चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई
चार साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई

पुणे : गाळप हंगाम २०१८-१९ मधील ऊस उत्पादकांची एफआरपी रक्‍कम थकविणाऱ्या ८६ कारखान्यांविरुद्ध आत्तापर्यंत महसुली प्रमाणपत्र जप्ती (आरआरसी) कारवाई करण्यात आली असून, सातारा जिल्ह्यातील आणखी चार कारखान्यांविरुद्ध कारवाईचे आदेश साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे भाऊ श्रीनिवास पवार यांच्या नावावर यातील एक कारखाना आहे. एफआरपीची रक्‍कम न दिल्यास संबंधित कारखान्यांच्या साखर व बगॅस विक्रीतून वसुली करण्यात येणार आहे. 

आरआरसी कारवाई करण्यात आलेल्या साखर कारखान्यांमध्ये सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शरयू शुगर्स ॲग्रो इंडिया लिमिटेड हा कारखाना अजित पवारांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांच्या मालकीचा आहे. तर, शिवसेनेचे पाटणचे आमदार शंभूराजे देसाई यांच्याशी संबंधित लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना, सांगलीचे भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांचे भाऊ संग्राम देशमुख यांचा सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील ग्रीन पॉवर शुगर्स लिमिटेड आणि काँग्रेसचे नेते प्रल्हाद साळुंखे यांचा फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर्स लिमिटेड या कारखान्यांचा समावेश आहे. 

या तीन कारखान्यांकडे २४ कोटी ९७ लाख रुपये इतकी एफआरपीची थकीत रक्‍कम आहे. थकीत रक्‍कम वेळेत न दिल्यास त्यावर १५ टक्‍के व्याजदर आकारण्यात येणार आहे. ही थकीत रक्‍कम वसूल करण्यासाठी साखर कारखान्यांतील उत्पादित साखर आणि बगॅस विक्रीतून शेतकऱ्यांची थकीत देणी द्यावीत, असे आदेशात नमूद केले आहे. या कारवाईसाठी सातारा जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

राज्यात २०१८-१९ मध्ये एकूण १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला.या कारखान्यांनी ९५२ लाख टन उसाचे गाळप केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीपोटी २३ हजार २९३ कोटी रक्‍कम देय होती. त्यापैकी २२ हजार ९१५ कोटी शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यात यंदाच्या हंगामात १३९ साखर कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्‍कम दिली आहे. अन्य ४५ कारखान्यांनी ८० ते ९९ टक्‍के रक्‍कम दिली आहे. एफआरपी थकविणाऱ्या ८६ कारखान्यांवर आरआरसी कारवाई करण्यात आली. काही कारखान्यांकडे ३९७ कोटी रुपये थकीत असून, हे प्रमाण केवळ १.७१ टक्‍के आहे.  - शेखर गायकवाड, साखर आयुक्‍त

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com