पोषक आहारासाठी बियाणे स्वावलंबन महत्त्वाचे...

येत्या काळात कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी, ज्वारी, नाचणी, धान्य, डाळी, तेलबिया व चारा पिके यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. यातून पोषणमूल्य असणाऱ्या पिकांना चालना मिळेल.
Seed self-sufficiency is important for a nutritious diet ...
Seed self-sufficiency is important for a nutritious diet ...

येत्या काळात कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी, ज्वारी, नाचणी, धान्य, डाळी, तेलबिया व चारा पिके यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. यातून पोषणमूल्य असणाऱ्या पिकांना चालना मिळेल. भारतात पूर्वी आहारात असलेली भरड धान्य, रानभाज्या आणि रानफळे आता दुर्मिळ झालेली आहेत. या अन्न घटकांपासून चविष्ट अन्न पदार्थ बनविण्याची पद्धतीही विस्मरणात गेली आहे. याचा थेट परिणाम पोषण मूल्यांनी समृद्ध असलेला ग्रामीण कृषी जैवविविधतेवर होत आहे. कोरडवाहू भागात उत्पादनक्षमतेत शाश्वत वाढ घडवून आणण्यासाठी आणि खात्रीशीर उपजीविका निर्माण करण्यासाठी लोकसहभागावर आधारित पाणलोट विकास प्रकल्प राबविण्याबरोबर एकात्मिक पद्धतीने शेती करण्याचा सल्ला दिला जातो. त्याच्या परिणामांचा अभ्यास केला तर असे लक्षात येते की शेती पद्धतीमध्ये पुनर्रचनेची गरज जाणवत आहे.              शेती एक व्यवसाय आणि जीवनपद्धती म्हणून थेट निसर्गावर अवलंबून आहे. ज्यावर शेती अवलंबून आहे, अशा पायाभूत स्त्रोतांची हानी झाली तर शेतीवर अवलंबून असलेल्या उपजीविकांवर साहजीकच विपरीत परिणाम होताना दिसत आहे. जमिनीची धूप होते, शेत जमिनी क्षारपड होतात, पोषक घटकांचे प्रमाण कमी होऊन जमिनीचा कस कमी होतो. वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेले व स्थानिक वातावरणाशी पूरक बियाणे नामशेष होत आहेत. कृषी जैवविविधता मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. या सर्व बाबीचा परिणाम लहान शेतकरी, कोरडवाहू शेतकरी तसेच महिलांच्या अन्नसुरक्षा व पोषण आहाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.          बियाणे स्वावलंबन महत्त्वाचे  प्रयोगशील शेतकऱ्यांनी निसर्गातील परंपरागत सिंचन पद्धतीचे  निरीक्षण करून स्वतः पिकाच्या नवीन जाती तयार केल्या. प्रयोगशीलतेतून जास्त उत्पादन देणाऱ्या, चांगली रोग प्रतिकार शक्ती असलेल्या, अवर्षण व अतिवृष्टी अशा बिकट हवामान परिस्थितीला तोंड देऊ शकणाऱ्या, चांगल्या चवीच्या, जास्त पोषणमूल्य असलेल्या, औषधी गुणधर्म असलेल्या अशा विविध जातींची निवड केली. पिकांच्या बहुतांश जाती या सरळ जाती होत्या. म्हणजेच एका हंगामात लागवड केलेल्या पिकापासून मिळणाऱ्या बियांणाचा वापर दुसऱ्या वर्षी लागवडीसाठी करता येत होता. त्यामुळे शेतकरी बियाणांच्या बाबतीत स्वावलंबी होता. पारंपारिक बियाणे स्थानिक परिस्थितीला पूरक असतात. त्यामध्ये  रोगप्रतिकारक क्षमता चांगल्या प्रकारे असते. स्थानिक वातावरणात चांगली गुणवत्तापूर्ण उत्पादनाची हमी असते. उत्पादित मालामध्ये चांगले पोषक गुणधर्म असतात. या उत्पादनाला आरोग्यवर्धक, पोषक गुणधर्म व चव असल्यामुळे ग्राहकांची मागणी चांगली आहे.       पारंपारिक बियाणे संवर्धन 

