शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (ता.३०) रात्री ९:१५ च्या सुमारास येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन
शेकापचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन

सोलापूर : शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे शुक्रवारी (ता.३०) रात्री ९:१५ येथील अश्विनी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

श्री. देशमुख यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सांगोला मतदारसंघातून ११वेळा विक्रमी विजय मिळविला होता. २००९च्या निवडणुकीत विजय मिळवून, तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे श्री. देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल ५४ वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 

सांगोल्यात सर्वप्रथम १९६२च्या निवडणुकीत श्री. देशमुख विजयी झाले. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत सांगोल्यातील मतदारांनी त्यांनाच भरभरून मते दिली. २०१२मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव केला होता.

गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र १९७८मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि १९९९मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.

शेतीप्रश्‍नांवर सतत लढा अत्यंत साधी राहणी आणि वागण्यामुळे त्यांच्याविषयी राज्याच्या राजकारण आणि समाजकारणात त्यांच्याविषयी मोठा आदर होता. शेतकऱ्यांच्या, शोषितांच्या प्रश्नावर अखेरपर्यंत त्यांनी लढा दिला. शेतीप्रश्नावर त्यांची कायम पोटतिडीक व्यक्त व्हायची अखेर आज एका पर्वाचा अंत झाला.

सात्त्विक विचारसरणी व्यक्तिमत्त्व हरपले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  मुंबई : राजकारण-समाजकारणातील एक साधे, सात्त्विक व्यक्तिमत्त्व हरपले अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार आणि ज्येष्ठ शेकाप नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचा चेहरा म्हणून दिवंगत देशमुख यांची वाटचाल कदापिही विसरली जाणार नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजलीही अर्पण केली आहे. 

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नेते देशमुख यांनी सर्वाधिक काळ आणि सातत्याने सांगोला मतदारसंघाचे प्रतिनिधित्व राज्य विधिमंडळात केले. हे तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे वैशिष्ट्य होतेच, पण त्यापेक्षाही ज्या साध्या आणि उच्च विचारसरणीने त्यांनी त्यांचे जीवन व्यतीत केले ते मला महत्त्वाचे वाटते असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की, आबासाहेबांनी राजकारणामध्ये एक आदर्श निर्माण केला, जो की वर्षानुवर्षे एक मापदंड म्हणून राजकीय विश्वात कायम राहील. सर्वच पक्षांत त्यांच्या विचारसरणीचे चाहते होते. संसदीय कार्यप्रणालीवर त्यांचा नितांत विश्वास होता. त्यामुळे विधिमंडळाच्या कामकाजातही त्यांचा सर्वपक्षीयांना मार्गदर्शक म्हणून आधार होता, धाक होता. कष्टकरी- शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नेता म्हणून त्यांची तळागाळापर्यंत ओळख होती. यातूनच त्यांनी विधिमंडळात अनेक कल्याणकारी योजनांचा पाठपुरावा केला. अशा योजनांना त्यांनी नेहमीच पक्षीय भेदापलिकडे जाऊन पाठबळ दिले. ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

स्वच्छ प्रतिमेचा नेता आपण गमावला : शरद पवार लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपली श्रद्धांजली अर्पण केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com