शेंडूरमध्ये ६४ कृषिपंप ‘पाटबंधारे’कडून सील

शेंडूरमध्ये ६४ कृषिपंप ‘पाटबंधारे’कडून सील
शेंडूरमध्ये ६४ कृषिपंप ‘पाटबंधारे’कडून सील

सिद्धनेर्ली, जि. कोल्हापूर : शेंडूर (ता. कागल) येथील तलावातील ६४ वीजपंप पाटबंधारे खात्याकडून थकबाकी पोटी सील केले आहेत.  त्यामुळे शेकडो एकरांतील ऊस पीक वाळून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक वीजपंप सील केल्यामुळे शेतकऱ्यांत नाराजी आहे. 

पूर्वेला असलेल्या तलावातून शेतीसाठी ६८ वीजपंप कार्यरत आहेत. पाचशेहून अधिक एकरांतील ऊस यावर अवलंबून आहे. उपसा करण्यासाठी सात दिवसांचे फेर पाडले आहेत. उपसा कालावधीतच ऐन उन्हाळ्यात हे पंप बंद केले आहेत. पाटबंधारे खात्याने शेतकऱ्यांना व्यक्तिगतरीत्या कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता थेट डीपीवरून या भागातील वीजकनेक्‍शन तोडण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला, मात्र काही शेतकऱ्यांनी सरसकट पंप बंद होणार असल्याने असे करण्यास विरोध केला. 

पाणीपट्टी भरलेल्या शेतकऱ्यांवर त्यामुळे अन्याय होईल, या शेतकऱ्यांच्या भूमिकेमुळे संबंधित अधिकाऱ्यांनी थकबाकीची यादी असलेल्या शेतकऱ्यांचे वीजपंप सील केली आहेत. यापैकी बहुतांशी शेतकऱ्यांच्या कारखान्याकडे गेलेल्या ऊस बिलातून दोन वर्षांत वसुली झाली आहे. अशा शेतकऱ्यांचेही नावे या यादीत आहेत. शेतकऱ्यांनी कारखाना कार्यालयाकडे जाऊन बिलातून पाणीपट्टी कपात केल्याच्या पावत्या घेऊन पाटबंधारे विभागाकडे धाव घेतली. या विभागाने आपल्याकडे संबंधितांचे कमी रकमेचे धनादेश आले असल्यामुळे थकबाकीची शेतकऱ्यांनी खातरजमा करावी, असे सांगितले. यावरून शेतकरी व अधिकाऱ्यांत वादावादी झाली.

थकबाकीची रक्कम सूचना देऊनही न भरलेल्या शेतकऱ्यांची पाणी उपसा यंत्रे सील केली आहेत. कारखाना व्यवस्थापनाकडून अपुरी रक्कम दिल्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी कार्यालयात जाऊन थकबाकीची खातरजमा करून उर्वरित रक्कम भरल्यानंतर पंप पूर्ववत सुरू केले जातील.  - हरी कुंभार, शाखा अभियंता, कागल पाटबंधारे विभाग. 

कोणतीही पूर्वसूचना न देता अशाप्रकारे वीजपंप सील करणे चुकीचे आहे. ऐन उन्हाळ्यात त्यामुळे पिकाचे नुकसान होणार आहे. कारखान्यांच्या ऊस बिलातून पाणीपट्टीची रक्कम कपात झाल्याने शेतकरी निर्धास्त होते, मात्र पाटबंधारे विभागाकडून यापूर्वीच त्याची खातरजमा करणे आवश्‍यक आहे.  - शिवाजी कासोटी, सरपंच, शेंडूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com