कोरोनो विषाणूंच्या प्रादुर्भावाचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने सार्स सीओव्ही-२ आणि अन्य विषाणूंच्या उपलब्ध जनुकीय माहितींचे विश्लेषण केले आहे. त्यातून सध्या सर्वत्र धास्तीसाठी कारणीभूत ठरलेला कोरोना विषाणू (सीओव्हीआयडी-१९) हा नैसर्गिक मूलस्रोतातून आला असल्याचा निष्कर्ष काढला आहे.
कोरोनो विषाणूंच्या प्रादुर्भावाचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न
कोरोनो विषाणूंच्या प्रादुर्भावाचा स्रोत शोधण्याचा प्रयत्न

आंतरराष्ट्रीय संशोधकांच्या गटाने सार्स सीओव्ही-२ आणि अन्य विषाणूंच्या उपलब्ध जनुकीय माहितींचे विश्लेषण केले आहे. त्यातून सध्या सर्वत्र धास्तीसाठी कारणीभूत ठरलेला कोरोना विषाणू (सीओव्हीआयडी-१९) हा नैसर्गिक मूलस्रोतातून आला असल्याचा निष्कर्ष काढला आहे. म्हणजेच हा विषाणू प्रयोगशाळेत किंवा जैवअभियांत्रिकीद्वारे तयार करण्यात आल्याच्या गोष्टी केवळ अफवा असल्याचा दावा करण्यात आला. हा निष्कर्ष नेचर मेडिसीन या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.  डिसेंबर २०१९ मध्ये वुहान (चीन) या शहरामध्ये सुरू झालेला सार्स -सीओव्ही-२ प्रादुर्भाव वाढत जाऊन सीओव्हीआयडी-१९ उद्रेक मोठ्या प्रमाणात झाला. त्याचा प्रसार ७० पेक्षा अधिक देशांमध्ये झाल्याने ८ हजारांपेक्षा अधिक मानवांना जीव गमवावा लागला आहे. त्याचा प्रसार रोखण्यासाठी अनेक देशांना संचारबंदीसह वैद्यकीय आणीबाणी लागू करावी लागली आहे. या विषाणूंच्या उगमाविषयी विविध अफवा पसरल्या असून, त्यामध्ये एक अफवा ही जैविक अस्त्रनिर्मिती आणि प्रयोगशाळेमध्ये तयार करण्याविषयी संबधित होती. अमेरिका आणि चीन या दोन्ही महासत्ता एकमेकांकडे संशयाने पाहत असल्याच्या त्यांच्या अधिकृत व्यक्तींच्या सामाजिक माध्यमातून स्पष्ट होत होते.  कॅलिफोर्निया येथील स्क्रिप्स संशोधन संस्थेतील रोगप्रतिकारशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्राचे सहायक प्रो. क्रिस्टिन अॅण्डरसन यांच्यासह तुलाने विद्यापीठातील रॉबर्ट एफ. गॅरी, सिडनी विद्यापीठातील एडवर्ड होम्स, एडिनबर्ग विद्यापीठातील अॅण्ड्र्यू रॅंबाऊट आणि कोलंबिया विद्यापीठातील डब्ल्यू. इयान लिपकीन यांनी सीवोव्हीआयडी -१९ या विषाणूच्या उगमाविषयी संशोधन केले आहे. त्यासाठी त्यांनी सार्स सीओव्ही-२ आणि अन्य विषाणूंच्या उपलब्ध जनुकीय माहितींचे विश्‍लेषण करून, त्याची एकमेकांशी तुलना केली आहे.  कोरोना विषाणू ही विषाणूमधील सर्वांत मोठे कुळ असून, त्यांच्यामुळे उद्‍भवणाऱ्या तीव्र आजारांचे प्रमाणही मोठे आहे. या पहिला ज्ञात प्रादुर्भाव २००३ मध्ये चीनमध्ये दिसून आला. त्याला सार्स (सिव्हियर अॅक्युट रेस्पिरेटरी सिंड्रोम) असे म्हणतात. दुसरा उद्रेक २०१२ मध्ये सौदी अरेबियामध्ये झाला. त्याला मेर्स (मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम) असे म्हणतात.   ३१ डिसेंबर रोजी चीनने जागतिक आरोग्य संघटनेला कोरोना विषाणूंचा उद्रेक होऊन तीव्र आजारी लोकांची संख्या वाढत असल्याबाबतचा अहवाल दिला. फेब्रुवारी २०२० पर्यंत सुमारे १.६७५ लाख लोकांना प्रादुर्भाव झाल्याची नोंद घेण्यात आली. तर या विषाणूमुळे ६६०० पेक्षा अधिक लोकांची जीव गेला.  या विषाणूंच्या संसर्गाचे प्रमाण वाढत गेल्यानंतर चीन येथील संशोधकांनी सार्स-सीओव्ही-२ या विषाणूंची सुसंगतवार जनुकीय संरचना मांडून त्याची माहिती जगभरातील संशोधकांसाठी खुली केली. या विषाणूमुळे बाधित लोकांच्या केवळ एका संसर्गामुळेही रोगाचा प्रसार होत असल्याने बाधितांची संख्या वेगाने वाढत गेली.  