मराठवाड्यात गती पकडतोय हंगाम 

मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७३ साखर कारखान्यांपैकी आठही जिल्ह्यांतील ३७ कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवातव केली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत २० कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली होती.
The season is gaining momentum in Marathwada
The season is gaining momentum in Marathwada

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांतील ७३ साखर कारखान्यांपैकी आठही जिल्ह्यांतील ३७ कारखान्यांनी ऊस गाळपाला सुरुवातव केली आहे. ९ नोव्हेंबरपर्यंत २० कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली होती. त्यामध्ये १७ कारखान्यांची पुन्हा भर पडली आहे. सुरू झालेल्या कारखान्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत १३ लाख ६३ हजार ८०४ टन उसाचे गाळप करत ४.८४ ते ७.७२ दरम्यान कमी अधिक साखर उताऱ्यातून ९ लाख ८९ हजार ९७० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. उशिराने व धीम्या गतीने सुरू झालेला ऊस गाळप हंगाम आता गती पकडताना दिसते आहे.  साधारणत: १५ ऑक्‍टोबरपासून गाळप हंगाम सुरू होणे अपेक्षित असताना ऑक्‍टोबरच्या शेवटच्या व नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू झालेल्या कारखान्यांनी प्रत्यक्ष ऊस गाळपाला सुरुवातव केली. उशिराने सुरू झालेल्या यंदाच्या गाळप हंगामासाठी औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या खानदेश व मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील २२ कारखान्यांनी परवाना मागितला होता. त्यापैकी ४ कारखान्यांना परवाना मिळाला नव्हता. साखर विभागाच्या माहितीनुसार मराठवाड्यातील ७३ साखर कारखान्यांपैकी ३७ कारखान्यांनी गाळपाला सुरुवात केली. त्यामध्ये औरंगाबाद प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या औरंगाबाद व बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी ४, जालना जिल्ह्यातील २, नांदेड प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या परभणीतील ६, हिंगोली व नांदेडमधील प्रत्येकी ३, लातूरमधील ७, मराठवाड्यातील मात्र सोलापूर प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयांतर्गत येत असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील ८ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळपाला सुरुवात केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील ५ खासगी व ३ सहकारी कारखान्यांनी मिळून १५ नोव्हेंबरपर्यंत ३ लाख ९५ हजार ६४७ टन उसाचे गाळप करत ७.७२ टक्‍के उताऱ्याने ३ लाख ५ हजार ६६० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील एका सहकारी व ३ खासगी साखर कारखान्यांनी ९६ हजार ८५३ टन उसाचे गाळप करत ७.१५ टक्‍के उताऱ्याने ६९२२५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. बीड जिल्ह्यातील ३ सहकारी व एका खासगी कारखान्यांसह ४ कारखान्यांनी १ लाख ४२ हजार ५६२ टन उसाचे गाळप करत ६.९ टक्‍के साखर उताऱ्याने ९८ हजार ४३० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. जालना जिल्ह्यातील एक सहकारी व एक खासगी मिळून दोन कारखान्यांनी ८३१५० टन उसाचे गाळप करत ७.०७ टक्‍के साखर उताऱ्याने ५८७८० क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. परभणी जिल्ह्यातील ६ खासगी कारखान्यांनी २ लाख ७३ हजार ६१० टन उसाचे गाळप करत ७.३८ टक्‍के साखर उताऱ्याने २ लाख २ हजार २५ क्‍विंटल साखरेचे उत्पादन केले. हिंगोली जिल्ह्यातील एक सहकारी व दोन खासगी मिळून ३ कारखान्यांनी १ लाख २६ हजार ७२० टन उसाचे गाळप करत ७.५७ टक्‍के साखर उताऱ्याने ९५ हजार ९०० क्‍विंटल साखर उत्पादन केले.  नांदेड जिल्ह्यातील ३ खासगी साखर कारखान्यांनी २४ हजार ६७९ टन उसाचे गाळप करत सर्वात कमी ४.८४ टक्‍के साखर उताऱ्याने ११ हजार ९५० क्‍विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. लातूर जिल्ह्यातील ४ सहकारी व ३ खासगी मिळून ७ कारखान्यांनी २ लाख २० हजार ४८१ टन उसाचे गाळप केले. ६.७१ टक्‍के साखर उतारा राखत १ लाख ४८ हजार क्‍विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर विभागाच्या सूत्रांनी दिली. 

प्रतिक्रिया 

आधीच ऊस गाळप सुरू होण्याला विलंब झालेला आहे. त्यामुळे परवाने घेतलेल्या कारखान्यांनी तत्काळ गाळप सुरू करून कुणाचाही ऊस शिल्लक राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच एफआरपी बाकी असलेल्यांनी ती तत्काळ चुकती करावी, अन्यथा शासन आदेशाप्रमाणे कारवाई अनिवार्य राहील.  -शरद जरे, प्रादेशिक साखर सहसंचालक, औरंगाबाद   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com