पीकविमा सर्व्हर ‘अंडर मेंटेनन्स’

जानेफळ येथील सुविधा केंद्रावर प्रतीक्षा करताना शेतकरी
जानेफळ येथील सुविधा केंद्रावर प्रतीक्षा करताना शेतकरी

अकोला  ः या खरीप हंगामात लागवड केलेल्या पिकांचा विमा काढण्याच्या मुदतीचे काउंटडाउन सुरू झालेले असतानाच ऑनलाइन पोर्टल मात्र ‘अंडर मेन्टेनन्स’ असा वारंवार संदेश देत असल्याने शेतकऱ्यांना तासन्‌तास ताटकळत बसावे लागत आहे. यामुळे पीकविमा दाखल करण्यासाठी असलेली २४ जुलै ही अंतिम मुदत वाढवून देण्याची मागणी केली जाऊ लागली आहे. प्रधानमंत्री पीकविमा या योजनेचा प्रचार, प्रसार अधिक झाल्याने यावेळी पीकविमा काढण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी नेहमीपेक्षा अधिक होत आहे. योजनेत सहभाग घ्यायचा असल्यास बिगर कर्जदारांना २४ जुलैपर्यंत, तर कर्जदारांना ३१ जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. मात्र हा विमा काढण्यासाठी जेव्हा शेतकरी ‘आपले सरकार सेवा’ केंद्रावर जातात, त्या वेळी हे पोर्टल सातत्याने ‘अंडर मेन्टेनन्स' असा संदेश देत असल्याची बाब घडत आहे. तर काहींचा अर्ज भरून झाल्यानंतर विम्याची रक्कम खात्यातून कपात होऊनही अर्जावर मात्र ‘अनपेड' असा संदेश देत असल्याचेही प्रकार होत आहेत. अशा प्रकारे शेतकऱ्यांना तांत्रिक अडचणींमुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशीच स्थिती राहिल्यास अनेक शेतकरी अर्ज दाखल करण्यापासून वंचित राहू शकतात. ऑनलाइन अर्ज दाखल केला तरच पात्र राहता येईल, असे कृषी आयुक्तालयाने आधीच जाहीर केल्यानेही एक प्रकारची धास्ती निर्माण झालेली आहे. खरीप हंगामातील पेरण्या बहुतांश भागात शेवटच्या टप्प्यात आल्या आहेत. शेतकरी त्यामुळे पीकविमा काढण्यासाठी ऑनलाइन केंद्रांवर जाताना दिसतात. या ठिकाणी सुरवातीच्या काळात अर्ज भरल्या गेले. आता मात्र जसजशी अंतिम मुदत जवळ यायला लागली, तसे हे सर्व्हर काम करीत नसल्याचे अनेक केंद्र चालकांनी सांगितले. कर्जदार शेतकऱ्यांना तितकासा ताण नाही. ते ज्या बॅंकेकडून पीककर्ज घेत आहेत तेथेच ही रक्कम कपात होत आहे. मात्र बिगर कर्जदारांची अडचण झाली आहे. आधीच या हंगामात बॅंकांकडून पीककर्ज देताना मोठ्या प्रमाणात हात आखडता घेण्यात आलेला आहे. पीककर्ज वाटपाची गती संथ असल्याने प्रत्येक जिल्ह्यात प्रामुख्याने या भागात २५ टक्केही शेतकऱ्यांना नवीन पीककर्ज मिळालेले नाही. परिणामी पीककर्ज न मिळालेले सर्वच शेतकरी सध्या तरी बिगर कर्जदार आहेत. बिगर कर्जदारांची संख्या मोठी असून, पैशांची जुळवाजुळव करीत या शेतकऱ्यांनी पीकविमा भरण्यासाठी पुढाकार घेतला असताना तांत्रिक अडचणी डोकेदुखी वाढवीत आहे. बॅंकांनीसुद्धा बिगर कर्जदारांचे अर्ज स्वीकारण्याबाबत प्रशासनाकडून आवाहन केले जात असले, तरी बॅंका मात्र यासाठी तयार नाहीत. सर्व्हर काम करीत नसल्याने अनेक ठिकाणी केंद्रचालक व शेतकऱ्यांमध्ये वादविवाद होऊ लागले आहेत. तांत्रिक अडचणी सातत्याने येत असल्याने केंद्र चालकांनाही इतर कामे सोडून यातच वेळ घालवावा लागतो आहे. एकूणच अशा स्थितीत शासनाने ही सुविधा तातडीने सुधारणे गरजेचे आहे. तसेच पीकविमा भरणा न झालेल्यांची संख्या मोठी असल्याने मुदत वाढविण्याची गरज असल्याची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली जात आहे.

येणाऱ्या अडचणी

  • सर्व्हर डाउन अंडर मेंटेनन्सचा मेसेज
  • अर्ज भरल्यावर पैसे खात्यातून कपात होते
  • अर्ज मात्र अनपेड दाखवणे 
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com