भातावरील खोडकिडी निर्मूलनासाठी शास्त्रज्ञांचा पुढाकार

भातावरील खोडकिडी निर्मूलनासाठी शास्त्रज्ञांचा पुढाकार
भातावरील खोडकिडी निर्मूलनासाठी शास्त्रज्ञांचा पुढाकार

कर्जत, जि. रायगड ः कर्जत तालुक्यातील वदप व कुंडलज या गावातील शेतकऱ्यांच्या भातपीक असलेल्या शेतावर जाऊन शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना भातपिकामध्ये खोडकिड्यांचा मोठा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले. येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या चमूने पाहणी केली. 

वेळीच दक्षता घेऊन उपाययोजना न केल्यास शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी वदप येथील भेरवनाथ मंदिराच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी शेतकऱ्यांना खोडकिडीच्या निर्मूलनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कीटकशास्त्रज्ञ डॉ. विनायक जालगांवकर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. जीवन कदम, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने, कनिष्ठ संशोधन सहायक डॉ. हेमंत पवार यांचा समावेश होता.

खोडकिडी ही भात पिकावर पडणारी सर्वांत महत्त्वाची व हानीकारक कीड असून ही फक्त भातावरच उपजीविका करते. ही कीड प्रामुख्याने ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील दुबार पिकाखालील क्षेत्रात प्रतिवर्षी नुकसान करताना आढळते. सद्यस्थितीत भात पिकांची पुनर्लागवड पूर्ण झालेली असून भातपीक फुटव्याच्या अवस्थेत असून अधूनमधून पडणारा पाऊस, पिकाची जोमदार वाढ, उघडीपप व हवेतील गारवा खोडकिडीला उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नियमित पाहणी करून खोडकिड्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास काय करावे, याचे मार्गदर्शन केले. 

या किडीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेत तसेच लावणीनंतर पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. अळी सुरवातीस काही वेळ कोवळ्या पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छित्र पाडून आत प्रवेश करते. आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजेच फुटवे वरून खाली सुकत येतो. यालाच ‘गाभा मर’ असे म्हणतात. सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहज निघून येतो. पोटरीतील पिकावर देखील खोडकिडीचा उपद्रव आढळून येतो. त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढऱ्या लोंब्या बाहेर पडतात. 

या किडीच्या नियंत्रणासाठी गंध सापळ्यांचा देखील वापर करता येतो. हे सापळे भात शेतामध्ये २० ते २५ मीटर अंतरावर हेक्टरी २० या प्रमाणे लावावेत. या बैठकीला २७ शेतकरी उपस्थित होते. बैठकीच्या आयोजनासाठी वदप येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निलीकेश दळवी यांनी अथक परिश्रम घेतले. प्रगतशील शेतकरी कृष्णा भगत यांनी कुंडलज येथे शास्त्रज्ञांच्या पाहणी दौऱ्याचे नियोजन केले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com