गुणवंत मेंढी पैदाशीसाठी नर, मादीची निवड

मेंढ्यांमध्ये निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक सुधारण्यासाठी दूध उत्पादन, कोकराच्या वाढीचा दर, अशा गुणधर्मांच्या नोंदी घेऊन सर्वोत्कृष्ट पाच ते दहा टक्के मेंढ्या निवडून त्या पैदाशीसाठी वापराव्यात.
Selection of male and female for quality sheep breeding
Selection of male and female for quality sheep breeding

मेंढ्यांमध्ये निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक सुधारण्यासाठी दूध उत्पादन, कोकराच्या वाढीचा दर, अशा गुणधर्मांच्या नोंदी घेऊन सर्वोत्कृष्ट पाच ते दहा टक्के मेंढ्या निवडून त्या पैदाशीसाठी वापराव्यात.  मेंढीपालन हे मांस उत्पादनाच्या बरोबरीने लोकर, दूध आणि लेंडीखतासाठी देखील केले जाते. मेंढ्यांमध्ये इतर पशुपालनाच्या तुलनेत कमी आर्थिक गुंतवणूक, जुळी कोकरे देण्याची उच्च प्रमाण असते. तसेच विक्रीसाठी लवकर वयात येतात. मेंढीपालनासाठी जात, प्रजाती, सर्वसाधारण शरीराच्या वाढीचा वेग, रोगप्रतिकारशक्ती, आर्थिक गुंतवणूक, जुळी कोकरे देण्याची क्षमता, मांसाचे दर, सशक्त पैदास आणि ज्या भागात त्याचे पालन करायचे त्या भागातील त्यांचे तेथील वातावरणाशी अनुकूलन याबाबी महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रात डेक्कनी, मडग्याळ आणि बेल्लारी मेंढ्याचे संकर जातींचे संगोपन केले जाते.  सशक्त पैदाशीचे महत्त्व 

  • मेंढीपालनाचे यश हे पैदाशीसाठी वापरलेली मेंढी आणि नर यावर अवलंबून असते. 
  • मेंढ्यांमध्ये निवड पद्धतीने करावयाच्या आनुवंशिक सुधारण्यासाठी दूध उत्पादन, कोकराच्या वाढीचा दर, अशा गुणधर्मांच्या नोंदी घेऊन सर्वोत्कृष्ट पाच ते दहा टक्के मेंढ्या निवडून त्या पैदाशीसाठी वापराव्यात. 
  • नोंदी केलेल्या मेंढ्यामधील नातेसंबंधांची माहिती विश्‍लेषणात वापरली तर त्यामध्ये अधिक अचूकता येऊ शकते. 
  • व्यवसायाची सुरुवात जास्तीत जास्त २० मेंढ्या व एक नर घेऊन करावी. ही निवड केवळ त्यांच्या शारीरिक गुणधर्म पाहून न करता त्यासाठी निवडीचे वेगवेगळे पैलू काटेकोरपणे तपासणे गरजेचे आहे. उत्पादनक्षमतेत आनुवंशिक सुधारणा ही कायमची व शाश्‍वत सुधारणा असते. मागील सुधारण पुढील पिढी दर पिढी भरत पडत जाते.
  • पैदाशीच्या मेंढ्याचा आहार

  • पैदाशीच्या नरांना पैदास काळात त्यांच्या वजनानुसार अतिरिक्त हिरवा चारा, वाळलेला चारा व खुराक द्यावा.
  • पैदाशीच्या काळात नराच्या आहारात वैरणीशिवाय ४०० ते ८०० ग्रॅम (त्याच्या वजनानुसार) आंबोण मिश्रण देणे आवश्यक आहे. ओली वैरण उपलब्ध नसल्यास चांगल्या प्रतीची सुकी वैरण आंबोणाशिवाय खाईल तितकी द्यावी. दिवसाला द्यावयाचे आंबोण दोन वेळा विभागून द्यावे. नर आंबोण पूर्णपणे खाईल याची खबरदारी घ्यावी.  
  •  नराचे आरोग्य 

  • सर्व पैदाशी नरांना नजीकच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने लसीकरण आणि जंतप्रतिबंधक औषधोपचार नियमितपणे करावा.
  • पशुवैद्यकाच्या सल्ल्याने गोचीड, उवा यांसारख्या बाह्य परजीवीच्या प्रतिबंधासाठी गोचिडनाशकाची फवारणी करावी. 
  • नराचे व्यवस्थापन

  • पैदाशी नरांना योग्य आकाराचा आणि स्वतंत्र निवारा करावा (प्रत्येकी छताखालील २ चौ.मी. आणि खुला ४ चौ.मी.) त्याची स्वच्छता ठेवावी. 
  • त्याच्या खुरांचे वाढलेला भाग वेळोवेळी कापावा, कारण तो प्रजननात बाधा उत्पन्न करू शकतो. 
  • पैदाशीसाठी मेंढीची निवड 

