नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघात अंतिम टप्प्यात प्रचाराचा ज्वर वाढला

नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघात अंतिम टप्प्यात प्रचाराचा ज्वर वाढला
नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघात अंतिम टप्प्यात प्रचाराचा ज्वर वाढला

नांदेड: नांदेड, परभणी, हिंगोली लोकसभा मतदारसंघात जाहीर प्रचारासाठी शेवटचे दिवस राहिले आहेत. उन्हाचा पारा चढत असताना अंतिम टप्प्यात प्रचाराचा ज्वर वाढला आहे. प्रचार सभांतून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. एकमेकांची उणी-दुणी काढली जात आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत दुष्काळ, पाणीटंचाई यासह रस्ते, पाणी, सिंचन, वीज या आजवर मार्गी न लागलेल्या प्रश्नांचा मात्र त्रोटक उल्लेख केला जात आहे. उन्हामुळे प्रचार सभांना अपेक्षित गर्दी होत नसल्याने समाज माध्यमावरील प्रचारावर भर दिला जात आहे. लोकसभेच्या नांदेड, परभणी, हिंगोली मतदारसंघात गुरुवारी (ता. १८) मतदान होणार असल्याने जाहीर प्रचार मंगळवारी (ता. १६) सायंकाळ पर्यंत सुरू राहणार आहे. या तीनही मतदारसंघात महायुती आणि महाआघाडी यांच्यात थेट लढत होणार असली तरी वंचित बहुजन आघाडीची मते निर्णायक ठरणार आहेत. नांदेड, हिंगोलीच्या जागा राखण्याचे काॅँग्रेसपुढे तर परभणीचा बालेकिल्ला अबाधित ठेवण्याचे आव्हान शिवसेनेपुढे आहे. नांदेड मतदारसंघात काॅँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आजवर एकाकी झुंज देत आले आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा झाल्या. चव्हाण यांच्या प्रचारार्थ काॅँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादी काॅँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा होणार आहे. परभणी जिल्ह्यात शिवसेनेचे संजय जाधव यांच्या प्रचार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, राम शिंदे यांच्या सभा झाल्या. सोमवारी (ता. १५) शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आहे. राष्ट्रवादी काॅँग्रेसचे राजेश विटेकर यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काॅँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे यांच्या सभा झाल्या. हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पकंजा मुंडे, युवासेनेचे आदित्य ठाकरे यांच्या तर काॅँग्रेसचे सुभाष वानखेडे यांच्या प्रचारार्थ धनजंय मुंडे, राजीव सातव यांच्या सभा झाल्या. वंचित बहुजन आघाडीच्या उमदेवारांसाठी अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभा झाल्या. अन्य उमेदवार रोडशो, प्रत्यक्ष गाठी भेटी घेऊन प्रचार करत आहेत. या तीन मतदारसंघात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी स्थिती आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत समस्यासह सिंचन, उद्योग विकासाचा अनुशेष कायम आहे. अनेक बाबतीत मागास असलेल्या या मतदारसंघाच्या विकासासाठी ठोस आश्वासनाचा अभाव प्रचारात दिसत आहे. व्यक्‍तिगत आरोप-प्रत्योराप, उणी-दुणी काढली जात असल्यामुळे थोडावेळ मनोरंजन होत आहे. यातून शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार, महिला यांचे प्रश्न बाजूला राहात असल्याने भ्रमनिराश होत आहे. उन्हामुळे मतदारांची गर्दी होत नसल्याने सकाळी-सायंकाळी प्रचारसभांचे आयोजन केले जात आहे. समाज माध्यमावरून सभांचे थेट प्रक्षेपण केले जात आहे. त्यामुळे घरबसल्या सभा ऐकता येत आहेत. शेवटच्या दोन दिवसात प्रचारातील रंगत वाढणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com