राज्यात तुती लागवडीसाठी लक्ष्यांकाच्या तिप्पट नोंदणी

उद्दिष्टाच्या तुलनेत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ५० टक्‍केच शेतकऱ्यांनी तुती लागवडीला प्राधान्य दिले होते. यंदाही राज्यात नोंदणी झालेल्या क्षेत्राची आकडेवारी पाहता रोपनिर्मिती व काड्या लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी करावी. - दिलीप हाके, सहाय्यक संचालक, रेशीम, मराठवाडा.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : राज्यात यंदा दुष्काळातही तुती लागवडीसाठी लक्ष्यांकाच्या तिप्पट नोंदणी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढत असल्याचे स्पष्ट होते. राज्यात यंदा ५ हजार एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी  ७ जानेवारीअखेर १५ हजार ९४ एकरांवर अर्थात उद्दिष्टाच्या तिप्पट क्षेत्रावर तुती लागवड करण्याची तयारी शेतकऱ्यांनी दाखवल्याचे नोंदणीतून दिसते. दुष्काळातही उत्पादन देणाऱ्या रेशीम शेतीकडे शेतकरी वळत आहेत. यंदा तुती लागवडीसाठी नोंदणी झालेल्या क्षेत्रात मराठवाड्याचा वाटा ७० टक्‍के आहे. महारेशीम अभियानाची ही फलश्रुती मानली जात असून तुती लागवडीत राज्यात आघाडी घेतलेल्या मराठवाड्यात लक्ष्यांकाच्या सहापट तुती लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी दाखविली आहे.

देशातील रेशीम कोष उत्पादक राज्यांच्या यादीत महाराष्ट्र अपारंपरिक राज्यांच्या यादीत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची रेशीम कोष उत्पादनाचे पारंपरिक राज्य होण्याच्या दृष्टीने झपाट्याने वाटचाल सुरू आहे. त्यामध्ये मराठवाड्याची एकहाती मक्‍तेदारीही प्रकर्षाने जाणवत आहे. सातत्याने दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पादन व अल्प कालावधीत पैसा मिळवून देणारा उद्योग म्हणून रेशीम कोष उत्पादन वाटते आहे.

यंदा दुष्काळाच्या झळांनी या उद्योगावरही संकट कोसळले असले तरी इतर पिकांच्या तुलनेत काही ना काही आधार, तो ही अल्प खर्चात देण्याचे काम रेशीम उद्योगाने केल्यानेच शेतकऱ्यांचा कल याकडे वाढत असल्याचे चित्र आहे. 

दुष्काळ व गतवर्षी नोंदणीच्या तुलनेत पन्नास टक्‍के शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष तुती लागवड केलेले क्षेत्र पाहता राज्यात पाच हजार एकरांवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी १४ ते २९ डिसेंबर २०१८ दरम्यान महारेशीम अभियान राबविले गेले. या अभियानातून ७ जानेवारीअखेर राज्यभरातून १५ हजार ९४ एकरांवर अर्थात उद्दिष्टाच्या तिप्पट क्षेत्रावर तुती लागवडीची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवल्याचे प्रत्यक्ष नोंदणीतून स्पष्ट होते.

मराठवाड्याची आघाडी यंदा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत तुती लागवडीसाठी १६०० एकरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्या तुलनेत मराठवाड्यात प्रत्यक्ष ९ हजार ७९७ एकरांवर तुती लागवडी करण्याची तयारी मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी दर्शवली आहे. त्यामध्ये जालना जिल्हा आघाडीवर असून त्यापाठोपाठ औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, लातूर व हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.

१६ कोटी ६० लाख काड्यांची गरज राज्यात तुतीची लागवड करण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राची झालेली नोंदणी पाहता येत्या जून, जुलैमध्ये एकरी ५५०० रोपांची संख्या लक्षात घेता ८ कोटी ३० लाख १७ हजार रोपांची गरज भासणार आहे. रोपांची गरज पूर्ण करण्यासाठी १६ कोटी ६० लाख ३४ हजार काड्यांची गरज भासणार असल्याची माहिती रेशीम विभागाच्या सूत्रांनी दिली.  

विभागनिहाय लक्ष्यांक व प्रत्यक्ष नोंदणी झालेले क्षेत्र (एकर)   

विभाग लक्ष्यांक प्रत्यक्ष नोंदणी आवश्‍यक तुती रोपे आवश्‍यक काड्या 
औरंगाबाद १६०० ९७९७ ५ कोटी ३८ लाख ८४ हजार १० कोटी ७७ लाख ६७
अमरावती  ९५० २३३४ १ कोटी २८ लाख ३७ हजार २ कोटी ५६ लाख ७४ हजार
नागपूर  ५०० ३६४ २० लाख ०२ हजार  ४० लाख ४ हजार
पुणे १९५० २५८८ १ कोटी ४२ लाख ९५ हजार २ कोटी ८५ लाख ८९ हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com