नुकसानग्रस्तांसाठी सव्वापाच हजार कोटींचा मदतीचा दुसरा हप्ता जाहीर 

crop damage
crop damage

मुंबई: राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सोमवारी (ता. २५) मदतीचा ५ हजार ३८० कोटींचा दुसरा हप्ता जाहीर केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नुकसानग्रस्तांच्या मदतीचा आढावा घेतल्यानंतर ही मदत घोषित केली आहे.  ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत क्यार आणि महा चक्रीवादळामुळे पावसाचा राज्यातील ३४ जिल्ह्यांतील ३२५ तालुक्यांना मोठा फटका बसला आहे. पंचनाम्यात सुमारे ९३ लाख हेक्टरवरील शेतीपिके आणि फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर सुमारे एक कोटी शेतकरी संकटाने भरडले आहेत. राष्ट्रपती राजवटीच्या काळात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी १६ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. खरिपातील शेती-पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची, तर फळबागांसाठी हेक्टरी अठरा हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. त्यापोटी राज्यपालांनी १९ नोव्हेंबरला २ हजार ५९ कोटींचा पहिला हप्ता जाहीर केला. मात्र, ही मदत तुटपुंजी असल्याने सार्वत्रिक टीकाही झाली होती.  राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी जाहीर केलेली खरिपातील शेती-पिकांसाठी हेक्टरी आठ हजार आणि फळबागांसाठी हेक्टरी अठरा हजारांची मदत खूपच अत्यल्प आहे, तुटपुंजी आहे, अशी सार्वत्रिक तक्रार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य शासन या मदतीत वाढ करणार आहे का, याकडे राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

आपत्कालीन निधीमधून देणार मदत  शनिवारी शपथविधी पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी पहिल्यांदाच मंत्रालयात आले होते. दुपारी वर्षा या शासकीय निवासस्थानी त्यांनी राज्यातील अवकाळीग्रस्तांच्या मदतीचा आढावा घेतला. त्यानंतर मदतीचा दुसरा हप्ता जाहीर करण्यात आला आहे. दुसऱ्या टप्प्यात ५ हजार ३८० कोटी रुपये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्याच्या आपत्कालीन निधीमधून ही रक्कम उपलब्ध करून द्यावी, असेही निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com