  • ग्रामीण युवा प्रागतिक मंडळाद्वारे पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये २००२ मध्ये पारंपारिक बियाणे व जैवविविधतेचा संशोधन उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्षेत्रातील शेतकरी पूर्वी २४० पारंपारिक जातींची लागवड करीत होते. मात्र आम्हाला प्रत्यक्ष ४८ बियाणांचे नमुने  मिळाले. उर्वरित बियाणे नामशेष झालेली आहेत. संस्थेने २०१४ मध्ये  महाराष्ट्र जीन बँक उपक्रमाद्वारे लोकसहभागातून स्थानिक पिके जातीचे संवर्धन, संरक्षण व शाश्वत वापर पद्धती विकसित केली आहे. प्रामुख्याने पारंपारिक जातींच्या शुद्धीकरणाची प्रक्रिया, वैज्ञानिक पद्धतीने गुणधर्माची ओळख करून शेतकरी बियाणे शुद्धीकरण करू लागले. शेतकऱ्यांच्या शेतावर पारंपारिक बियाणे प्रात्याक्षिके घेण्यात आली. लोकसहभागाने सर्वेक्षण करून शेतकरी स्वतःची बियाणे निवड करण्याचे कौशल्य विकसित झाले. उत्पादन वाढवण्यासाठी एसआरआय पद्धतीचा वापर सुरू झाला. माहिती संकलन व वितरण कार्य करण्यात आले. 
  • गाव पातळीवर जैवविविधता व्यवस्थापन समितीचे सक्षमीकरण करून स्थानिक लोकांचे ज्ञान संकलन व हस्तांतरण करण्यात आले. पारंपरिक पीक विविधतेचे प्रदर्शने व जागृती कार्यक्रम, केंद्रीय बियाणे बँक तसेच क्लस्टर पातळीवर बियाणे बँक तयार करण्यात आल्या. स्थानिक पोषण आहार पद्धती व जैवविविधता जागृतीचे कार्य करून  धान्य साठवणूक पद्धती आणि बियाणे विक्री व आदान-प्रदान व्यवस्था स्थापन करण्यात आल्या. या उपक्रमामुळे जिल्ह्यात पारंपारिक बियाणाचे महत्त्व व उपयोगिता सिद्ध झाली. पारंपारिक बियाणाचे क्षेत्र वाढायला सुरवात झाली. 
  • शासनाच्या पुढाकाराची गरज 

  •  कोरडवाहू भागात पीक पद्धती मध्ये विविधता आणण्यासाठी आणि किमान पीक वाचू शकेल, अशी जलसिंचन सुविधा शासनाने पुरवण्याची गरज आहे. 
  •  उपजीविकेचे साधन म्हणून पशुपालन उद्योगाकडे लक्ष द्यावे लागेल. जनावरांच्या विचार करताना स्थानिक जातींमधील जैवविविधताचे पुनर्जीवन आणि त्यात सुधारणा करण्यावर भर दिला पाहिजे. 
  •  कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी, ज्वारी, नाचणी, धान्य, डाळी, तेलबिया व चारा पिके यांना प्रोत्साहन द्यावे लागेल. पारंपारिक बियाणे संरक्षकांना विशेष सहाय्यता मिळाली पाहिजे. 
  • पर्यावरण अनुकूल शेती करणाऱ्यांना प्रोत्साहन व आर्थिक साहाय्य मिळावे.
  • महिलांच्या माध्यमातून समुदायाचे बियाणे बॅंक स्थापन करण्यात यावी.
  • पारंपरिक पिकांच्या उत्पादनाला तसेच कोरडवाहू शेतमालाला बाजारपेठेत विशेष सरकारी पाठबळ मिळावे. यासाठी अन्नपुरवठा योजनेमध्ये समन्वय करणे गरजेचे आहे.
  • संपर्क ः  अविल बोरकर,०७१८४ - २५६९८४ (सचिव, ग्रामीण युवा प्रागतिक मंडळ, भंडारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com