कुंदेवाडी येथे मिळणार विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे

कुंदेवाडी येथे मिळणार विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे
कुंदेवाडी येथे मिळणार विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे

नाशिक : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीअंतर्गत कुंदेवाडी (ता. निफाड) येथे कृषी संशोधन केंद्र १९३२ सालापासून कार्यरत आहे. या संशोधन केंद्रामार्फत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विद्यापीठाने विकसित केलेले बियाणे व इतर उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध व्हावी, अशी शेतकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. कृषी संशोधन केंद्रावर शुक्रवारी (ता. ४) संशोधन केंद्राचे प्रमुख तथा गहू विशेषज्ज्ञ डॉ. सुरेश दोडके यांच्या हस्ते फित कापून विक्री केंद्राचे उद्‌घाटन करण्यात आले. 

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विश्वनाथा यांच्या संकल्पनेतून तसेच संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली कुंदेवाडी येथे बियाणे तसेच जैविक उत्पादनांच्या विक्री केंद्र सुरू करण्यात आले. 

यापूर्वी परिसरातील शेतकऱ्यांना विद्यापीठाचे बियाणे खरेदी करण्यासाठी राहुरी येथे विद्यापीठात जावे लागत असे. मात्र, या ठिकाणी केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळणार असल्याची माहिती गहू संशोधन केंद्राकडून देण्यात आली. या वेळी संशोधन केंद्रातील डॉ. बबनराव इल्हे, डॉ. उदय काचोळे, डॉ. हेमंत पाटील, अधिकारी व कर्मचारी तसेच कर्मवीर काकासाहेब वाघ कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या विक्री केंद्रावर सद्य:स्थितीत गहू- फुले समाधान व हरभरा- दिग्विजय हे बियाणे, तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणू खत, नत्र स्थिरीकरण करणारे अॅझोटोबॅक्टर जिवाणू खत, विविध पिकांवरील किडींच्या जैविक पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी ‘फुले मेटारायझीयम’ ही उत्पादने शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहेत. तसेच पुढे चालून हंगामनिहाय बियाणे, जिवाणू खते, जैविक कीटकनाशके व जैविक रोग नियंत्रक (ट्रायकोडर्मा) विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसे वाचणार आहे. 

परिसरात सुरू झालेल्या या विक्री केंद्राचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी ९६०४२६११०१ किंवा ९४०५००८९१४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केंद्राचे प्रमुख डॉ. सुरेश दोडके यांनी केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com