ठाणे जिल्ह्याला बसलेला कुपोषणाचा विळखा सुटेना

ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण सुटेनासे झाले असून आजही विशेष करून ग्रामीण भागात कुपोषित बालके आढळून येत आहेत. ऑगस्टअखेरपर्यंत १३३ तीव्र आणि १३०५ बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनामुळे प्रतिबंधित क्षेत्रामधील बालकांचे वजन आणि उंची घेण्यात आली नाही.
The scourge of malnutrition in Thane district has not abated
The scourge of malnutrition in Thane district has not abated

मुंबई : ठाणे जिल्ह्याला कुपोषणाचे लागलेले ग्रहण सुटेनासे झाले असून आजही विशेष करून ग्रामीण भागात कुपोषित बालके आढळून येत आहेत. ऑगस्टअखेरपर्यंत १३३ तीव्र आणि १३०५ बालके मध्यम कुपोषित असल्याची माहिती पुढे आली आहे. कोरोनामुळे प्रतिबंधित क्षेत्रामधील बालकांचे वजन आणि उंची घेण्यात आली नाही. अन्यथा कुपोषित बालकांचा आकडा आणखी वाढला असता, असे ठाणे जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. विशेष योजना राबवल्या जात असूनही कुपोषणाची समस्या कायम आहे. माताच कुपोषित असल्यास जन्मणारे बाळही कुपोषित असते. त्यामुळे जिल्हा कुपोषणमुक्त होणार कधी, हा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षांपासून ठाणे जिल्ह्यात सप्टेंबर महिना पोषण महिना म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या अभियानाची थीमही ‘कुपोषणमुक्त भारत’ अशी आहे. या अभियानाच्या माध्यमातून महिनाभर अॅनेमिया, अतिसार, पौष्टिक आहार, स्वच्छता, कुपोषण आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. या सर्व उपाय योजनानंतरही जिल्ह्यात कुपोषित बालके आढळत असल्याचे दिसून येते.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २०१९च्या डिसेंबरअखेर पर्यंत ० ते ५ वर्षे वयोगटातील मध्यम कुपोषित (मॅम) बालकांची संख्या १८५६ होती. तर तीव्र कुपोषित (सॅम) बालके ३३९ होती. या महिन्यात १ लाख ७ हजार ५४५ बालकांचे वजन आणि उंची घेण्यात आली होती. त्यानंतर जानेवारीमध्ये वजन आणि उंची घेतलेल्या बालकांची संख्या १ लाख १० हजार ८११ होती. या महिन्यात मध्यम कुपोषित बालके २०६३ आणि २०९ तीव्र कुपोषित बालके होती.

प्रत्येक महिन्याला बालकांची संख्या कमी-जास्त होत असल्याचे दिसून येते. परंतु जिल्ह्यात जसजसा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला तसे प्रतिबंधित क्षेत्रातील बालकांची वजन आणि उंची घेण्याचे काम थांबले. त्यामुळे एप्रिल, मे, जून आणि जुलैमध्ये वजन आणि उंची घेण्यात आलेल्या बालकांची संख्या कमी आहे. शिवाय तीव्र आणि मध्यम कुपोषित बालकांची संख्या कमी दिसून येते.

सर्व बालके ग्रामीण भागातील एप्रिलमध्ये १३०५ बालके मध्यम तर तीव्र कुपोषित १०२, मे मध्ये अनुक्रमे मध्यम ११९४, तीव्र कुपोषित ११२ बालके, जूनमध्ये १०७९, ११६, जुलैमध्ये ११३८, १३१ बालके मध्यम आणि तीव्र कुपोषित होती. तर आता ऑगस्ट अखेरपर्यंत मध्यम कुपोषित बालकांची संख्या १३०५ होती. तर तीव्र कुपोषित बालकांची संख्या १३३ होती. ही सर्व बालके ग्रामीण भागातील आहेत. ऑगस्टमधील सर्वेक्षित बालकांची संख्या १ लाख १९ हजार २३९ आणि ९० हजार ८५८ बालकांची उंची आणि वजन घेण्यात आले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com