पूर्वहंगामी द्राक्ष काढणीस प्रारंभ; बागलाण तालुक्यात हंगामाची उत्सुकता

वायगाव, ता. बागलाण : येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी चैत्राम पवार यांच्या बागेतील तयार झालेला रंगीत वाण.
वायगाव, ता. बागलाण : येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी चैत्राम पवार यांच्या बागेतील तयार झालेला रंगीत वाण.

नाशिक : जिल्ह्यातील प्रयोगशील द्राक्ष उत्पादकांचा तालुका म्हणून बागलाणने आंतरराष्ट्रीय बाजारात ओळख मिळविली आहे. चालू वर्षीसुद्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी जून महिन्याच्या सुरुवातीला द्राक्षांची छाटणी करून पूर्वहंगामी द्राक्ष हंगाम यशस्वी केला आहे. सध्या काढणी सुरू असून, देशांतर्गत शहरांमध्ये द्राक्ष पाठवायला सुरुवात झाली आहे. अचूक नियोजन, कष्टाची तयारी व हंगामनिहाय वर्षभर व्यवस्थापन करत अनेक शेतकरी पूर्वहंगामी द्राक्ष पिकात पुढे आले आहेत. सुरुवातीला पाण्याची अडचण असताना मल्चिंग व पाण्याचे नियोजन करून फेब्रुवारीमध्ये खरड छाटण्या झाल्या. नंतर जूनपासून द्राक्षांची गोडी छाटणी करून द्राक्षबाग फुलविण्याचा प्रयोग यावर्षीही यशस्वी केला आहे. या भागात प्रामुख्याने शरद सीडलेस, क्लोन २, थॉमसन, सोनाका या व्हाइट व्हरायटीचे वाण घेण्यात आले. यांसह कलरमध्ये जंबो, रेड ग्लोब, क्रीमसन, शरद सीडलेस, नानासाहेब पर्पल या व्हरायटी घेण्यात आल्या. अर्ली द्राक्षाचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बागलाणमध्ये द्राक्ष हंगाम सुरुवात झाली आहे.  येथे सुरू आहे द्राक्ष काढणी  सध्या अमरावतीपाडा, पारनेर, मुंगसे, बिलपुरी, बिजोटे, भुयाणे, पारनेर, वायगाव, दासाने, लाडूद या परिसरात काढणी सुरू केली आहे. हा काढलेला माळ कानपुर, अहमदाबाद, इंदोर, जयपूर, दिल्ली या ठिकाणी पाठविण्यात येत आहे. मिळणारे दर

  • शरद सीडलेस :  १३५ रु प्रतिकिलो
  • क्लोन  :   ८५ रु प्रतिकिलो
  • सोनाका  : ६० ते ६५ रु प्रतिकिलो
  • पूर्वहंगामी द्राक्ष उत्पादनाचे टप्पे 

  • फेब्रुवारी -मार्चमध्ये खरड छाटणीवेळी पाणीटंचाई
  • मल्चिंग, पाणीव्यवस्थापन करून नियोजन
  • पावसामुळे पोंगा अवस्थेत अडचणी व कूज  
  • पावसाच्या अडचणींनंतर घड काढणीसाठी तयार
  • उन्हाळ्यात असल्याने खरड छाटणी ची कामे अडचणीत सापडली होती. मात्र पाणी व्यवस्थापन करून हंगामाचे नियोजन केले. इतर पिकांना फाटा देऊन हंगाम प्रतिकूल परिस्थितीत पाच एकर बाग उभा केला आहे. - चैत्राम पवार, द्राक्ष उत्पादक, वायगाव, ता.बागलाण

    सुरुवातीला पाणीटंचाई आली त्यामुळे छाटण्या लांबणीवर गेल्या. मोठ्या अडचणीतून बागा तयार केल्या. मात्र पोंगा खराब व घडकूज झाल्याने ३० टक्के नुकसान होणार आहे. आता काढणीला माल आला. मात्र पावसामुळे माल काढण्यास अडचणीं येत आहेत. - खंडू शेवाळे, प्रगतिशील द्राक्ष उत्पादक, भुयाने, ता. बागलाण

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com