राज्यात अद्याप ३६ कारखान्यांचा हंगाम सुरू 

हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक गाळप करीत राज्यात अग्रक्रम पटकाविला आहे. या कारखान्याने १६२ दिवसांमध्ये हंगाम पूर्ण करताना १८ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप करीत अव्वल स्थान पटकावले.
The season of 36 factories is still underway in the state
The season of 36 factories is still underway in the state

कोल्हापूर : यंदाच्या हंगामात हुपरी (ता. हातकणंगले) येथील जवाहर सहकारी साखर कारखान्याने सर्वाधिक गाळप करीत राज्यात अग्रक्रम पटकाविला आहे. या कारखान्याने १६२ दिवसांमध्ये हंगाम पूर्ण करताना १८ लाख ८८ हजार टन उसाचे गाळप करीत अव्वल स्थान पटकावले. १२.१४ टक्के उताऱ्‍याने २२ लाख ९२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले. 

नगर जिल्ह्यातील अंबालिका या खासगी कारखान्याने १६ लाख ७ हजार टन गाळप करीत दुसरा, तर सोलापूरच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने १५ लाख १ हजार ८०० टनांचे गाळप करीत तिसरा क्रमांक पटकाविला. यंदाच्या हंगामात जादा गाळप करणाऱ्‍या पहिल्या वीस कारखान्यांमध्ये कोल्हापूर व नगर जिल्ह्यातील प्रत्येकी पाच कारखान्यांचा समावेश आहे. १९ एप्रिलअखेर राज्यातील १५४ साखर कारखान्यांनी हंगाम आटोपला आहे. 

यंदा बहुतांशी साखर कारखान्यांचा हंगाम ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्याच्या कालावधीत सुरुवात झाली. यंदा कोल्हापूर विभागात हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पावसाळी हवामान असल्याने हंगाम रखडत सुरू झाला. पहिल्या पंधरा दिवसांत पुणे व नगर विभागाने आघाडी घेतली. यानंतर मात्र कोल्हापूर विभागाने गाळपात आघाडी घेतली. यंदा १९० साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला.  यंदा ज्या साखर कारखान्यांनी गाळपक्षमता अधिक आहे. त्या कारखान्यांनी ऊसतोडणी यंत्राद्वारे तोडणी करून गाळपक्षमतेने उसाचे गाळप केले. सर्वाधिक गाळप करणाऱ्‍या पहिल्या वीस कारखान्यांमध्ये कोल्हापूर, नगर खालोखाल पुण्यातील चार, तर सातारा, सोलापूरमधील तीन साखर कारखान्यांचा समावेश आहे. 

उताऱ्यात सह्याद्रीची बाजी  या कालावधीअखेर सातारच्या सह्याद्री साखर कारखान्याचा १२.६५ टक्के इतका सर्वाधिक सरासरी उतारा राहिला आहे. या खालोखाल आसुर्ले पोर्लेच्या दालमिया साखर कारखान्याने १२.५८, तर शिरोळच्या दत्त साखर कारखान्याने १२.४३ टक्के उतारा राखत आघाडी घेतली. 

१९ एप्रिलअखेरची हंगामाची स्थिती, सध्या ३६ कारखाने सुरू 
झालेले गाळप ९९९.५० लाख टन 
सरासरी उतारा १०.४८ टक्के
उत्पादित साखर १०५ लाख टन 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com