पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल बियाण्यांची मागणी

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे विभागात रब्बी पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. चालू वर्षी सरासरी क्षेत्राच्या तुलनेत दीड लाख हेक्टरने पेरणी क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामात मुबलक बियाण्यांचा पुरवठा करण्यात आला आहे. रब्बीसाठी दोन लाख ६३ हजार ५७१ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदवण्यात आली होती. आतापर्यंत सुमारे ६४ हजार ९४४ क्विंटल बियाणे तालुका स्तरावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकऱ्यांना बियाणांबाबत काही अडचणी असल्यास संबंधित तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे विभागीय कृषी सहसंचालकांनी केले आहे.  

पुणे विभागात रब्बी पिकांचे सरासरी पेरणी क्षेत्र १७ लाख ८१ हजार ३५ हेक्टर आहे. त्यामध्ये आणखी दीड लाख हेक्टर वाढ होऊन यंदा सुमारे १९ लाख २९ हजार ११३ हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार खते व बियाणे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चालू वर्षी हरभरा, गहू, ज्वारी या पिकांच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यासाठी दोन लाख ६३ हजार ५७१ क्विंटल बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली. त्यापैकी आत्तापर्यंत सुमारे ६४ हजार ९४४ क्विंटल बियाणे तालुका पातळीवर उपलब्ध करून दिले आहे. मागील तीन वर्षांत सरासरी ८१ हजार १५३ क्विंटल बियाण्यांचा वापर झाला होता. त्यानुसार यंदा चांगला पडलेला पाऊस लक्षात घेऊन रब्बीच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याने मोठ्या प्रमाणात बियाण्यांची मागणी नोंदविण्यात आली आहे. 

आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना उशिराने सुरुवात झाली आहे. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, हरभरा या पिकांच्या पेरण्या झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने रब्बी पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. 

विभागातील नगर जिल्ह्यात रब्बी ज्वारीची पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून थंडी सुरू झाल्याने हरभरा पिकाच्या पेरणीस अल्प प्रमाणात सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातही खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकांची काढणी झाली आहे. बाजरीची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. रब्बी हंगामातील रब्बी ज्वारी, हरभरा, मका या पिकांच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत.  सोलापूरमध्येही रब्बी हंगामातील ज्वारीची पेरणी सुरू झाली आहे. चालू महिन्यात झालेल्या पावसामुळे अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व बार्शी तालुक्यात पेरणीस विलंब होत आहे. गहू व हरभरा या पिकांची नुकतीच पेरणी सुरू झाली असून पेरणी क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे.

जिल्हानिहाय बियाण्यांची मागणी(क्विंटल)
जिल्हा प्रस्तावित क्षेत्र  बियाणे मागणी बियाणे उपलब्धता
नगर  ७,३१,८७० १,४१,४१५ १७,६०३
पुणे  ४,२५,८४५  ६८,२९६ २१,६३१
सोलापूर   ७,७१,३९७    ५३,८६० २५,७१०
एकूण १९,२९,११३ २,६३,५७१ ६४,९४४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com