खरपुडी ‘केव्हिके’कडून परस बागांच्या विस्तारासाठी बियाणे किट

जालना: पोषणमूल्य आधारित भाजीपाला परस बागांच्या विस्तारासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने बियाणे किट तयार केली आहे.
Seed kit for backyard gardening extension from Kharpudi ‘KVK’
Seed kit for backyard gardening extension from Kharpudi ‘KVK’

जालना : पोषणमूल्य आधारित भाजीपाला परस बागांच्या विस्तारासाठी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राने बियाणे किट तयार केली आहे. दत्तक गावात दिल्या जाणाऱ्या या बियाणे कीटमध्ये अर्ध्या गुंठ्याचे विविध प्रकारचे भाजीपाल्याचे बियाणे समाविष्ट आहे. त्यास शेतकरी कुटुंबांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. 

पोषण मूल्य आधारित भाजीपाला परसबाग विस्ताराच्या कार्यात औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद व खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्र सहभागी झाले आहेत. ‘केव्हिके’च्या गृहविज्ञान विभागामार्फत प्रत्येक वर्षी दत्तक गावात २० कुटुंबासाठी पोषण बाग एक प्रात्यक्षिक राबविले जाते. आतापर्यंत ५ गावांत ३०० कुटुंबांसाठी हे प्रात्यक्षिक घेतले आहे. २०१८ पासून एमसीएईआर पुणे एमएसएसआरएफ-एम एस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन चेन्नई, अटारी पुणेतर्फे युनिसेफने अर्थसहाय्य केलेला एक प्रोजेक्ट २०० कुटुंबासाठी कचरेवाडी, वानडगाव व हडप सावरगाव येथे राबविला जात आहे.

या प्रोजेक्टमुळे गावातील इतर कुटुंबांना देखील घरचा पौष्टिक भाजीपाला मिळावा, या उद्देशाने व बियाणे किटची मागणी आहे. त्यामुळे ही किट तयार करण्यात आली आहे. किटमधील बियाणे अर्धा गुंठ्यासाठी पुरेसे आहेत. ५ ते ६ व्यक्तीच्या कुटुंबासाठी हे पुरेसे आहे. सध्या ‘केव्हिके’ने १५० कीट तयार केल्या आहेत. याला जिल्ह्यातूनच नाही, तर इतर जिल्ह्यातून देखील प्रचंड मागणी होत आहे. जवळपास शंभर कीटची विक्री झाली आहे. जालनासह पुणे, लातूर, अमरावती, औरंगाबाद, परभणी आदी जिल्ह्यातून बियाणी किटला मागणी आहे. 

घरचा ताजा पौष्टिक रसायन अवशेषमुक्त भाजीपाला खाण्यास मिळावा, रोजच्या आहारात सर्व भाज्यांचा समावेश व्हावा, सकस भाजीपाला खाल्ल्यामुळे आजाराचे प्रमाण कमी होईल, भाज्यांचे महिन्याचे अंदाजे पाचशे ते सहाशे रुपये वाचतील. सध्या कोरोणाच्या काळात ज्यांनी पोषण बाग केली, त्यांना खूप उपयुक्त ठरली आहे. शिवाय जास्तीचा भाजीपाला गावातच विकून महिन्याला आर्थिक लाभ देखील झाला आहे.

२३ प्रकारच्या भाज्यांचे बियाणे

जवळपास १८५ ग्रॅम वजनाच्या व २१० रुपये किमतीच्या बियाणे किटमध्ये २३ प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे. यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कंदभाज्या, वेलवर्गीय भाज्या व इतर भाज्यांच्या बियाण्यांचा समावेश आहे.

प्रत्येक व्यक्तीला साधारण ३०० ग्रॅम  भाज्यांचे  व २५० ग्रॅम फळांची दैनंदिन गरज असते. गच्चीवर कुंडीत टबमध्ये ग्रोबॅग बकेटमध्ये हा भाजीपाला आपण लावू शकतो. या बियाणे किटमध्ये साधारणत अर्ध्या गुंठ्यासाठी पुरेसे बियाण आह. - संगीता कऱ्हाळे- गायकवाड, गृहविज्ञान तज्ज्ञ,‘केव्हिके’ खरपुडी, जालना.

पोषणमूल्य आधारित शेती पद्धती काळाची गरज आहे. राष्ट्रीय पोषण महिन्याच्या निमित्ताने तयार केलेल्या परसबागेच्या बियाणे किटला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.  - एस. व्ही. सोनुने, कार्यक्रम समन्वयक, ‘केव्हिके’ खरपुडी, जि. जालना.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com