व रोजगाराची उपलब्धता असावी, या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न होत आहेत. त्यानुसार ऊर्जा विभागाने शेतकरी हितासाठी अनेक निर्णय घेतले. पूर्वी शेतकऱ्यांना वीज मिळण्यात अडथळे येत होते. ही प्रक्रिया सुलभ व जलद करण्यात आली. त्यामुळे गत चार वर्षांत राज्यात साडेसात लाख शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्यात आली.

या वेळी संस्थानच्या सोलर कुकिंग योजनेला एक कोटी ५० लाखांचे अनुदान जाहीर करत लवकरच या योजनेचे उद्घाटनही करण्यात येईल. संस्थानमध्ये उभारण्यात आलेल्या सुमारे तीन मेगावॉट पारेषणसंलग्न विद्युत प्रकल्पाद्वारे ३८ लाख युनिटची वीजनिर्मिती केली जाते आणि संस्थानची ऊर्जेची गरच ही ५० लाख युनिटची आहे. त्यामुळे उर्वरित १२ लाख युनिटच्या वीजनिर्मितीसाठी संस्थानने पन्नास टक्के वाटा उचलला तर ५० टक्के खर्च शासनाकडून करण्यात येईल, असेही यावेळी ऊर्जामंत्र्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com