बीड, नांदेडला फळप्रक्रिया प्रकल्प उभारणार : जयदत्त क्षीरसागर

बीड, नांदेडला फळप्रक्रिया प्रकल्प उभारणार : जयदत्त क्षीरसागर
बीड, नांदेडला फळप्रक्रिया प्रकल्प उभारणार : जयदत्त क्षीरसागर

बीड : ‘‘जिल्ह्यातील सीताफळ हे नैसर्गिक उत्पादन आहे. यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प बीड व नांदेड या दोन जिल्ह्यांत उभे करण्यात येतील. यासह काजू, आंबा आदी फळ प्रक्रिया व फलोत्पादनास प्रोत्साहन देण्यात येईल,’’ असे प्रतिपादन राज्याचे फलोत्पादन व ‘रोहयो‘चे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. 

राज्याच्या रोहयो व फलोत्पादन विभागातर्फे फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांच्या सोमवारी (ता. १२) झालेल्या कार्यशाळेत क्षीरसागर बोलत होते. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. आमदार आर. टी. देशमुख, आमदार भीमराव धोंडे, नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, ‘मनरेगा‘चे आयुक्त ए. एस. आर. नायक, कृषी संचालक (फलोत्पादन) पी. एन. पोकळे, प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण धरमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार उपस्थित होते. 

क्षीरसागर म्हणाले, ‘‘दहा हजार सिंचन विहिरींना लवकरच मंजुरी देण्यात येईल. वॉटर ग्रीडच्या माध्यमातून पश्चिम वाहिन्या नद्यांतून पाणी गोदावरी पात्रात टाकण्यासाठी काम सुरू केले आहे. भविष्यात कमी पाण्यातून उत्पादने घ्यावे लागतील. यासाठी शेततळे, ठिबक सिंचन, अस्तरीकरण या योजनासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावे. यासाठी ऑनलाइन पद्धत नाही, तर थेट अर्ज स्वीकारले जातील. शेत रस्ते, पांदण रस्ते मोठ्या प्रमाणात करण्यासाठी रोहयोतून कामे केली जातील. सार्वजनिक विहिंरीसाठी एक लाख रुपये देऊन ३०० विहिरी बांधून पिण्याच्या पाण्याची सोय केली जाईल. ‘रोहयो’तून २८ नवीन कामे करण्यात येतील.’’ 

मुंडे म्हणाल्या, ‘‘जिल्ह्यात उत्तम शेती करणारा शेतकरी तयार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना आहेत. शेती विकासासाठी काहीही कमी पडू दिले जाणार नाही.’’ 

दरम्यान, माहितीपुस्तिका व भित्तिपत्रकाचे प्रकाशन केले. याचबरोबर त्यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार प्रभारी जिल्हाधिकारी धरमकर, मुख्य कार्यकारी अधिकारी कुंभार आदींनी स्वीकारला. पुण्यश्लोक अहल्यादेवी जलमित्र पुरस्कार ‘रोहयो‘चे उपजिल्हाधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी स्वीकारला. उत्कृष्ट काम करणाऱ्या गेवराई तालुक्यातील चकलांबा ग्रामपंचायतीचा पुरस्कार सरपंच सुरेश जाजू यांना प्रदान करण्यात आला.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com