राज्यात नव्याने सात हजार एकरांवर तुती लागवड

रेशीम शेतीने मराठवाड्यातील शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा रेशीम उद्योगाकडे कल वाढला. पावसाच्या खंडामुळे मराठवाड्यात तुती लागवडीला ब्रेक लागला अन्यथा आणखी दोन ते तीन हजार एकरांवर तुती लागवड झाली असती. - दिलीप हाके, सहायक संचालक रेशीम, औरंगाबाद विभाग.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : आर्थिक उन्नतीचा मार्ग शाश्वतरीत्या प्रशस्त करणाऱ्या रेशीम उद्योगाकडे शेतकऱ्यांचा कल झपाट्याने वाढू लागला आहे. राज्यात यंदा नव्याने जवळपास ७ हजार ८८ एकरांवर तुतीची लागवड झाली आहे. त्यातही एकूण तुती लागवडीपैकी जवळपास ५५ टक्‍के वाटा उचलणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी तुती लागवडीत आघाडी घेतली आहे.

राज्यातील अमरावती, नागपूर, औरंगाबाद व पुणे या चार विभागांत महारेशीम अभियानाआधी ९९५५ शेतकऱ्यांच्या सहभागातून १० हजार ८१६ एकरांवर तुतीची लागवड करण्यात आली होती. त्यामध्ये अमरावती विभागातील १९०८, नागपूरमधील ८४८, औरंगाबादमधील ५०५८, तर पुणे विभागातील ३००२ एकरांवर तुतीची लागवड झालेली होती. यंदा त्यामध्ये नव्याने लागवड झालेल्या ७०८८ एकरांवरील तुतीची भर पडल्याने राज्यातील तुतीचे क्षेत्र १७ हजार ९०४ एकरांवर पोचले आहे.

राज्यातील एकूण नव्या जुन्या तुती लागवड क्षेत्रामध्ये अमरावती विभागातील ३१३८, नागपूर विभागातील ११८४, औरंगाबादमधील ९८६० तर पुणे विभागातील ३७२२ एकर क्षेत्राचा समावेश आहे. आजपर्यंत अमरावती विभागातील २९०९, नागपूर विभागातील १०१२, पुणे विभागातील ३५५५ तर औरंगाबाद विभागातील ९५६७ शेतकऱ्यांनी तुती लागवड केली आहे.

यंदा मराठवाड्यात सर्वाधिक ४८०२ एकरांवर ४८०२ शेतकऱ्यांनी नव्याने तुती लागवड करून आघाडी घेतली आहे. अमरावती विभागात १२३० शेतकऱ्यांनी १२३० एकरांवर, नागपूर विभागातील ३३६ शेतकऱ्यांनी ३३६ एकरांवर, पुणे विभागातील ७२० शेतकऱ्यांनी ७२० एकरांवर तुतीची लागवड केली आहे. केवळ तुती लागवडच नव्हे तर रेशीम उद्योगातील विकासाच्या सर्व मानकांमध्ये मराठवाड्यातील रेशीम उत्पादक शेतकरी सर्वाधिक अग्रेसर असल्याचे चित्र आहे.

नव्याने झालेल्या तुती लागवडीचे क्षेत्र बघता राज्यातील १४३१ गावांत रेशीम उद्योग पोचला आहे. त्यामध्ये अमरावती विभागातील ३६२, नागपूर विभागातील २२४, औरंगाबाद विभागातील ५७७ तर पुणे विभागातील २६८ गावांचा समावेश आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com