ग्राहकांच्या शोधात व्यावसायिक थेट गावात

ग्राहकांच्या शोधात व्यावसायिक थेट गावात
ग्राहकांच्या शोधात व्यावसायिक थेट गावात

औरंगाबाद : दुष्काळाच्या वाढत्या तीव्रतेने आता विविध ठिकाणच्या आठवडी बाजारांवर परिणाम दाखविणे सुरू केले आहे. पैठण तालुक्‍यातील आडूळ येथे मंगळवारी भरणाऱ्या बाजारावर त्याचा थेट परिणाम दिसून आला. या बाजारात आपली, किराणा, भाजीपाल्याची दुकाने थाटणाऱ्यांनी बाजाराच्या दिवशी आडूळला येण्याऐवजी आपल्या दुकानाशी कायम संबंधित राहणाऱ्या ग्राहकांच्या गावातच जावून दुकान थाटने पसंत केले आहे.  

खरीप हातचा गेला, शिवाय ना पहिला ना परतीचा पाऊस झाला. त्यामुळे रब्बीचीही थोडीबहूत सिंचनाची सोय असलेला अपवाद वगळता आशा मावळली. यामुळे ग्रामीण भागातून स्थलांतर होण्यास सुरवात झाली आहे. शिवाय जी मंडळी गावात राहताहेत त्यांनी आपल्या खर्चाला कात्री देणे सुरू केले आहे. त्यांचे कात्री देण्याचे प्रमाण वाढत असल्याची बाब प्रत्येक आठवड्याला विविध ठिकाणी भरत असलेल्या आठवडी बाजारात ग्राहकांच्या प्रचंड प्रमाणात रोडावलेल्या संख्येवरून समोर आले आहे.

मंगळवारी पैठण तालुक्‍यातील आडूळ येथे आठवडी बाजार भरत असतो. या बाजारात पैठण तालुक्‍यातील कडेठाणपासून अंबड तालुक्‍यातील देशगव्हाणपर्यंत, शिवाय औरंगाबाद व करमाडपर्यंतच्या गावातील लोक आठवड्याचा भाजीपाला व इतर जीवनावश्‍यक वस्तूंची खरेदी करत असतात. परंतु, दुष्काळाच्या संकटाने बहुतांश गावातील लोकांनी आडूळच्या बाजाराकडे पाठ फिरविल्याने गत काही आठवड्यापासून या बाजारात आपली दुकाने लावणाऱ्या व्यावसायिकांनीही आडूळला येण्याऐवजी मालाच्या विक्रीसाठी विशिष्ट दिवशी काही गावांमध्ये जाऊन आपली दुकाने लावणे व त्यामधून आपल्या व्यवसायाला जिवंत ठेवण्याचे प्रयत्न चालविले आहेत.

ग्राहकांनी आडूळच्या बाजाराकडे पाठ फिरविल्याने आता परिसरातील दाभरूळ, ब्राम्हणगाव, घारेगाव व देवगाव या चार गावांत गुजरी सुरू झाली आहे. यासोबतच कडेठाण व एकतूनी येथे भरणाऱ्या गुजरीचाही आडूळच्या वा इतर ठिकाणच्या बाजाराला जाण्याऐवजी गावं गाठून व्यवसायाला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यावसायिकांमुळे विस्तार झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

आडूळला जायच म्हटलं की गावातून जायला दहा अन्‌ यायला दहा रुपये लागतात. शिवाय आडूळला गेलं की खर्च वाढतो. दुष्काळात तो करणं शक्‍य नाही. त्यामुळे बाजाराला जाणे बंद केले होते. आता गावातचं मंगळवारी भाजीपाला व किराणा दुकान लागल्यानं नेमकं हवं तेच खरेदी करतो. - शरद डिघूळे, शेतकरी देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद.

दर मंगळवारी आडूळला यायचो. तीन चार आठवड्यापासून बाजारातील ग्राहक ओसरल्याने आता आडूळऐवजी देवगावात दुकान लावून व्यवसायात तग धरण्याचा प्रयत्न करतोय. - कल्याण निर्मळ, किराणा व्यावसायिक, जामखेड, ता. अंबड, जि. जालना

भाजीपाला घेऊन प्रत्येक मंगळवारी आडूळला यायचो. परंतु, बाजारात ग्राहक ओसरल्याने आता देवगावसह इतर गावांतील गुजऱ्यांमध्ये जावून भाजीपाला विक्रीचा प्रयत्न करतोय. - रमेश धोत्रे, भाजीपाला व्यावसायिक मुकुंदवाडी, ता. जि. औरंगाबाद.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com