'बीडीओं'च्या दरबारात होणार तक्रारींचा निपटारा

Settlement of complaints in the court of BDOs
Settlement of complaints in the court of BDOs

कऱ्हाड, जि. सातारा ः गाव पातळीपासून तालुका पातळीपर्यंत सर्वसामान्यांच्या प्रशासकीय कामात अनेक अडचणी येतात. त्याचे निराकरण तत्काळ होत नसल्याने नागरिकांना अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे त्यांचा वेळ आणि पैसा वाया जाऊन मानसिक त्रासही होतो. त्याचा विचार करून आता ग्रामविकास विभागाने प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी राज्यातील सर्व गटविकास अधिकाऱ्यांना त्यांच्या दालनात जनता दरबार भरवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायती संदर्भातील तक्रारींचा निपटारा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची कामे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. 

गावपातळीवर सर्वसामान्यांच्या अनेक तक्रारी असतात. त्या दूर करण्यासाठी मोठा अवधी लागतो. त्यामध्ये सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला येतो. त्यातच गावोगावच्या राजकारणाचाही काही जण बळी पडतात. काही गावात मुद्दामहून निवडणुकीला मदत केली नाही म्हणून काही जणांची कामे मार्गी लावत नाहीत. तर काही ठिकाणी जाणूनबुजून कामे रखडवली जातात, अशीही उदाहरणे आढळून येतात. गाव पातळीवर काम अनेकदा पंचायत समितीशी संबंधित असल्याने त्यांना तालुक्यावरही जावे लागते. तेथेही जाऊन अधिकारी त्यांच्या कामाच्या व्यापामुळे पहिल्याच भेटीत संबंधितांना भेटतातच असे नाही. त्यामुळे संबंधितांना कामांसाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. त्यातूनही काम होईलच याची खात्रीही नसते. परिणामी वेळ आणि पैसे खर्च होऊनही मानसीक समाधानही मिळत नाही. त्यामुळे ग्रामविकास विभागाने हे पाऊल उचलले आहे.

आठ दिवस अगोदर अर्ज देणे आवश्यक  सर्वसामान्यांच्या तक्रारी मार्गी लावण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत दर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सकाळी ११ वाजता जनता दरबार भरवण्यात येणार आहे.  त्यांच्याकडे दिल्या जाणाऱ्या तक्रारींवर पुढील कार्यवाही होण्यासाठी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात किमान आठ दिवस अगोदर संबंधित तक्रारी किंवा तशा आशयाचा अर्ज देणे आवश्यक आहे. त्यानंतरच संबंधित अर्जावर पुढील कार्यवाही करता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com