  • पैदाशीसाठीची मेंढी आकाराने मोठी असावी. पाय सरळ, पिळदार व खूर (टाचा) उंच असावेत. 
  • दुभत्या मेंढीची धार काढून पाहावी. दुधाचे प्रमाण, दुधाचा रंग, कासेवर सूज या गोष्टी पारखून घ्याव्यात. मेंढी विकत घेताना तिची कास नीट पारखून घ्यावी.
  • दुभती मेंढी निवडताना तिचे वय, कोकरांची संख्या, दुधाचे प्रमाण इत्यादी गोष्टींकडे लक्ष द्यावे. 
  • दुभती मेंढी लठ्ठ व मंद नसावी, ती टवटवीत व चपळ असावी. मेंढीचे सर्व दात बळकट व सुस्थितीत असावेत. शक्यतो एक ते दोन वर्षे वयाची (दोन ते चार दाती) मेंढी विकत घ्यावी. केस मऊ व चमकदार दिसणारे असावेत. भरदार छाती असावी. बांधा मोठा असावा, जेणेकरून दोन किंवा अधिक कोकरांना मेंढी आपल्या गर्भाशयात जोपासू शकेल. 
  • निरोगी व भरपूर दूध देणाऱ्या मेंढीचे करडू खरेदी करावे. करडे रोगमुक्त, तसेच परोपजीवी कीटकांपासून मुक्त असावीत. मोठ्या प्रमाणावर मेंढीचे दूध व मटण उत्पादन वाढविण्यामध्ये उच्च उत्पादनक्षमतेच्या मेंढीची अनुपलब्धता हा मोठा अडसर आहे.
  • मेंढीचे प्रजनन  

  • चांगली वाढ आणि मोठ्या आकाराच्या मेंढीचा वापर प्रजोत्पादनासाठी करावा. मादीचे वय १४ ते १६ महिने असताना व वजन २२ ते २५ किलो असताना पैदाशीसाठी त्यांचा वापर केल्यास फायदेशीर ठरतो. 
  • काही मेंढ्या मुका माज दाखवतात किंवा आपल्याला तो ओळखता येत नाही म्हणून मेंढ्यांच्या कळपात नर असणे आवश्यक आहे.
  • मेंढ्या सुमारे १७ ते १८ दिवसांच्या अंतराने माजावर येतात आणि हा माज साधारणपणे ३० तास टिकतो. गर्भकाळ ५ महिन्यांचा (१४६- १४७ दिवस) असतो. 
  • गाभण मेंढी शेवटच्या महिन्यात वेगळी ठेवून रोज २५० ते ३०० ग्रॅम प्रथिनयुक्त खुराक हिरव्या चाऱ्यासोबत द्यावा. नोंदवहीमध्ये सगळ्या नोंदी ठेवाव्यात. जसे रेतनाची तारीख, व्याल्याची तारीख, कोकरांचे जन्म वजन, संख्या, लिंग, मृत्यूच्या नोंदी इ. याशिवाय दिवसभरात किमान एक वेळा तरी मेंढ्यांचे निरीक्षण करावे. 
  • आजारी मेंढी वेगळी करून पशुवैद्यांच्या सल्ल्यानुसार औषधे द्यावीत. 
  • मेंढीचा विमा ४ महिने वयापासून काढावा. मेंढीचा विमा मेंढीपालनाच्या व्यवसायातील जोखीम कमी करण्याची प्रभावी पद्धत असून, त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. 
  • लसीकरण व जंताची औषधे नियमित द्यावीत. मेंढीपालन फायदेशीर करण्यासाठी जंत किंवा कृमिनाशक मात्रा वेळेवर देणे आवश्‍यक असते. जंतनाशकचे वेळापत्रक जाणून त्याची अंमलबजावणी करावी. 
  • पैदाशीसाठी मेंढ्याची निवड 

