साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच

साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच
साताऱ्यात यंदा ऊस हंगाम तीन महिनेच

सातारा : अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीचा परिणाम ऊस शेतीवर झाला. त्यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम यंदा दोन ते अडीच महिने उशिरा सुरू होईल. साखर संघ आणि कारखान्यांनी १५ डिसेंबरपर्यंत हंगाम सुरू करण्याचा परवाना साखर आयुक्त कार्यालयाकडे मागितला आहे. ऊस कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे साधारण तीन ते चार महिनेच हंगाम चालणार असल्याचे कारखाना व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात गाळपासाठी उसापैकी महापुरामुळे २० टक्‍क्‍यांहून अधिक ऊस खराब झाला. त्याचा गाळपावर परिणाम होणार आहे. 

ऊस शेतीचे प्रमाण अधिक असलेल्या कऱ्हाड, पाटण आणि सातारा तालुक्‍यात या वर्षी पुरामुळे मोठे नुकसान झाले. उसाचे पीक पाण्यात राहिल्याने मोठ्या प्रमाणात ऊस वाया गेला. सर्वाधिक कारखाने कऱ्हाड तालुक्यात आहेत. पाटण व सातारा तालुक्‍यांतही एक साखर कारखाना आहे. वाई व सातारा तालुक्ं‍याचा काही भाग वगळता कऱ्हाड, पाटणमधील उसाचे मोठे नुकसान झाले. याचा परिणाम यंदाच्या गाळप हंगामावर होईल. 

अद्यापही शेतामध्ये पाणी असून, तुरळक प्रमाणात पाऊस सुरूच आहे. त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे या वर्षी कारखान्यांचा हंगाम दोन ते अडीच महिने लांबणार आहे. एरव्ही ऑक्‍टोबरअखेर किंवा नोव्हेंबरमध्ये कारखान्याची धुराडी पेटत होती. या वर्षी कारखाने डिसेंबरमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. उसाच्या शेतात पाणी असल्याने ऑक्‍टोबरमध्ये कारखाने सुरू करणे परवडणारे नाही. कारण कारखान्यांना अपेक्षित उतारा मिळणार नाही. उसाचे क्षेत्र बघता तीन ते चार महिने हंगाम सुरू राहण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात तीनही हंगामांतील मिळून ८० हजार ३१७ हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. यापैकी २० टक्के म्हणजेच १५ ते १६ हजार हेक्‍टरवरील ऊस महापुरामुळे खराब झाला. त्यामुळे गाळपाची गणिते चुकणार आहेत. यातच या हंगामात १६ कारखाने गाळप करण्याचा अंदाज आहे. त्या दृष्टीने कारखान्यांनी तयारीही करून ठेवली आहे. गाळपास उपलब्ध उसास आडसाली २० हजार ३५५, पूर्वहंगामी १९ हजार ४४०, सुरूचा १२ हजार ८०२, खोडवा २७ हजार ७१८ ऊस उपलब्ध होता. यातील नदीकाठचा ऊस पुरात बाधित झाला आहे. 

कोल्हापूर आणि सांगली येथे महापुरामुळे उसाचे क्षेत्र बाधित झाले. तेथून उसाची उपलब्धता खूपच कमी आहे. त्यामुळे येथील कारखाने सातारा जिल्ह्यातील ऊस पळविण्याची शक्‍यता आहे. कारखान्यांची वाढती संख्या लक्षात घेता गाळपास ऊस कमी पडणार आहे. यामुळे उद्दिष्ट गाठण्यासाठी उसाची पळवापळवी होईल. यातून शेतकऱ्यांना ऊसदर जादा मिळण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com