बारामतीत होतेय सायन्स अँड इनोव्हेशन ॲक्टिव्हिटी सेंटर

अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे बारामतीमध्ये बाल वैज्ञानिक घडविण्यासाठी सायन्स अॅंड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर उभारण्यात येत आहे.
Science and Innovation Activity Center at Baramati
Science and Innovation Activity Center at Baramati

माळेगाव, जि. पुणे ः जागतिक पातळीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे झपाट्याने बदल घडून येत आहेत. त्या गतीने विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे बारामतीमध्ये बाल वैज्ञानिक घडविण्यासाठी सायन्स अॅंड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर उभारण्यात येत आहे. एक्स्पोजर, एक्सपरिमेंट आणि एक्स्प्लोरेशन या “३Es” तत्त्वावर सायन्स अॅंड इनोव्हेशन अॅक्टिव्हिटी सेंटर कामकाज होणार आहे. 

विविध राज्यस्तरीय वैज्ञानिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये शालेय विद्यार्थ्यांना नेऊन त्यांची विज्ञानाबद्दल जिज्ञासा वाढविणे, योग्य शैक्षणिक दिशा देणे, विज्ञान सोपे आणि सहज करून शिकवता येईल अशा प्रयोगांसाठी उपयुक्त कीट विविध शाळांमध्ये वाटप आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याचबरोबरीने ज्या विद्यार्थ्यांमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना दिसून येतील, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, लहान वयातच संशोधनाकडे वळविणे, अशा सर्व गोष्टींसाठी हे केंद्र कार्यरत राहणार आहे. 

विद्यार्थी करणार प्रयोग  पूर्वी तारांगण, खगोलशास्त्र, वैज्ञानिक प्रयोग, खेळातून मनोरंजन यांची माहिती घेण्यासाठी विद्यार्थांना मुंबई, नागपूर, हैदराबाद किंवा पुणे या शहरांतील संस्थांमध्ये जावे लागत होते. आता मात्र या सर्व गोष्टी बारामतीसारख्या ग्रामीण भागात उपलब्ध होत आहेत. नुसते पाहा व शिका असे न करता या सेंटरमध्ये शालेय विद्यार्थांना प्रयोगशाळेतील उपकरणे स्वतः मुक्तपणे हाताळता येणार आहेत. सेंटरमुळे इतर तालुक्यातील शाळांमध्येसुद्धा पायाभूत सुविधा तयार करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू झाले आहे. विशेषतः शालेय शिक्षकांना एकात्मिक अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. याशिवाय नेदरलँड, कोस्टारिका या देशातील वैशिष्टपूर्ण शालेय अभ्यासक्रम आणि ‘मिक्स ग्रुप लर्निंग’ वयोगट अभ्यास पद्धतींचा प्राथमिक प्रकल्प शारदानगर शाळेत राबविला जात आहे. या सर्व उपक्रमांचा फायदा मुलांचे शालेय शिक्षण व स्पर्धा परीक्षेतील गुणवत्तेमध्ये दिसून येत आहे.

माहिती तंत्रज्ञानाचा वापर   बदलत्या जागतिक तंत्रज्ञानाबरोबर मुलांमध्ये कौशल्य विकसन व्हावे या दृष्टीने आभासी माहिती तंत्रज्ञान, रोबोटिक्स तंत्राचा प्रत्यक्ष निरीक्षणातून अनुभव घेण्याची सुविधा या केंद्रामध्ये उपलब्ध आहे. याशिवाय, पायथन प्रोग्रॅमिंग, वेबसाइट डेव्हलपमेंट यासारखे कमी कालावधीचे सर्टिफिकेट कोर्स सुरू करण्याचा संस्थेचा मनोदय आहे. त्यासाठी जर्मनी येथील नॉलेज पार्टनर सोबत करार झाला आहे.  स्वानुभवातून विज्ञान खेळणी, मॉडेल आणि किट्स बनवली तर कृतिशील शिक्षणातून विद्यार्थी घडण्यास मदत होणार आहे. विद्यार्थ्यांमधील सृजनशीलतेला चालना आणि प्रोत्साहन मिळाले तर भविष्यात उद्योजक, शास्त्रज्ञ तसेच नवनिर्मिती करणारे चांगले व्यावसायिक घडणार आहेत.

फिरती प्रयोगशाळा उपक्रम विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये देखील विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरणार आहे. येत्या काळात सेंटरतर्फे फिरती प्रयोगशाळा सुरू करण्याचा विचार आहे. बारामतीच्या आसपास असणाऱ्या विविध उद्योगांचे मॉडेल आणि प्रक्रियांचे वैज्ञानिक प्रदर्शन दालन उभारण्यात येणार आहे. यामध्ये साखर उद्योग, ऑटोमोबाईल, डेअरी, चॅाकलेट तसेच टेक्स्टाइल उद्योगातील विज्ञान सोप्या भाषेत प्रदर्शित करण्यात येणार आहे. पुढील वर्षभरात या प्रकल्पास मूर्त स्वरूप येईल, अशी माहिती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com