  • पैदाशीसाठी मेंढ्याची निवड आणि त्याच्या निवडीचे मापदंड समजून घेणे हे अतिशय महत्त्वाचे असते. कारण पैदाशी मेंढा हा कळपाचा मुख्य कणा असतो प्रत्येक कोकराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त अनुवंशात हातभार आणि मेंढ्यांच्या समूहाचा गाभण दर ठरविण्यात महत्त्वाचा घटक असतो. पैदाशीचा मेंढा निवड ही अतिशय महत्त्वाची आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असते. कारण कळपाची सुधारणा बऱ्याच प्रमाणात पैदाशीच्या नरावर अवलंबून असते.
  • नर सुदृढ, तंदुरुस्त आणि चपळ असावा. तो आप्तजातीचे सर्वगुण दाखवणारा असावा. शुद्ध जातीचा नर शक्‍यतो विकत घ्यावा किंवा न मिळाल्यास निदान सुधारित जातीचा नर घ्यावा.
  • पैदाशीच्या नराची निवड करताना तीन महिन्यांच्या पुढील नर निवडावा जेणेकरून त्याच्या देखरेखीत आणि व्यवस्थापनात अडचण येणार नाही. नराची निवड दोन जुळ्या नरांतील असेल, तर एक चांगला नर निवडावा म्हणजेच पुढील पिढ्यांत जुळे कोकराचे प्रमाण वाढेल. 
  • पैदाशीच्या नरात कोणतेही शारीरिक व्यंग नसावे. पैदाशीचा नर निवडताना तीन ते चार महिन्यांच्या शरीराच्या वजनावर आणि त्यानंतर त्याच्या वाढीवर आणि वजनावर अवलंबून असते. 
  • पैदाशीच्या नराची निवड जर कळपाच्या बाहेरून करायची असेल तर शक्यतो तो धिप्पाड, डौलदार व निरोगी निवडावा. त्याची वयानुसार उत्तम वाढ व नजर अधू नसावी. त्याची छाती भरदार असावी व पायांत योग्य अंतर असावे. त्याचे पाय मजबूत व खूर उंच असावेत. 
  • नर शक्यतो पायाने अधू किंवा संधिवाताने बेजार असणारा घेऊ नये, जेणेकरून प्रजननात बाधा येणार नाही. तो चपळ, जोमदार व माजावर आलेल्या मेंढ्याकडे चटकन आकर्षित होणारा असावा.
  • मेंढा हा मारका नसावा. डोके व खांद्याचा भाग दणकट, पसरट व नराची लक्षणे दाखवणारा असावा. या लक्षणांवरून पुढील पिढीत चांगले गुणधर्म संक्रमित होण्याची शक्‍यता कळते. 
  • आनुवंशिक आजार संसर्गजन्य नसले तरी या आजारांचा जनावरांच्या उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. प्रजननक्षम नराची गुणसूत्र चाचणी करून आनुवंशिक आजाराचे वाहक असणारे नर ओळखून त्यांना कळपातून काढून टाकावे. मेंढ्यांच्या संख्येच्या ३ ते ४ टक्के पैदाशीचे नर ठेवावेत, म्हणजेच २५ ते ३० मेंढ्यांसाठी १ नर हे प्रमाण आदर्श मानले जाते. 
  • साधारणपणे दोन ते तीन प्रजनन वर्षांत एकच पैदाशी मेंढा वापरल्यानंतर तो बदलावा म्हणजे सम रक्त पैदास टळून सशक्त करडे जन्माला येतील. शक्यतो पैदाशी नराला त्याच्यापासून जन्माला आलेल्या माद्यांसाठी वापरू नये, कारण त्यातून आनुवंशिक आजाराचे प्रमाण कळपात वाढून कळप दुर्बल होईल.
  • साधरणपणे ८ महिन्यांनंतर नर कोकरू वयात आल्याची लक्षणे दाखवू लागतात. परंतु लगेच त्यांचा प्रजननात वापर करू नये. दोन वर्षांनंतर नर कोकरे प्रौढ मानली जातात आणि शक्यतो या नरांत कोणतीही व्यंगता नसावी. वरचा किंवा खालचा जबडा जास्त लांब किंवा आखूड नसावा. ज्यामुळे नर चांगला चारा खाऊ शकत नाही आणि ही अनैसर्गिक चारा चावण्याची सवय नरातून पुढील पिढीतही परावर्तित होऊ शकते. म्हणून जबडे समान लांबीचे असावेत. 
  • नरात प्रजनन काळात काही वेळा अति थकवा जाणवतो. यामुळे त्याची प्रजननक्षमता बाधित होते. म्हणून नराची शारीरिक तंदुरुस्ती जपणे अत्यावश्यक बाब असते. 
  • पैदाशी नरात त्याच्या शुक्रजंतूची चाचणी आणि जमले तर जनन चाचणी करणे गरजेचे आहे. जर काही गुप्त आजार असेल, तर असा नर कळपातून काढून टाकावा. जेणेकरून तो इतर मेंढ्यांना होणार नाही. यामध्ये शक्यतो क्षय, ब्रुसेलोसिससाठी चाचणी करणे आवश्यक आहे. 
  • पैदाशी नराची त्वचा चकचकीत असावी आणि अंगावरील लोकर गळणारी नसावी.
  • मेंढ्यापालनात पैदाशी नराची निवड करताना नराला जास्तीचे सड नसावे, नाहीतर ते द्विलिंगी असू शकतात. पैदाशीकरिता निरुपयोगी असतात. नराचा अंडाशयाचा आकार हा मोठा असावा, जो शुक्रजंतू निर्मितीशी संलग्न असतो.
  • संपर्क ः डॉ. जी. एस. सोनवणे, ८७९६४४८७०७ (क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com