अॅण्डरसन आणि त्यांच्या विविध संशोधन संस्थांमध्ये कार्यरत संशोधक सहकाऱ्यांसह त्या कुळातील अन्य विषाणूंच्या जनुकीय माहितीशी तुलनात्मक अभ्यास केला. त्यातून त्याचा नेमका उगम शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. विषाणूंच्या प्रथिन उंचवटे, बाह्य आवरणाचे जनुकीय विश्‍लेषण केले.  नैसर्गिक उत्क्रांतीचे पुरावे   संशोधनामध्ये मानवी किंवा प्राणीज पेशीमध्ये शिरकाव करण्याच्या या विषाणूंच्या क्षमतांचे विश्‍लेषण केले गेले. प्रथिन उंचवट्यांमध्ये एकाद्या यजमान पेशीला बांधून ठेवण्यायोग्य (रिसेप्टर बायंडिग डोमेन RBD) आकडे किंवा हूक आहेत. हे आकडे मानवी पेशींचे पकड मिळवतात. त्यात मानवी पेशींच्या बाह्य बाजूच्या (ACE२) मूलद्रव्यीय रचनेवर हल्ला करण्यासाठी विकसित झाले आहेत. ACE२ ही रचना रक्तदाबाच्या नियंत्रणामध्ये कार्यरत असते. एकदा पकड मिळाली की यजमान पेशीभित्तिका तोडण्याची मूलद्रव्यीय रचना (त्याला क्लिव्हेज साइट म्हणतात) कार्यरत होते.  यामध्ये नैसर्गिक उत्क्रांतीचे पुरावे मिळाले असून, त्याला SARS-CoV-२ च्या एकूण मूलद्रव्यीय रचनेमुळे पृष्टी मिळते. जर त्यामध्ये कुणी बाहेरून (जनुकीय अभियांत्रिकीद्वारे) बदल केल्यास त्वरित लक्षात आले असते. SARS-CoV-२ ची मूलभूत जनुकीय माहिती आधी ज्ञात असलेल्या कोरोना विषाणूपेक्षा लक्षणीय वेगळी आहे. विषाणूंच्या उंचवट्यावरील प्रथिनातील आरबीडी आणि त्याचे मूलभूत संरचनेमध्ये म्युटेशन्स झाल्या असल्यामुळे प्रयोगशाळेमध्ये काही बदल केले असल्याचे शक्यता बाजूला पडते. अशी माहिती अॅण्डरसन यांनी दिली.    विषाणूच्या मूलस्रोताबाबतच्या शक्यता  या विषाणूंचे वटवाघळे आणि खवले मांजर (पॅंगोलीन) मध्ये आढळणाऱ्या विषाणूशी साम्य दिसून आले. 

पहिली शक्यता  विषाणूंने नैसर्गिक निवडीच्या प्रक्रियेतून मानवाव्यतिरिक्त अन्य यजमानामध्ये स्वतःला उत्क्रांत केले असावे. त्यानंतर त्याने मानवाकडे झेप घेतली. पूर्वीच्या विषाणू उद्रेकामध्ये मार्जारकुळातील सिव्हेट हा प्राणी (सार्स) आणि उंट (मेर्स) हे विषाणूंचे मानवाव्यतिरिक्तचे यजमान होते. त्यांच्या संपर्कातून प्रसार वाढला होता. या उद्रेकातून विषाणूचे वटवाघळातील विषाणूंबरोबर साम्य असून, त्यांच्याद्वारे प्रसार झाला असावा. अर्थात, वटवाघळाकडून माणसांमध्ये येण्याचा स्पष्ट नोंदीकृत पुरावा अद्याप मिळालेला नाही.  या शक्यतेनुसार मानवामध्ये शिरकाव करण्यापूर्वी विषाणू आरबीडी प्रथिने आणि क्लेव्हेज साइटमध्ये बदल झालेले होते. या विषाणूंकडे मानवामध्ये शिरकाव करण्याची यंत्रणा आधीच तयार असल्यामुळे त्याच्या प्रसारामध्ये वाढ झाल्याचेही सांगितले जाते.  दुसरी शक्यता  रोगकारक नसलेला विषाणू एखाद्या यजमाना प्राण्याकडून माणसांमध्ये आला असावा. त्यानंतर तो उत्क्रांत झाला असावा. यासाठी आशियातील खवल्या मांजर किंवा आफ्रिकेतील अन्य आर्माडिल्लोसारख्या कवचधारी प्राण्यामध्ये अशाच प्रकारचे आरबीडी संरचना आढळते. यातील खवल्या मांजराच्या संपर्कातून सरळ किंवा मांजरवर्गीय प्राण्याच्या (सिव्हेट किंवा फेरेट) मध्यस्थीतून माणसांमध्ये हा विषाणू आला असण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यानंतर माणसांमध्ये आल्यानंतर त्याची क्लेव्हेज साइट विकसित झाली. ही साइट बर्ड फ्ल्यूसाठी कारणीभूत काही विषाणूंसारखी असून, ती माणसांमध्ये सहजतेने प्रवेश करू शकते. या विषाणूंचा काही लोकांमध्ये प्रसार झाल्यानंतर तो अधिक प्राणघातक झाला असावा. या दोन शक्यतांपैकी कोणती अधिक योग्य आहे, याचा शोध अवघड असला तरी अशक्य नसल्याचे मत ॲण्ड्र्यू रॅबाऊट यांनी व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com